सोमवार, २ डिसेंबर, २०१९

दत्त आठव





दत्त आठव  
********

दत्ता आठव  
नेत्री साठव  
दुर पाठव  
काम क्रोध  

होई वेंधळा
घाली गोंधळा
दत्त सांभाळा
परि चित्ती  

सुटो चाकरी
लुटो भाकरी
मिटो लाचारी
जगण्याची  

तोच केवळ
करी सांभाळ
चित्त निर्मळ
भक्ती प्रेमे  

बैसे विक्रांत
तया ध्यानात
दत्त कानात
गुज सांगे  

देह सुटला
शेषी उरला
प्राण धरला
हाती आता  
****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.
com

त्या मेल्या उंदरास( आज मर्ढेकरांचा स्मृती दिन आहे म्हणून )


त्या मेल्या उंदरास
( आज मर्ढेकरांचा स्मृती दिन आहे म्हणून )

************
मेल्या उंदरांचा डोळा
गेला खाऊनी कावळा
पापपुण्य मोजायला
जग अजूनही गोळा ॥

कुणी विचारतो जाब
कुणी शोधे कारणाला
घंटा घणाणे पुराण
पडे प्रश्न देवळाला ॥

मेला पिपा का बुडून
कुणी कासाविस झाला
झाले रामायण त्याचे
किडा मनात बसला ॥

होता जीवनाचा गुंता
काय होती तडफड
त्याच्या वेदनांची वही
करे उरी फडफड ॥

का रे आणली अक्षरे
सुख भरल्या घराला
अर्थ टाळता टाळता
झालो बहिरा आंधळा ॥

**************
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १ डिसेंबर, २०१९

सोनेरी मासोळी




सोनेरी मासोळी
 *************

सोनेरी पाण्यात
सोनेरी मासोळी
सोनेरी झळाळी
डोळीयात

सोनेरी जिण्यात
सोनेरी गाण्यात
सोनेरी लेण्यात
मिरवती

तरी का तहान
दाटते कंठात
आकाश डोळ्यात
उतरते

जडावती पर
हरवते भान
किनाऱ्यात मन
अडकते

का ग बाई अशी 

येते काकुळती 
वैराग्याची वस्ती 
शोधू जाशी

विक्रांत मासोळी
धावे वृक्षातळी
दत्त नरहरी
असे तिथे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

भेट होत नाही (ऋतू)




ऋतू
***
लाख ऋतू गेले तरी
ऋतू  का तो येत नाही
फुटून कणकण हा
का रे फुले होत नाही

पांघरले देहावरी
तेज लाख तारकांचे
पेटून जाणिवा जन्म
का हा दीप होत नाही

मावळतो दिन माझा
रोज रात्रीत नाहतो
थांबून क्षण काळ हा
तव भेट होत नाही

येवो आभाळ खालती
जग थांबणार नाही
निरर्थ जाणून सारे
शोधणे थांबत नाही

जगी त्रांगडे असे हे
हवे ते मिळत नाही
पाणी जातसे वाहून
पाहणे थांबत नाही

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

आदि शक्ति



आदि शक्ति
*******

गहन शून्याच्या
अगम्य गूढ अंधारातून
प्रकटलीस तू
चैतन्यमय ज्योत होऊन
अनंत असीम अकालाला
लाभले मोजमाप
अन् क्षण जन्माला आला

काळाच्या प्रत्येक पदावर
उमटवित आपली मुद्रा
तू झालीस सृष्टी
अणुरेणूंपासून अवकाशा पर्यंत
व्यापून सारे चराचर
तुझ्या जडव्याळ खेळातील
मी माझे अस्तित्व
म्हणजे तूच आहेस
हे जाणून लीन झालो
तव चरणाशी

पण मला वेगळे ठेवून
तू चालू ठेवतेस तुझे नाट्य
आणि त्या नाट्यातील माझे नर्तन

हे भगवती ! हे जगदंब !!
त्या तुझ्या इच्छेचा स्वीकार करून
माझ्या  इच्छा आणि अनिच्छेसकट
मी राहतो पाहात
तुझे अनाकलनीय मनोहर
रौद्र सुंदर रूप
अन् माझ्या जगण्या मरणातील
हा क्षण काळ
जातो झळाळून चैतन्य होऊन
तुझ्या कृपेने
तो ही तूच असून
मी घेतो माझा म्हणून


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

डॉ .माडी शेट्टी ( श्रद्धांजली )






डॉ .माडी शेट्टी ( श्रद्धांजली )
*************

चिमटीत धरून विल्स
ओढायचा कधी तो  
अन् दु:ख अनामिक
फुंकायचा कधी तो .

कधी असे वागणे की
वाटायचा बेछूट तो
कधी बोल ऐसे की
जीवी जाई खोल तो

चालणे तंद्रित असे    
की तरंगे हवेत तो
कामात घुसे  खोल
पण कामात नसे तो

हेल काही दक्षिणेचे
कोरुन ओठात  तो
सहजी आव सर्वज्ञेचा  
असे क्षणी आणत तो  

तीस वर्ष पाहून ही
नव्हताच माहित तो  
अपना होस्टेल मधील  
शेजारी जरी माझा तो

वेगळेच जगणे त्याचे
वेगळेच दु:ख होते
वेगळेच वागणे अन
मरण हि वेगळे होते

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गिरनार




गिरनार 
******

अहा दाटला हा 
भक्तांचा सागर 
एकेक अपार 
पुण्यराशी 

करतात घोष 
प्रेमी चालतात 
तुझिया दारात 
रात्रंदिन 

जय गिरनारी 
मुखी म्हणतात 
धुरीण होतात 
पुण्यपद 

दाटे घनदाट 
कृपेची स्पंदन
होय हरवणं 
नाद लयी 

जन्मो जन्मांतरी 
येई बोलावण 
घडते चालण
यया स्थानी

 किती एक साधू 
दाटले विरागी 
चालले बैरागी 
तुजसाठी 

जटाजूट कुणी 
भस्म  पांघरले 
लंगोटी ल्यायले 
फक्त कुणी 

किती वेशभूषा 
किती एक माळा
भक्त गोतावळा 
लक्षणीय 

जाहलो मी कण
तयाच्या इथला 
देह हा खिळला 
जणू काही 

घडली ही यात्रा 
ऐसी अद्भुत 
सवे अवधूत 
नेई मज  

पाहतो विक्रांत 
मनात बसून 
डोळे हे मिटून 
पुन्हा सारे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*****

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...