शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

आदि शक्ति



आदि शक्ति
*******

गहन शून्याच्या
अगम्य गूढ अंधारातून
प्रकटलीस तू
चैतन्यमय ज्योत होऊन
अनंत असीम अकालाला
लाभले मोजमाप
अन् क्षण जन्माला आला

काळाच्या प्रत्येक पदावर
उमटवित आपली मुद्रा
तू झालीस सृष्टी
अणुरेणूंपासून अवकाशा पर्यंत
व्यापून सारे चराचर
तुझ्या जडव्याळ खेळातील
मी माझे अस्तित्व
म्हणजे तूच आहेस
हे जाणून लीन झालो
तव चरणाशी

पण मला वेगळे ठेवून
तू चालू ठेवतेस तुझे नाट्य
आणि त्या नाट्यातील माझे नर्तन

हे भगवती ! हे जगदंब !!
त्या तुझ्या इच्छेचा स्वीकार करून
माझ्या  इच्छा आणि अनिच्छेसकट
मी राहतो पाहात
तुझे अनाकलनीय मनोहर
रौद्र सुंदर रूप
अन् माझ्या जगण्या मरणातील
हा क्षण काळ
जातो झळाळून चैतन्य होऊन
तुझ्या कृपेने
तो ही तूच असून
मी घेतो माझा म्हणून


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नशीब( उपक्रमासाठी)

नशीब   (उपक्रमासाठी  ) ******* घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळत नाही  क्रम उमजत नाही  कारण मीमांसा कळत नाही  बोल कुणाला देता येत नाही  ...