रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

दत्ता भार माझा



दत्ता भार माझा
********* ***
दत्ता भार माझा
किती रे वाहसी
सदा सावरीसी
पडताना ॥
काय माझे पुण्य
केवढे से तप
परी सुखरूप
ठेवीसी तू ॥
भक्त सागरात
कुण्या कोपऱ्यात
तुजला स्मरत
राहतो मी ॥
परि त्या स्मरणी
जाहला तू ऋणी
देतो किती देणी
भरूनिया ॥
मायबाप माझा
सखा तू सोबती
जडली रे नाती
तुझ्या ठायी ॥
कळे ना मजला
तुझी कृपा दत्ता
लोळतो मी पदा
सदा तुझा ॥
ठेव दृढ पायी
तुझा तू विक्रांत
नच उधळत
जावो कुठे ॥

****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Reel, रिल

Reel/रिल ********* एका मागे एक रील धावतात  मना धरतात आवळून ॥१ कळण्याआधीच थांबण्याआधीच  नेती ओढतच लागोलाग ॥२ यात गुंतूनिया काही न...