अक्षरांचा धनी
**********
अक्षरांचा धनी
करूनिया मला
असशी लपला
माये आड
तरी दत्ता सारे
टाक हे घेऊन
पाषाण करून
ठेवी मज
मानतो हे शब्द
तुझीच मी कृपा
अडविती रुपा
काय पण ?
सुटू देत दत्ता
मैलाच्या या खुणा
मुक्काम ठिकाणा
दावी मज
जाहला सोहळा
नाद वर्णातला
जीव न निवाला
परी माझा
मौनाच्या रांजणी
मिटो खळखळ
शांतीचा नितळ
डोह करी
विक्रांत शून्याच्या
बसला पायरी
प्रवेश अंतरी
देई दत्ता
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
***
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा