मंगळवार, १९ मार्च, २०१९

दत्त शिणल्या डोळ्यात







दत्त शिणल्या डोळ्यात 
हाक पुनवेची येते 
माझ्या भिजल्या गळ्यात 
गाणे ओलेचिंब होते 

माझ्या पायथ्याच्या हाका 
का रे कानी येती क्षीण
करू नको रे अव्हेर 
तुझ्या पायी आला दीन

प्रीति माझ्या काळजाची
काही असेल ओखट 
किर्ति परी तुझी देवा 
बघ आहे ना चोखट

तुझ्या प्रीतीच्या स्वप्नात 
जन्म दिनरात जागा
 प्राण होऊन प्रतिक्षा 
भा डोळीयात उगा

कर काही येणे असे 
का पिंजल्या तनाचे
रो अस्तित्व जगाचे
क्षोभ मिटावे मनाचे

केला विक्रांत शहाणा
धडे जीवनात देत 
सारे सरो नको काही 
फक्त पायी राहू देत  

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, १८ मार्च, २०१९

मनोहर पर्रिकर साहेब




मनोहर पर्रिकर साहेब
****************

माणसं येतात अन 
माणसं जातात 
जीवनाचे हे चक्र  
असेच चालू असते 
झाडा झुडपांचे जाणे 
हे कुणाच्या खिजगणतीत नसते
पण जेव्हा आधारवड उन्मळून पडतो 
तेव्हा हजारो पक्षांचा आकांत 
आसमंत भरून टाकतो
लाखो जीवांचा आश्रय हरवतो.
अन पार पार कोलमडून पडतो 
. . .
ते कलंदर जगणे 
ते निस्पृह वागणे 
ते व्रतस्थ राहणे 
हे तो योगीयांचे जगणे
भ्रष्टाचारी दलदलीत 
कमळाचे उगवणे 
दुरिताच्या तिमिरात 
पणतीचे मिणमिणणे
वादळातील घोंगावत
दीपस्तंभ बनणे
. . . .
असे जीवन जेव्हा जाते
अनंतात विलीन होऊन
माणुसकीचा हुंदका येतो
मनामनात दाटू 
कुणाचा जाण्याने 
पोकळी निर्माण होणे 
म्हणजे काय असते 
हे या मायभूमीला विचारून पाहा
गोव्याच्या लाल मातीला विचारून पाहा
त्या पोकळीला पर्रीकरांचे जाणे म्हणणे  
अन्यथा नाईलाजाने मानणे
 म्हणजे मनावर दगड ठेवणे आहे 
. . .  . . 
पण तरीही एक आशा आहे 
त्या महावृक्षाकडून 
विखुरले गेले असतील 
तसेच काही बीजकण
पेटल्या गेल्या असतील 
काही जोती शलाका    
घेऊन त्यांचे प्रकाशककण 
त्यांचे घडावे संवर्धन 
ते वाढावेत फोफावून  
हिच प्रार्थना साहेब तुम्हाला
द्या हेच आशिष आम्हाला
त्या आभाळून
त्या अव्यकातून.

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, १७ मार्च, २०१९

अवधूत प्रभा



वधूत प्रभा
*************

जाय खोलवर
कळल्या वाचून
मनाची सोडून
निरगाठ ॥
कळू कळू आले
शब्द वेचलेले
दिसते अडले
काय कुठे ॥
मनाला मरण
ठेवले वाढून
देहाला लावून
प्रारब्धाला ॥
विक्रांत चालतो
त्याच त्या पथात
परी पावुलात
जाग नवी ॥
अवधूत प्रभा
सर्वांगा वेढली
अन उतरली
अंतरात ॥
जगणे मरणे
होईल जाईल
उजेडी राहील
सदा तया ॥
🚩🚩🚩
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १६ मार्च, २०१९

दत्ताची वाट 2




दत्ताची वाट
जाते
गंगातीरी
चढे 
गिरणारी

दत्ताची वाट
घुमे 
कोल्हापुरी
थांबे

गाणगापुरी

दत्ताची वाट 
खेळे 
वरदपुरी 
निजे 
श्री माहुरी

दत्ताची वाट
शिरे
खोल उरी 
उरे
भक्तांतरी

दत्तची दिसे
सदा
घरीदारी
उभा
वाटेवरी

दत्ताची वाट
कळे
संता घरी 
वळे
भक्ता दारी

विक्रांत उभा
लीन
जन्मभरी
मनी
दत्त स्मरी

दत्तची होई
स्वये
वाट पुरी
दावी  
रुपे सारी 


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

ती म्हणजे

ती म्हणजे
***

युगोनयुगे तो शिरत आहे
तिच्या कुशीत
अन मग  तिच्या मिठीत
तिच्या नजरेतील वात्सल्यात 
कृतकृत्य होत
तिच्या प्रेमाने उमलत
आश्वस्त होत

ती कधी असते दासी
कधी महाराणी
कधी वारांगनाही
कधी कधी ती त्याच्या
भाषेचीही नसते
वर्णाची नसते
धर्माची ही नसते
पण शब्दाविना सारे
समजून घेते
डोळ्यांची भाषा तिला
किती सहज कळते

कधी ती आई कधी आजी
कधी ती बहीण कधी मैत्रीण
कधी अर्धांगिनी
तर कधी ती मुलगी असते
त्यांच्या सर्व वेदनांचे उत्तर
त्याला तिच्या शब्दात
अन स्पर्शात मिळते

आणि नजरेच्या त्या बळावर
तो झेलू शकतो अनंत जन्म
मरणातूनआलेले
त्यांचा ठाम विश्वास असतो
तिचा शक्तीवर
मांगल्यावर
अन कारुण्यावर

त्याला कधीच प्रश्न पडत नाही
तिच्या शिवाय
त्याचे कसे होणार याचा
कारण ती त्याचाच भाग असते 
सदैव सनातन अविभाज्य
तिच्या शिवाय तो 
कल्पनाही करू शकत नाही
जीवनाची अस्तित्वाची
किंबहुना तीच
त्याचा जीवनाधार असते
अवनींच्या गाभ्यापर्यंत गेलेल्या
मुळासारखी
त्याच अस्तित्व टिकवणारी
त्याचे पोषण करणारी
ती म्हणजे तोच असते

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

पूल पडतो




पूल पडतो

पाच जीव निष्पाप तरुण 
जातांना घरी कामावरून 
मरतात पूल पडून 
भ्रष्ट कुणाच्या अदृष्य हातून

कॉन्ट्रॅक्टर म्हणतो
हात वर करून 
मेंटेनन्स नाही झाला म्हणून 
इंजिनिअर म्हणतो 
की तक्रार आली नाही म्हणून
तर  रेल्वे प्रशासन
 आमचा संबंधच नाही म्हणून

 म्हणजे मग मेले ते
 काय त्यांच्या कर्मांनं?
 की जन्मजन्मांच्या पापानं?

निर्ढावलेले भ्रष्ट राजकारणी
इंजिनिअर अन कॉन्ट्रक्टर 
असेच राहतील सर्वदूर
बसलेले गाडलेल्या प्रेतांच्या
राबिटच्या ढिगांवर

 त्यांना वाचवणारी यंत्रणा
 नेहमीप्रमाणे चौकशी लावून
 जाईल मोकळी होऊन

 हे थांबेल असे वाटत नाही

मेलेल्या आयांच्या पोरांचा टाहो
काही दिवसातच
विस्मृतीत जाईल
मीडियाही निवडणुकीच्या
बातम्यात मग्न होईल
चौकशीतून भ्रष्टाचारी
सुटलेले असतील
त्या आयांची पोरेही
मोठे झालेले असतील

अन निव्वळ एक
दुर्दैवी अपघात म्हणून 
ती फाईल दफ्तरी बांधली जाईल
पुन्हा एक ब्रिज पडे पर्यन्त !


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...