शनिवार, १६ मार्च, २०१९

ती म्हणजे

ती म्हणजे
***

युगोनयुगे तो शिरत आहे
तिच्या कुशीत
अन मग  तिच्या मिठीत
तिच्या नजरेतील वात्सल्यात 
कृतकृत्य होत
तिच्या प्रेमाने उमलत
आश्वस्त होत

ती कधी असते दासी
कधी महाराणी
कधी वारांगनाही
कधी कधी ती त्याच्या
भाषेचीही नसते
वर्णाची नसते
धर्माची ही नसते
पण शब्दाविना सारे
समजून घेते
डोळ्यांची भाषा तिला
किती सहज कळते

कधी ती आई कधी आजी
कधी ती बहीण कधी मैत्रीण
कधी अर्धांगिनी
तर कधी ती मुलगी असते
त्यांच्या सर्व वेदनांचे उत्तर
त्याला तिच्या शब्दात
अन स्पर्शात मिळते

आणि नजरेच्या त्या बळावर
तो झेलू शकतो अनंत जन्म
मरणातूनआलेले
त्यांचा ठाम विश्वास असतो
तिचा शक्तीवर
मांगल्यावर
अन कारुण्यावर

त्याला कधीच प्रश्न पडत नाही
तिच्या शिवाय
त्याचे कसे होणार याचा
कारण ती त्याचाच भाग असते 
सदैव सनातन अविभाज्य
तिच्या शिवाय तो 
कल्पनाही करू शकत नाही
जीवनाची अस्तित्वाची
किंबहुना तीच
त्याचा जीवनाधार असते
अवनींच्या गाभ्यापर्यंत गेलेल्या
मुळासारखी
त्याच अस्तित्व टिकवणारी
त्याचे पोषण करणारी
ती म्हणजे तोच असते

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...