विराजित दत्त
माझ्या हृदयात
सदा निरखत
माझे मला
सावध सतत
करितो मोजणी
सांगे क्षणोक्षणी
काळ गेला
करी ना आग्रह
ठेवी ना डांबून
अस्तित्वाची धुन
पण गाजे
पाप पुण्य माझे
दावी मी ही तया
त्याची त्यास माया
घेरे म्हणे
तुझा तू मोकळा
कर्म करण्यास
साक्षी मी तयास
सांगे तो ही
केले करणे ते
तयास अर्पूनी
विक्रांत सुखानी
वर्ततसे
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा