रविवार, १० मार्च, २०१९

गिरनारी बंधू




गिरनारी बंधू
*********

गिरनारी बंधू होई
सखा साथी जीवनात
मागतो हेच तुजला 
फक्त देई तव हात


या नशिबी नाही का रे 
पौर्णिमेची ती रात
पुण्य तुझी अनुभूती
खरकट्या काळजात

मरणाचे भय नाही
दयाघना जीवनात
तुझ्याविना जगतो हे
शल्य ले हृदयात

काकुळती व्यर्थ का रे 
पुसे तुजला विक्रांत
तडफड शांत करी  
मागतो हे दिनरात

वागवितो चिंध्या अश्या 
लाज वाटे अंतरात  
वस्त्र माझे उसवले
जळो दत्ता क्षणार्धात  
  
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



शनिवार, ९ मार्च, २०१९

रानोमाळ हाका माझ्या




रानोमाळ हाका माझ्या
रानोमाळी साद रे
जन म्हणे पिसा झाला
ऐसा लागे नाद रे

पाहतो मी धन्य झाले
गुरूमार्गी भक्त रे
फाटके नशीब माझे
कसे अस्ताव्यस्त रे

येई बापा दिगंबरा 
हृदयात जारे 
करुणेचा ओघ लोटी 
करी प्रतिपारे

विटले हे मन माझे
विश्व चाकोरीत रे
सुख दुःख तीच रोज
अर्थहीन ही बात रे

पांगुळला देह आता
थकले हे चित रे
आक्रंदन कणोकणी
कुठे आहे दत्त रे

जगण्याचा भार झाला
जगतोय विक्रांत रे
भेटुनिया जाई देवा
एकदाच फक्त रे  
****

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

जीवना


जीवना (on my birthday)
*****
पंख लावून काळाचे
स्वप्न तरंगत आहे
जीवना तुझे वाहणे
किती आनंदात आहे ||
भोवताली जमलेला
जिवलगांचा हा मेळा
मैत्री प्रीतीत सजला
ऋतु सुखावत आहे ||
प्रत्येक फुलात येथे
श्वास उमलत आहे
प्रत्येक पक्ष्यास डोळे
पाहता चकित आहे ||
हे आकाश निळे गर्द
मी प्रकाश होत आहे
वाहतोय मुक्त वात
उर्मी वोसंडत आहे ||
जीवना मी ऋणी तुझा
मम स्वामी दत्त आहे
इहपर सुखात मी 
बघ नित्य तृप्त आहे ||

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ७ मार्च, २०१९

रुजवात




रुजवात
*****


पुन्हा बंद झाली वाट
पुन्हा तम घनदाट  

एक तुझी मंद साथ
होता भा कंदिलात

पांघरून गर्द धुके
गाव निजे अंधारात

सरू गेले त्राण सारे
हरवल्या संभ्रमात

कानी माझा रव नाही
उमटेना पडसाद

येणार ना कधी तरी
स्वप्न दारी रुजवात

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

तुला पाहिले




तुला पाहिले
आणि कळले
प्रेम इतुके
सुंदर असते

ओठांना या
अन् उमजले
 स्पर्श कोंवळे
मधूर कसे ते

चांदण्यातले
स्पर्श रेशमी
डोळ्यांमधले
रंग उसळते

तुला पाहता
ह्रदय  थबकते
पाऊल अडते
खरे हे असते

आपण व्हावे
कधी कुणाचे
याहून मधुर
काहीच नसते

या क्षणावर
जीवन सारे
ओवाळावे
असेच वाटते


©    डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, ६ मार्च, २०१९

अभिनंदन रे



अभिनंदन रे 
*************


करी नंदन रे 
अभिनंदन रे 
तुझा वंदन रे 
शुरवरा 

केले खंडन रे 
रिपू मर्दन रे 
रण जिंकून रे
रणवीरा 

होय जय जय रे 
सरे रिपू भय रे
मिळे अभय ये
मायदेशा

आला जिंकून रे
यश घेऊ न रे 
उभा राहून रे 
ताठ तेथे 

ऋणी भुमी रे 
दे सलामी रे 
गातो आम्ही रे 
गुणगान 

लाखो विक्रांत रे 
ठेवती ह्रदयात रे 
पाही प्रतिका रे
तुज सदा 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

मंगळवार, ५ मार्च, २०१९

शिव परिवार


शिव परिवार
*******

दिनरजनीचा
घेऊनि धागा
रचतो जगता
सदाशिव

त्या वस्त्राचा
पोत पाहते
आधार देते
जगदंबा

लाल पांढरे
निळे जांभळे
वस्त्र जोडले
एक एका

युगे अशी ही
अनंत घडती
कौतुक पाहती
गणराय

जो खांद्यावर
प्रिय पित्याच्या
लीला जगाच्या
अवलोकी

आणि षडानन
करी अनुकरण
पित्यासमान
होण्यासाठी

व्याघ्र नंदी अन्
मयुर सुंदर
अवघेची हे घर
कैलासाचे

विक्रांत पाहिले
कुटुंब असले
कौतुक दाटले
मना माजी

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...