सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

बंध तुटावे...





काच तडकली न ये सांधून
जरी ठेवली कुणी जुळवून
विभक्तपण ते दिसते उठून
विद्रूप भेसूर प्रकाश फाटून

कसे कुठवर रेटू जगणे
व्यवहारातील खोटे हसणे
आता घडावे हरवून जाणे
तमी नकोच्या मिटून पडणे

कुणा कुणाही कळल्यावाचुन
डाव मोडला घ्यावा आवरुन
हळवी फुंकर काळ ओठांतून
येवून जावी प्रकाश घेवून  

पेशी पेशी अवनत होवून
लाही लाही उरात विरून
बंध तुटावे सूटल्यावाचून
क्षण तो एक,मग अंधारून 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

पुंड






तुळतुळीत दाढी करून
कुणी दिलेला सेंट मारून
पुंड येतसे तावातावाने
तोंडामध्ये शिव्यास पेरून

भुंकण्याचा पगार तयास  
कुणी दिला असे ठरवून
मूर्ख काही अन दांडगट
त्या ठेवती डोई चढवून

एकेरीची ती ताकद त्याला
पुरेपूर माहिती असते
अन सभोवती तेच सैन्य
सारी ठरली नीती असते

कामापुरते मुखात त्याच्या
थोर पुरुष नाव असते
तिन्ही मकारी मोकळलेला
सारे वळूचे गाव असते

लबाड भामटा स्वपुजक
गटारी तो मुरला असतो
किळसवाणे अस्तित्व त्याचे
घरी फुटला नाला असतो

पण कुणीही त्याच्यासमोर
नाक दाबून धरत नाही
पोट भरते शिव्या स्त्रवून
पण ओकून दावत नाही  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

साधू





एक येईल रे कळ
मग सरेल रे खेळ
लाख करून याचना
नाही मिळणार वेळ

किती आरडा ओरड
तडफड त्या मनात    
जीव जाईल क्षणात
कोण ठेवेल ध्यानात

साधू मिटुनी घे डोळा
खेळ जाणुनी आंधळा
आत भरला चालला
सारा सुखाचा सोहळा

दिसे हरेक तयास
यमपुरीस निघाला
अन हव्यास बोजड
घट्ट हातात धरला

साधू उगाच बसला 
नाम स्पंदने भरला
देह टाकला राहीला
दीना कारणे उरला

ऐसा शोधूनी पुरुष 
जन्म कर रे सफळ
किती काळ वाहशील  
देह पोटाला केवळ

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...