मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शब्द कुटले खलबत्यात




शब्द कुटले खलबत्यात
शब्द मिसळले मस्त मिठात
शब्द तळले लाल तिखटात
कविता झाली ||
बाकी जिभेला साहू द्यावे
पाणी घडाभर पिवू द्यावे  
बरे वाईट बोलू द्यावे 
अनुभूती ती ||
रे रसिका नकोस चिडू
राग कुणावरती काढू
कवितेची वा पाने फाडू
दे सोडूनी ते ||
वृत्तनगरी कुणी फिरावे
मुक्त छंदी वा भटकावे
ज्या हवे ते त्याने घ्यावे
तोटा नाही ||
ज्ञानोबाचे आम्ही भिकारी
ऋण तुकयाचे जन्मभरी
बाकी तुमची कृपा सारी
तुम्हामुळे मी ||

विक्रांत प्रभाकर

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

तुझ्या हास्याचे तुषार






तू थकलेल्या मनाने
डोळ्यात सांज ओढून
दु:खाच्या काठावरती
जेव्हा असते बसून
लाखवेळा मनी माझ्या
विचार येती दाटून
द्यावा तुजला आधार
केवळ तुझा होवून
तू हसावे झऱ्यागत
मुग्धपणे खळाळून
तुझ्या हास्याचे तुषार
अन मी घ्यावे झेलून

 विक्रांत प्रभाकर

रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

खरच मी स्वप्नाला भितो




खरच मी स्वप्नाला  भितो
जर मी स्वप्नात गेलो
अन तू तिथे नसलीस तर
या कल्पनेनेच हवालदिल होतो
त्या विराण दुनियेला घाबरतो
खरच मी स्वप्नाला भितो

अन कदाचित जर
त्या स्वप्नात तू माझी नसलीस तर
अन्य  कुणाच्या गळ्यातील
हार झाली असशील तर
किती जरी थकलो तरी
डोळ्याला माझ्या डोळा न लागतो
खरच मी स्वप्नाला भितो

स्वप्न हाती कधीच नसते
नकोसे तर हमखास दिसते 
तुला गमावणे मी साहू न शकतो
स्वप्नातही दु:ख ते पेलू न शकतो
खरच मी स्वप्नाला भितो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

नकोच आता प्रेम जीवनी







नव्या वादळी पुन्हा उभी ती
जीवना पुढती दिड्मुख होती 
घडले होते काही आश्चर्यवत
मागितल्यावीन ये प्रेम वर्षत
परंतु थकले म्लान विरले
जीवन होते काही जाहले
वजा बेरीज तिला कळेना
व्यवहारी अन मेळ बसेना
चालून आले भाग्य थोरले
क्वचित जीवन देई असले
चार दिसांचे भाग्य तियेचे
सौख्य होते धुंद ऋतूचे
घ्यावे भोगून धुंद भारले
जावे विसरून दु;ख आतले
पुन्हा मिळो वा न मिळो
प्रीत समोरी आले कळो
ठिक आता परंतु नंतर
काय उद्याचे कळेल अंतर
आताच गेले होते हातून
बालपणीचे प्रेम ओघळून
रात्र काजळी उदासवाणी
होते जीवन एक विराणी
तसेच काही पुन्हा न होवो
दु;ख प्रीतीचे पुन्हा न येवो
तिच्या मनात अपरंपार
भरला होता दु:ख सागर
पुन्हा हवेचे झोत बेभान
येता सैरभैर झाले मन
नकोच आता प्रेम जीवनी
तिने अंती टाकिले ठरवूनी
व्यवहार अन ठोक मानुनी
वधूवर मंडळी केली नोंदणी

विक्रांत प्रभाकर


शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

तुला पाहणे





तुला पाहणे
असते गाणे
सांभाळले मन
पुन्हा वाहणे
खूप दिसांनी
पुनव पाहणे
मनी उजळणे
शुभ्र चांदणे
पुन्हा घडते
ते अनुभवने
आम्रवनातील
मन मोहरणे
जड गंधित  
श्वास होणे
नि ऐकू येणे
उरी धडधडणे
बहु कष्टाने
मज सावरणे
सांभाळून मी
तुज बोलणे

विक्रांत प्रभाकर



प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...