मंगळवार, १० जून, २०१४

शब्दात प्रेम बोलता






शब्दात प्रेम बोलता
आकाश भरून येते
सहस्त्र जलधारांनी
अनावर कोसळते
डोळ्यात प्रेम बोलता
पौर्णिमा स्वर्गीय होते
शीतलता तनामना
तप्त प्रतिक्षा संपते
स्पर्शात प्रेम बोलता
वेलीवरी अंकुरते
मृदल मंद उत्कट
कणोकणी रोमांचते
मौनात प्रेम बोलता
देणेघेणे शून्य होते
उपचार हद्दपार
द्वैतही मिटून जाते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, ९ जून, २०१४

अशी सखी ती जगा वेगळी






तळपत्या उन्हात ती
कामा मध्ये मग्न होती
लागेल ऊन जळेल कांती
तिला मुळी फिकीर नव्हती

किती वेगळी आहे ती
म्हणू तिजला काय नकळे
कैलासातील सुंदर लेणे
लोकगीत वा कुणी गाईले

खळखळत्या झऱ्यासारखे
तिचे अखंड कलकल बोल
मृद गंधाने मोहरलेली
तिच्या शब्दामधील ओल

अशी सखी ती जगा वेगळी
कणखर ठाम मुग्ध सावळी
तिच्या नकळत या जीवनी
आनंदाचा मेघच बनली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





दूर मी जाणार आहे






जेव्हा तू म्हणालीस
दूर मी जाणार आहे
नवे क्षितीज नवे आकाश
खांद्यावरी घेणार आहे
एक पोकळी अवकाळी
माझे मन व्यापून गेली
निराधार अन वावटळी
जाणिव क्षणात होवून गेली
बंध अजून नव्हते जुळले
तरीही काही तुटत गेले  
मावळले शब्द माझे
तुटक हुंकार फक्त उरले
तू स्वप्नांना उलगडतांना
एक नवे चित्र काढले
माझे तेव्हा मला दिसले
रंग सारे मावळलेले  
थोपटले मी मनास माझ्या  
आणि तुजला म्हटले
जा पुढे सदा जीवनी पण   
जुने पाहिजे का सुटले ?

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, ८ जून, २०१४

सखी !








जाणार जरी तू
नक्की असते
येणार कधी ते  
माहित नसते
भले थोरले
कुलूप कडीला
सदा न कदा
मला खिजवते
त्या दारावर
जीव माझा
एक बिचारे
लटकणे होते
अन खटखटता
कडी कुठली
मन बावरे
उगा धावते
चार शब्द
स्मित क्षणांचे
बाकी काही
कशात नसते
माझे वेडे
स्वप्न धुळीचे
सखी आभाळाला  
जावून भिडते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...