मंगळवार, ११ जून, २०१३

थर्माकोली सत्संग







शब्द शब्द मी ऐकत होतो

तरीही किती कोरडा होतो

मारून मुटकून भक्ती ती

उगाच गोळा करत होतो ll ll

अनुभूतीच्या प्रवाहात ते

चिंब चिंबसे भिजत होते

माझिया मनी ढग वांझोटे

पांढरे तेहि तिथे नव्हते ll ll

कुणा दिसे धवल ओंकार

कुणी ऐके नाद अनाहत

माझ्या पाठीस लागुन रग

खाली खडे ही होते टोचत ll ll

बसल्या बसल्या मग उगा

दिवा स्वप्ने ती पाहत होतो  

साक्षात्कार गुरुकृपा नि

मठ छानसा बांधत होतो ll ll

नव्हती श्रद्धा तरीही नम्र

नशीबा जणू अजमावत

त्या तयांच्या कृपाप्रसादात

थर्माकोल तो उगा वाहत ll ll

विक्रांत प्रभाकर

http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

सोमवार, १० जून, २०१३

ताईबाई(एक गॉंडमदर)



नउवारी लुगड्याचा
घट्ट पदर खोचून
ताईबाई चालतात
कोल्हापुरी घालून १
धाडधाड चालतात
फटकन बोलतात
घाबरून पोर त्यांना  
लपुनिया बसतात  २
पांढऱ्याशुभ्र केसांचा
मोठा बुचडा बांधून 
हातामध्ये भली मोठी   
कापडी पिशवी घेवून ३
दण दण ताईबाई
जाती जेव्हा रस्त्यातून 
सारी देती वाट त्यांना
जरा बाजूला होवून ४
देता कुणा नच कधी  
घेती हात आखडून
गाव सारे जाय त्यांच्या
घरी खावून पिवून ५
मांजरांनी घर सदा
असे त्यांचे भरलेले   
लेकी माझ्या गुणी साऱ्या
शब्द त्यांचे ठरलेले  ६
भल्यावर माया फार
देती सारे उधळून
वाईटाची चीड तशी   
दिसे शब्दा शब्दातून   ७
चालतात मग तोफा
जणू त्यांच्या तोंडातून
माऊलीच्या क्रोधाने नि
कधी हात सपाटून ८
शमताच पण राग  
तया जवळ जावून
करू नको असे पुन्हा
सांगती समजावून  ९
येता कधी आळीमध्ये
कुणावरती आपत्ती
ताईबाई धावूनिया
तेथे सर्वाआधी जाती १०
एकट्याच राहतात
त्या लहानश्या घरात
पोर गेला दंगलीत
अन पती लढाईत ११
पेलूनिया दु:ख सारे
घट्ट काळीज करून
साऱ्या देती आधार त्या   
जणू घरच्या होवून   १२
दररोज संध्याकाळी  
नच चुकता सतत   
फोटो पुढे लावतात
एक मोठी तेलवात   १३
शांतपणे  राहतात
डोळे आपुले मिटून
येण्याआधी डोळा पाणी
आळी निघे दणाणून १४  


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/
  

शनिवार, १ जून, २०१३

नको येवूस कधीही






नको येवूस तू कधी 

काही अडणार नाही

तुटुनिया गेली स्वप्ने 

शोके रडणार नाही



मी झेलीले आहे उरी

तप्त खदिरांगार ही

दु:खे कधीच कुठल्या  

आता जळणार नाही



फुंकले आयुष्य सारे

असा खचणार नाही

प्रीतीच्या नाटया तुझ्या   

पुन्हा बधणार नाही



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


मनाचे मनपण मिटू दे




मनाचे मनपण मिटू दे

देहाचे या भोगणे सुटू दे

माझ्या अवघ्या अस्तित्वावर

फक्त तुझे प्रेम उरू दे



भोगामध्ये लोळत आहे

मनामध्ये जळत आहे

तुझ्या वाचून विश्वंभरा

रोज रोज मरत आहे



असले कसले हे जगणे

चिंध्या जोडून वस्त्र नेसणे

फसवूनिया आपल्या मना 

सोंग सुखाचे उगा दाविणे



विक्रांत प्रभाकर

शुक्रवार, ३१ मे, २०१३

गोरी बायको कश्यासाठी ?




https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjLPft2uKrIkzfmtGnhM-eHR3hX6NEXK9ADJX-nl8v6AuEkDaqZCR87qj9xoQ5WxPsBQQTGAPyE79P4sym2KcQgmwHR3ALFkNsxgKNple7a9nJFVPCXo-8cAYz7Za45kj143DZmqoF1Um2/s320/Girl.bmp




गोरी बायको कश्यासाठी ?

लोकांनी पाह्ण्यासाठी

आपल्यावर जळण्यासाठी

त्यांना जळतांना  पाहून

आपण खुश होण्यासाठी .

गोरी बायको कश्यासाठी ?

समारंभी मिरवण्यासाठी

गर्दीत सांभाळण्यासाठी

सांभाळतांना तिला तसे

गर्दीत हिरो ठरण्यासाठी

गोरी बायको कश्यासाठी ?

गोरी पोर होण्यासाठी

कष्ट त्यांच्या लग्नाचे

आपोआप टाळण्यासाठी

गोरी बायको कश्यासाठी ?

कुणा विसरून जाण्यासाठी

तुझ्याहून सुंदर गोरी ...

असे काही जिरवण्यासाठी



विक्रांत प्रभाकर

 

त्याने होय म्हणताच




त्याने होय म्हणताच 
सर्वांगी हर्ष दाटला
थांब क्षणभर मना
जरा सावरू दे मला

स्वप्नातील स्वप्न असे
दिसे आज जागृतीला
जणू एक मोरपीस
स्पर्शले रे  हृदयाला 

आज साऱ्या तपस्येचे
पुण्य आले रे फळाला
याहून अधिक काही..
नाही नि नकोच मला 

त्याचा हरेक शब्द मी
हृदयामध्ये झेलला
देहातील कण कण
आज वादळ जाहला

हे खगांनो हे फुलांनो
सांगा हे साऱ्या जगाला
प्रकाश अन वाऱ्यानो
पसरा दाही दिशाला

विश्व पुरेना आनंदा
काय करु हृदयाला 
त्याने स्वीकारले मला
अर्थ जीवनाला आला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...