बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

नाते


नाते
****
भुई खिळलेले डोळे 
भाव पुसलेले खुळे 
तरी गंध परिमळे 
भरुनिया नभ निळे ॥१

नको सखी बाई अशी 
उगाचच शेला ओढू 
पापण्यात अडलेले 
काजळ ते उगा काढू ॥२

भेट तर होणारच 
जग फार मोठे नाही 
कोण भेटे कोण घटे 
नदीला त्या ठाव नाही ॥३

मागील ते जाऊ दे गं
सूर्य उगवतो नवा 
नात्याविन नाते कुठे 
शब्द कशाला ग हवा ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शहर




शहर
*****
आता हे शहर खूप वेगळे असे वाटते 
आकाश इथले आता फाटलेले दिसते ॥१

माणसे आहेत खरी माणसासारखी जरी 
कोष कीटकांची जिंदगी हर दिनी वाढते ॥२

उजाडते कधी इथे कळेना मावळते कधी 
शुभ्र एलईडी प्रकाश घर अहो रात्र वाहते ॥३

आलो होतो इथे मी स्वप्न रेशीमसे पाहत 
कर्म जगण्याचे उरे स्वप्न गर्दीत फाटते  ॥४

सजण्याची स्पर्धा इथे कुणा मारते वाढवते
छाटण्याची भीती अन प्रत्येक फांदीस वाटते ॥५

क्रमप्राप्त आहे जगणे हा देहभार वाहणे
जग वेशी पलीकडचे परी आहे रे खुणावते ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

दत्त स्वप्न


दत्त स्वप्न
******
स्वप्नातला दत्त दिसावा सत्यात 
चिन्मय ते स्मित यावे हृदयात ॥

बालिश मागणे माझे विनविणे 
खरे व्हावे  देवा पाऊली पडणे ॥

सरो तन मन सारे धनमान 
भक्तीचेच देवा मज द्यावे दान ॥
  
अवधूत गाणे गुंजावे रे मनी
तयात सुखाने जावे मी रंगूनी ॥

विक्रांत इवले पाहतसे स्वप्न 
दत्ता तुच व्हावे जगणे जीवन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

स्वामी राया

स्वामी राया
********
जन्म हा विकला तुज स्वामी राया 
तुझ्यावरी काया ओवाळली ॥१

किती सांभाळले आपदी रक्षिले 
येऊनी जपले कुण्या रुपी ॥२

दाखविला पथ यशही दाविले 
अपयशी दिले चटकेही ॥३

परी शिकविले जीवन दाविले 
धरून ठेविले दयाघना ॥४

आता करा देवा एक काम माझे 
दावी मज तुझे रुप डोळा ॥५

राहा निरंतर माझिया मनात 
चित्ती एकारत सर्वकाळ ॥६

विक्रांत जगाला स्वामी जगविला
स्वामीचाच झाला असे व्हावे ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

स्वप्न


स्वप्न
*****

रे तू माझ्या मनात आहे
हे तुजला माहित आहे 
डोळ्यातील स्वप्न माझे
नित्य तुजला पाहत आहे 

स्वप्न परंतु स्वप्नच असते
मना मोहून हरवून जाते 
आणि प्रभाती उठल्यावर
 तेच जगणे उभे ठाकते  

जगता जगता त्या वाटेने
तुज वाचून काही न रुचते 
तीच निराशा मनी दाटून 
प्राक्तन माझे मजला हसते

काय करू मी तुज भेटले 
तरी अजूनही नच भेटले 
नयना मधील भावभावना 
तव पदी का सुमन न झाले

तू न घेशील मज उचलूनी
जगणे नेईल दूर ओढूनी
सांग परी का कधी जाशील 
या हृदयातून प्रिया निघूनी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

नको मोक्ष

पाणी ओंजळीत
************
नको मज मोक्ष नसे स्वर्गी काज 
भक्तीचे ते व्याज सरू नये ॥१

सगुणी अखंड राहावा डुंबत 
दत्ताच्या रंगात रात्रंदिन ॥२

नको पैलतीर त्रासणे संसारी
सुखे ऐलतीरी जन्मा यावे ॥३

मागतो विक्रांत भाव सदोदित
पाणी ओंजळीत सागराचे ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

लाचावली जिव्हा

लाचावली जिव्हा
************
अन्ना लाचावली जिव्हा 
गेली चवीच्या गावाला 
ताट मांडूनिया तेच 
भूक लागे नाचायला ॥१

मृत संस्कार जुनाट 
आले देहात जन्माला 
षडरसी त्या रंगला 
प्राण तृषार्थ जाहला ॥२

मन ओढतसे मागे 
जिभ परी पटाईत
व्रत मोडूनिया म्हणे 
हीच जगण्याची रीत ॥३

कशी दत्ताची परीक्षा 
प्रश्न कठीण मठ्ठाला 
गुरु दिधल्या वाचून 
बळे लावी अभ्यासाला ॥ ४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

स्वामी राया

श्री स्वामी समर्थ
*************
स्वामी राया कीर्ती तुझी 
दुमदुमे साऱ्या जगी
घरोघरी सेवा तुझी
भक्त दंग नाम रंगी ॥१
अलोट तो भक्तीभाव 
तुझ्या दारी नित्य वारी 
तुझा भक्त मिरवे मी
नखाची त्या सर नाही ॥२
कृपाळा तू बोलविले 
घेतलेस पदावरी 
कसा होऊ उतराई 
तन मन तुझे करी ॥३
तुझ्या काजी देह पडो 
फक्त तुझे वेड लागो 
हृदयात निरंतर 
तुझ्यासाठी प्रेम जागो ॥४
रूप श्री स्वामी समर्थ 
शब्द श्री स्वामी समर्थ 
व्यापूनिया कणकण 
एकरूप करी चित्त ॥ .५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४

मोठेपण

 
मोठेपण
*******
दिलेस दातारा कैसे मोठेपण 
जगणे कठीण वाटतसे ॥
आधीच होतो मी भाराने वाकला 
त्यावरी ठेवला हौदा थोर ॥
डोके काढे अहं मिळता कारण 
तयाला कोंडून ठेवू किती ॥
मोडूनिया पाय बांधुनिया हात 
ठेविले युद्धात जैसे काही ॥
जरी सरू आली एक चकमक 
नच की ठाऊक पुढे किती ॥
थकलो लढून बापा मी शरण 
पांढरे निशान घेत हाती ॥
तयाकडे तुझा का रे काना डोळा 
लावी वाहायला ओझे आन ॥
ठेवशील तैसा राहीन मी देवा .
परी सदा ठेवा डोई हात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

ज्ञानदेव


ज्ञानदेव
******
अगा त्या शब्दात चालता फिरता 
धरूनिया हाता ज्ञानदेवा ॥

तेथे थांबे मन जगाचे चलन
अहंचे स्फुरण शून्य मात्र ॥

पाहे एकटक जाणिवेचा डोळा 
होऊनी आंधळा जगताला ॥

 दिसते जगणे प्रकाश उरले 
रंध्रात पेरले आत्मभान ॥

विक्रांत नमतो विक्रांता लवून 
विक्रांत भरून ज्ञानदेव ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०२४

महाकाळ

महाकाळ
********
कोण घालते जन्माला कोण मारते कशाला 
ढिग थडग्यांचा थोर गाव चितांनी भरला ॥

इथून तिथून सारी वाट अश्रुंनी भिजली 
कणाकणात आक्रोश माती खारट जाहली ॥ .

हवे पणाची आकांक्षा कुणा मिळवी मातीला 
हवे मिळविला तोही अंती मिसळे मातीला ॥

कधी कौरव पांडव ग्रीक येऊन लढले 
कोण आले रे कुठून कुठे वाहूनिया गेले ॥

जय काळाचा अंतिम हसे मरण ते गाली 
सृष्टी चालवती सत्ता मृत्यू रूपात नटली ॥

अगा महाकाळा तुला लाख लाखदा नमन 
तुझ्या कृपाळ कारणे सदा नूतन जीवन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

कोजागीरी पौर्णीमा

कोजागीरी पौर्णीमा
***************
पौर्णिमेच्या चांदण्यात अवचित आलीस तू
घेऊनिया  गुढ रम्य लावण्याचा आभास तू ॥ १

चांदण्यात भिजलेली मुर्त मर्मरी होतीस तू
मोहाचा डोह गर्दसा मेघ घननीळ झालीस तू ॥२

भांबावलो न स्मरे आज काय ते बोललीस तू 
थांबलीस काळ काही क्षण ते कोरून गेलीस तू ॥

जातांना जरा वळून डोळ्यांत अवखळ हसून 
येत अचानक मिठीत आग युगाची झालीस तू ॥४

छातीवर डोके ठेवून गंध मोगरी प्राणात भरून
दोन निखारे ओठावरती पेरूनिया गेलीस तू ॥५

झालो धुंद असा की मी वेडेपणा प्राणात रुजून
कळल्या वाचून मजलाही गाणी मनी पेरलीस तू ॥

जन्म जरी गेला वाहून हात हातीचा आणि सुटून
गेलो वाहत काळौघी तरीही माझ्यात उरलीस तू ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

उदे ग अंबे उदे ॥

उदे ग अंबे उदे ॥
***********
होऊ दे जागर आई प्राणात संचार
होऊ दे वावर आई हृदयात हुंकार
माझ्या अंबाबाईचा 
माझ्या दुर्गा माईचा
उदे ग अंबे उदे ॥

परज ग त्रिशूळ आई खड़ग तोमर 
मार ग रिपूकुळ आई निर्दाळ असूर
मार महिषासुर दुष्टाला 
या चंडमुंड यवनाला
उदे ग अंबे उदे ॥

धाव गं लवकर आई त्वरा त्वरा कर 
मी पसरतो हे कर आई घेई पायावर 
तुझ्या वेड्या  लेकराला
आई विक्रांत दासाला
उदे ग अंबे उदे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

खेळ

खेळ
****
प्रश्न सारे फुटलेले उत्तरेही रुळलेली 
वाट जीवनाची रूढ आहे तशीच चालली ॥१

तेच कष्ट तेच त्राण देही व्रण पेटलेले 
तेज तर्रार गारदी वध होणार ठरले ॥२

वेड्या आठवांनी खुळे स्वप्न वाटेत सांडले 
मंद मंद प्रकाशात भ्रम कोवळे डसले ॥३

खेळ जीवनाचा असा पुष्प जळात सोडले 
भेट सागराची कुणा कपारीत कोण गेले ॥४

कसा म्हणू मी मलाच पथ हवे रे सजले 
अंश कोटी कोटी माझे दुःख उरात बांधले ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

वात

वात
***
आकाराची वात चालली जळत 
प्रकाशाचे गाणे गात अंतरात

हरवत तम चार भिंतीतला 
बाहेर जरी का वारा वादळला

कुणा न मागणे कुणा न सांगणे 
स्निग्ध भिजलेले चैतन्य ते साने 

अंधाराचा राग ना रात्रीशी वैर 
उधळत तेज ज्योत राही स्थिर 

जन्म प्रकाशाचा धर्म चैतन्याचा 
नसे खेद श्लाघा तया जळण्याचा  

ऐसा जन्म देई मज प्रभू दत्ता
तुझ्या गाभाऱ्याचे भाग्य यावे माथा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

गुपित

गुपित
*****

तशी गोष्ट नवी नाही जगाला अज्ञात नाही
वाळू वरच्या रेषांचे पाणी कधी होत नाही ॥१
 
म्हटलं तर गुपित म्हटलं तर ते नाही
तुटलेल्या पतंगाचा गोत सापडत नाही ॥ २

आयुष्याला गंध येतो क्षण क्षण भरू जातो 
वाटसरु वेडा खुळा तरी का थांबत नाही ॥३

मग रक्त तापलेले खुळे डोळे भिजलेले
घेवूनी पथी निघता दिशा सापडत नाही ॥४

त्याचे पाय फाटलेले माथी उन तापलेले 
काही केल्या मुक्कामाचे पेणे सापडत नाही ॥५

दत्ता तुझे जग वेडे पुढ्यात साखर पेढे 
परी मुखी घालू जाता हात पोहचत नाही ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .



दसरा शुभेच्छा

 

सोनियाच्या क्षणांनी जीवन जावे भरूनी
 एक एक पान यावे सुखाने बहरूनी 
दैन्य दुःख निराशा झणी जाव्यात हरवूनी
आनंदाची बाग यावी नित्य फुलून जीवनी
लाख लाख शुभेच्छा येतात मनी दाटुनी 
प्रियजनांनो घ्यावे हे शब्दस्वर्ण स्वीकारुनी

शुभ दसरा ! 
डॉ . विक्रांत प्रभाकर तिकोणे आणि कुटुंब

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

तुझे शब्द

तुझे शब्द 
********

तुझे शब्द माझ्यासाठी 
जरी कधी नसतात 
तुझे शब्द भोवताली 
गरगर फिरतात 

तोच अर्थ त्याच खुणा 
खुणावती सदोदित 
बोलाविल्या वाचूनही 
खोलवर घुसतात 

किती काळ खणखण 
अव्याहत पडे घण 
अजून का ओल नाही 
रुक्ष उडे धुळी कण 

कातळात खोलवर 
झरा वाहे झुळझुळ 
किती रुंद किती खोल 
बोथटले शब्द बोल 

युगे झाली पहाडाला 
युगे झाली कातळाला 
झरतात किती थेंब 
साद देत जीवनाला

प्रलयाचे स्वप्न कुण्या 
अजूनही पुराणाला
वटवृक्ष पानावर 
जाग यावी बालकाला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

बाजार

बाजार
******
आता मी जगतो नाटक कळून 
स्वतःला दावून सुखदुःख ॥१

आले गेले धन मान अपमान 
हिशोब पुसून साठवले ॥२

अगा माझे इथे मुळी काही नाही 
ध्यान नित्य राही चित्तात या ॥३

लेक आणि बाळ सांभाळले बरं 
शिक्षण संस्कार देऊनिया ॥४

परि ती पाखर जातील उडून 
चित्तास म्हणून दार नाही ॥५

मित्रगोत्र सारे घडीचे पाहुणे 
आपले वाढणे पाही मन ॥६

विक्रांत निघाला दत्ताच्या गावाला 
सोडून भरला बाजार हा ॥७

 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

निरुपाय

निरुपाय
*****
फोफावतो निरुपाय सुटूनिया स्वप्न गाव 
ओठावरी मिटू जाते एक हृदयस्थ नाव 

कुठे देव सुटतात कधी व्रत मोडतात 
मांडलेली पूजा भिते दीप विझु लागतात 

तेच गीत कानी येते ठेक्यावरी मन गाते 
ठेच लागे उंबऱ्यात आणि दूध उतू जाते 

बांधलेल्या दिशा साऱ्या पायवाटा बंदीशाळा  स्वतःवर सक्ती स्वतः चाकोरीत चालण्याला .

चंद्रही दिसत नाही मोकळे आकाश कधी 
एक गाठ मारलेली रुततच जाते हृदी

दत्ता तुझे चालवणे आहे किती अवघड 
स्वप्न ओझे जन्मावरी मन होत आहे जड

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

मरणा

हे मरणा 
*******
मला घाबरवून रडवून नको घेऊस बोलावून 
मला छळून त्रास देऊन नको नेऊस पिटाळून 
मी येईन स्वतःहून या देहाचे गाठोडे घेऊन 
अन देईन टाकून तुझ्या दारात तुला सांगून
 बागुलबुवा आहेस तू आहे मी जाणून
श्वासाच्या शेवटचा मुक्काम तू आहे मी समजून    
तुला थांबण्याची उशिरा येण्याची 
ती भीक तर मी कधीच नाही मागणार 
मुका बहिरा आंधळा तू तुला काय कळणार
ते सोंगही असेल घेतलेले तू ओढून 
तरी मला  फरक नाही पडणार
 तू कुठे कचरलास 
राम कृष्ण बुद्ध यांना भेटायला
 तू कुठे थांबलास 
तुकाराम रामदास नानक कबीर यांना न्यायला 
तुझी असणे हा नसण्याचा जन्म आहे 
आधी जे होते ते 
जे नव्हते होते , नसणे होते
त्यात प्रवेशणे त्याला ना कसली

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

तुझे गाणे

तुझे गाणे
*****
तुझे गाणे तूच दिले 
तुझे गाणे तूच  नेले
कुणाचे ग काय गेले 
नभ सदा गर्द निळे 

तुझे रूप गुण गाता 
मन तुझे गाणे झाले
वाऱ्यावर हरवता
डोळा का ग पाणी आले 

ओठ जुळे ओठावर 
शीळ उठे रानभर 
थरारते वेळू रान 
व्रण कुण्या मनावर 

अजूनही  झिनझिन 
मिरवते पान पान 
ओघळून दव वेडे 
जन्म टाके ओवाळून 

मागते का गाणे कधी 
मोबदला परतीचा 
श्रुतीवर मोहरला 
अगा जन्म धन्य त्याचा 
 
विखुरले इंद्रधनु
रंग सारे उधळून 
हाती कुण्या नच आले 
नयनात तरंगुन 

तेही तुझे गाणे होते 
सप्त रंगी सुरावले 
तयातून तुच मज
जणू स्वप्न रूप दिले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. ..
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

दास


दास
****
हीन दीन दत्ता तुझा मी रे दास 
घेई हृदयास मजलागी ॥

नाही पुण्य गाठी नाही सेवा काही 
तूच तुझा देई बोध मज ॥

 जाणतो अजून बहु चालायचे 
तुज भेटायचे तप थोर ॥

चालतो पांगळा पाहतो आंधळा 
येता तुझ्या दारा दया घना ॥

म्हणुनिया माझ्या मनी काही धीर 
होऊ दे उशीर मर्जी तुझी ॥

तुझ्या पालखीचा असे मी रे भोई 
करूनिया घेई सेवा रुजू ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

मृगजळ


मृगजळ
*****

मृगजळा मागे धावणारे मन 
असते कारण मरणाला ॥१

असून बरड दृश्य भासमान 
थांबते न मन काही केल्या ॥२

आशेची सावली सुखाची तहान 
वाहते जीवन रात्रंदिन ॥३

वळो कृपाकर मेघ दिनावर 
तृष्णेची लहर मिटावया ॥४

एकला हा जीव अथांग हे रण 
दत्ता आठवण ठेव माझी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

डॉ.बावा


डॉक्टर बावा 
*********
जगातील सर्व टेन्शन 
ज्याच्याकडे यायला टाळत असतात
अन टरकत असतात
अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बावा

 कसे जगावे आनंदाने 
कसे राहावे शांतपणे 
अंतरामधील घोर बाहेर 
न दाखवता बिनघोरपणे 
आणि वेळ येताच भिडावे 
प्रसंगाला संकटाला  
त्याची पूर्ण टेहळणी करून  
हे युद्ध तंत्र त्याच्यात जन्मजात असावे
अन  कामाला म्हणावे तर
ते त्या कामाचे मूल्यमापन 
त्यांच्या दृष्टीने करून 
त्याला किती महत्व द्यायचे 
कुठे किती  करायचे हे ठरवत
आणि मग ठरवल्यावर
न कंटाळता  लाज न बाळगता
आपले 100% त्याला  देऊन 
ते काम ते फत्ते करीत *
किंवा सरळ त्याला 
डस्टबिन दाखवत असत .
"कुछ नही होता सर 
टेन्शन मत ले लो "
हे त्यांचे परवलीचे शब्द असत
म्हणून काम कसे करावे 
हे शिकावे बावा सरांकडून 

हा माणूस जगत मित्र 
म्हणून जन्माला आला 
असे मला नेहमी वाटते 
फक्त तुम्ही त्याच्यासारखे 
मनमोकळे स्पष्ट असायला हवे 
कद्रूपणा शूद्रपणा राजकारणीपणा
यांचा त्यांना अतिशय तिटकारा 
भांडण तंट्या पासून सदैव दूर जाणारा 
निसर्ग दत्त  सौम्यत्व असणारा 
त्यांचा स्वभाव !
डॉक्टर बावा एकदा मित्र झाला की 
आयुष्यभर मैत्री निभावणारा 
दिलदार सरळ सरदार माणूस
माणसे कशी जमवावीत 
कमवावीत आणि जवळ करावीत
हे ही त्यांच्याकडून शिकावे

तरीही व्यवहार ज्ञान हे त्यांच्यात
पूर्णपणे भरलेले आहे
त्यांना कोणीही असेच उल्लू 
बनवू शकत नव्हता 
कधी कधी मात्र ते 
आपण उल्लू बनलो 
असे सोंग घ्यायचे ते ही 
त्यांच्या फायद्याचेच असायचे

फाळणीनंतर पाकिस्तानातील 
पंजाबमधून आलेले 
बावा सरांचे वडील
त्यांचा धोरणीपणा लढाऊपणा
जिद्द मित्रता दूरदृष्टी
हे हे गुण बावा नेहमी वाखाणत
त्याचवेळी  बावामध्ये ही 
ते गुण मला दिसत

असा हा भला माणूस 
चांगला मित्र चांगला डॉक्टर 
आज निवृत होत आहे 
त्यांच्या सेवापूर्ती दिना निमित्त 
त्यांना खूप खूप शुभेच्छा !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

रंग

रंग **** एक माझा रंग आहे  रंग माझा मळलेला  लाल माती चढलेला भगव्यात गढलेला ॥ आत एक धिंगा चाले  मन एकांतात रंगे घरदार अवधूत  स्वप्...