शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

भर्तृहरी मन


भर्तृहरी (मन)
*****
ती नाही येणार परत आता 
मना दार बंद कर 
हे वाट पाहणे निरर्थक आहे 
हे रात्रभर जागणे व्यर्थ आहे 
आठवांच्या रानात भटकणे व्यर्थ आहे 

मध्यरात्री चिते समोर 
लवलवत्या अग्निरेखा समवेत
बसला होतास तू  रात्रभर जागत
ती रात्र अजून जळते आहे 
ती आग अजून भाजते आहे 
विझू देत आग ती 
होऊ देत राख ती 
आणि मग कर विसर्जित तिला
काळाच्या जल लहरीवर 

सुमनातली सुमने ती 
इथे अजूनही धूमसती 
जाऊ देत विरघळून मनातून ती
जशी गेली हरवून वास्तवातून

खरंच मना दार बंद कर

सगळे परत गेले होते 
सोबत आलेले 
समजूत घालून सांत्वन करून 
बराच वेळ थांबून 
हा तुझा अट्टाहास पाहून 
आपापल्या घरी अन 
निद्रेची चादर ओढून 
जगाला विसरून 
तसा तुही परत फिर 
वास्तव अंगिकार

ती का गेली कशी गेली ?
पुन्हा पुन्हा विचारून 
आक्रंदन करून 
परत कोणी येते का ?
कुठल्या फळाने कधी पडायचे 
असे कोण ठरवते का?
तुला माहित आहे सारे 
तरीही का राहिलास बसून ?
अरे  स्वतःला सावर
शोक आवर 
मना दार बंद कर 

दार बंद करणे म्हणजे 
पाप करणे नसते 
विस्मृतीच्या डोहात 
झिंगून बुडणे नसते 
प्रेमाचे सोनेरी क्षण 
विसरून जाणे नसते 
लाव्हेचा निर्मम 
दगड होणे नसते .

दार बंद करणे म्हणजे 
स्वीकारणे असते 
जे आहे ते 
वास्तव अन वर्तमान
आणि तिथूनच पुन्हा 
नवीन सुरू करणे असते

हा शोकव्याप्त धूर 
विस्कटणारे भगभगणारे 
बेभान  विचार काहूर 
तुला ध्वस्त करण्यापूर्वीच 
विवेक जागव सावर 
मना दार बंद कर 

तुला तुझ्यातून घेऊन जाणारा
जगापासून तोडणारा
आहे नाही च्या भ्रमात 
छिन्नभिन्न करणारा
मनस्कतेचा अंधार
दाटण्या पुर्वीच मना दार बंद कर


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निवडूंग

निवडूंग ****** स्वार्थाच्या पायरीवर जेव्हा  उभी राहतात माणसं आणि मिळालेल्या क्षणाचं  रूपांतर करू पाहतात फक्त फायद्यात स्वार्थात ...