शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

जीवन स्वीकार

जीवन स्वीकार
******

वितळणाऱ्या धुक्यागत 
जीवन हळूहळू सरत आले आहे 
या जगण्यातील आकार 
भ्रम हळूहळू विरघळत आहेत 
आणि आपण  कोणी नाही 
काही नाही 
याचे दर्शन हळूहळू स्पष्ट होत आहे
तसे म्हटले तर भय नाही 
या देहात अन मनात 
पण खंत जरूर आहे 
निसटून गेलेल्या क्षणांची 
विसरून गेलेल्या माणसांची 
मित्रांची  सग्या सोयर्‍यांची
त्या प्रिय जनांची
तसेच हुकलेल्या संधीची
ज्याचे झाले असते सोने
कदाचित.

मी आकाश आहे 
असे उंच उंच उडणाऱ्या 
झाडाच्या पानाला 
गवताच्या काडीला 
किंवा कणभर धुळीला 
वाटत असते
आणि ते खरेही असते
त्या क्षणी 
कुठल्यातरी नशिबाची हवा 
प्रसंगाची वावटळ 
घेऊन जाते माणसाला 
उंच अस्मानात 
आणि दाखवते 
एक विस्मित करणारे दृश्य 
त्या जगाच्या 
त्या आश्चर्यकारक देखाव्यात 
तो विसरून जातो 
स्वतःचे अस्तित्व 
आपलेअसलेपण 
आणि ते असीम दृश्य
पाहता-पाहता समजून जातो 
की मीच आकाश आहे 
पण थांबते ती हवा 
थांबते ते वादळ जेव्हा 
 लहरत पुन्हा येऊन पडतात 
ती अस्तित्व धरतीच्या कुशीत 
माती होऊन 

 पण ते माती होऊन पडणे
असते स्वरूपात मिळून जाणे
आपण जे काही असतो 
तिथे परतणे
आणि आणि ते घडते
प्रत्येकाच्याच बाबतीत 
अपरिहार्यपणे.

त्याच्या या संपूर्ण स्वीकारात 
किती अथांग अपार शांती असते 
किती सौख्य असते 
हे त्या स्वीकारावरतीच अवलंबून असते.
जीवनाच्या शेवटाचा
अंताचा स्वीकार 
हाच खरोखर 
जीवनाचा स्वीकार असतो  


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...