शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

शब्द आवर्त

शब्द आवर्त
*********

शब्दाच्या पलीकडे गेलेली तू 
अन् शब्दाच्या आवर्तात अडकलेला मी 
कोण सुखी आहे कुणास ठाऊक
आता तुझ्या जगात मी नाही 
माझ्या शब्दात तू नाही 
तरीही शब्दाच्या जगात प्रवेश करताना 
दाराशी दिसतेच तुझी सावली.

तो तुझा भास असतो का अदृश्य सहवास
माझ्या कविता रेखाटणारा
आता माझ्या शब्दात नसतेच 
तुझे रंग रूप 
नसतातच तुझ्या भावना 
नसतात घेतलेल्या आणाभाका 
किंवा निरोपाचे क्षण 
रेखाटलेले कधी काळी

त्या आदी अन्
अंत नसलेल्या अस्तित्वाला 
वाहिलेले असतात माझे शब्द 
त्याला नाम रूपात गुंतवून रेखाटून
भजत असतात
स्मरण असतात  
स्वत:ला सजवून 
सर्व काळ

पण का न कळे कधी कधी वाटते 
असावीस तू शेजारी 
माझ्यासोबत
ही प्रार्थनेतील शब्द फुले 
त्या सर्वव्यापी सनातनवर 
अर्पण करीत असताना 
भक्तीच्या चिंब भावनात भिजलेली 
मला अन सार्‍या जगताला विसरलेली

ती तुझ्यातून उलगडणारी 
भावभक्तीची आभा 
मला अस्तित्वाच्या
सुगंधी गाभ्यापर्यत नेणारी
 
अन् हे काय 
पुन्हा मला पाहतो मी 
त्याच शब्द आवर्तात
जरी की तू नसतेस कधी
माझ्या शब्दात.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठेवा

ठेवा ***" पुन्हा पुन्हा किती मागु तुला देवा  देई माझा ठेवा  मजलागी ॥१ देई रे भाकर एक चतकोर  तुझ्या दारावर  याचक मी ॥२  देई ...