वेडी बया
*******
ती एक वेडीच
अति मूर्ख बया
नाचे थयथया
डोक्यावरी ॥
काय तिज हवे
कळेना मजला
घोरची जीवाला
लावितसे ॥
उधळिते जन्म
गरज नसून
येतसे धावून
भ्रमात चि .॥
करीतसे हट्ट
हक्क तो नसून
जाते बजावून
काही बाही ॥
कुणीतरी सांगा
तिला वेडाबाई
मूढ घरी राही
अज्ञानाच्या॥
बोलावितो जिस
तिचा न हुंकार
हाक हाके वर
हिचे असे ॥
अशी अवधूता
करशी का थट्टा
अडव रे वाटा
तिच्या आता ॥
कोंडुनिया घाली
हवे तर बळे
मजला मोकळे
राहू दे रे ॥
ऐकू दे मनात
निजलेले गाणे
शारद चांदणे
लपेटून ॥
स्मृतींच्या पखाली
साठवली गाणी
गुढ आळवणी
सदोदित ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा