शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

नदी माय


नदी माय

पाण्यात या शिरू नका
पुराशी त्या खेळू नका
चिडली ही नदी माय
तीची साक्ष काढू नका

जीवनाची धात्री जरी
सारे नाही तिच्या हाती
वरुणाचे देणे कधी
जड होते तिच्या माथी

युगेयुगे धावती ती
तिला ठाव तीच गती
तेच पाणी दिसे तरी
नित्य नवी होते रिती

पाणियाचा धर्म पाणी
गाणे जीवनाची गाणी
खोलवर डोहामध्ये
परि कालियाची फणी

आदबीने वागायाचे
काठावर राहायाचे
सहज ती होता पुन्हा
अंगावरी लोळायाचे

देणारीही तीच आहे
घेणारीही होते कधी
म्हणून का होते कधी
लेकराची कमी प्रीती

तटाहून दारांमध्ये
दारातून घरामध्ये
आली तरी म्हणतो मी
माय माझे भाग्य मोठे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...