रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

शक्तिचा जागर



शक्तिचा जागर
**********
नावाला नवरा
घर संसाराला
सोडता तयाला
येत नाही ॥
टोचून बोलतो
मारतो गांजतो
उपाशी ठेवतो
वेळोवेळा ॥
न दे खर्च पाणी
म्हणे घे पाहूनी
मजा ये मारूनी
स्वतः परी ॥
देहावरी हक्क
दाखवू पाहतो
मारतो छळतो
नाकारता ॥
का गं बाई अशी
राहते संसारी
वार स्वतःवरी
झेलूनिया ॥
नको कोंडलेली
राहू गोठ्यातली
गाय गांजलेली
कदापी तू  ॥
कशाला हवाय
धनी कुंकवाचा
पुरुषी जगाचा
मक्तेदार ॥
आदिमाया तूच
ओळख स्वतःला
घेऊन शुलाला
सिद्ध होई ॥
करी गं हुंकार
मिरव गजर
शक्तीचा जागर
दावी जगा ॥
विक्रांत विनवी
निद्रिस्त शक्तीला
प्रकट रूपाला
करी आता ॥

**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...