बुधवार, १६ जुलै, २०२५

वारी

वारी
*****
येताच आषाढी निघाले भाविक 
बांधून पडशी जग हे मायीक ॥१
लोट लोटावरी धावती प्रेमाचे 
जणू अनिवार जल उधाणाचे ॥२
तयांची ती चिंता अवघी देवाला
सांभाळी चालवी धरून हाताला ॥३
चालतो कुणी घेऊन शिदोरी 
कुणी तो दुसरा मागतो भाकरी ॥४
वाहतो पाण्यात थोडासा कचरा 
पण निर्मळता नच सुटे जरा ॥५
धन्य पायपीट चालते सुखात 
देवाच्या कृपेची खूण पाऊलात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १५ जुलै, २०२५

पडणाऱ्या झाडास

पडणाऱ्या झाडास
************

झाड पडू आले झाडा कळू आले 
वेलीनी सोडले बंध सैल

आले घनघोर कुठले वादळ   
उपटली मूळ अर्ध्यावर 

कुठल्या सरीने देह कोसळेल 
लढाई सरेल जीवनाची 

कुठे वनदेव कुठे वनराणी 
गेली विसरूनी आज तुला

अरे पण थांब फुलल्यावाचून 
असा कोमेजून जावू नको

पडल्या वाचून थांब प्रिय वृक्षा 
गिळूनिया वक्षा व्यथा तुझी 

नाहीतर मग पाऊस थांबेन 
करपून रान जाईन सारे

खुरटेल बीज होत तगमग
आकसेल जग वनाचे या

नको सांगू तुझे दुःख पावसाला
पुन्हा रुजायला लाग त्वरे 

तुझी जिजीविषा दिसू दे जगाला
अन पावसाला पुनःपुन्हा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 





रविवार, १३ जुलै, २०२५

ज्ञानदेवी .

ज्ञानदेवी
*******
शब्द सोनियाचे अर्थ मोतीयाचे 
भाव अमृताचे काठोकाठ ॥१

स्वप्न भाविकांचे गीत साधकांचे 
गुज योगियांचे अद्भुत हे ॥२

सूर भिजलेले अक्षर मवाळ 
हरपला जाळ अंतरीचा ॥३

वाहे अविरत गंगौघ निर्मळ 
हरपला मळ चित्तातला ॥४

यारे सखायांनो सुख घ्या झेलून 
नाही रे याहून गोड काही ॥५

मज ज्ञानदेवी - हून अन्य पाही 
अगा प्रिय नाही ग्रंथ जगी ॥६

विक्रांता कृपेचा लाभुनिया कण 
कृतार्थ जीवन जाहले रे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १२ जुलै, २०२५

रुतलेली आठवण

रुतलेली आठवण
**************
मला घेरून राहिलेले
हे एकाकी एकटेपण
सवे माझी फुटकी नाव 
अन निरर्थक वल्ह्वणे

तरीही होतेच माझे हाक मारणे
गळा सुकवणे
सारे काही दिसत असूनही
कोणी येण्याची शक्यता नसूनही
डोळ्यात धुक दाटणे

अन दिसते अचानक 
एका उंच लाटेचे उठणे
नखशिखात भिजायचे ठरवूनही
उरते माझे कोरडे ठणठणीत राहणे

मग मीच होतो
ती नाव बुडू पाहणारी
पण ती रुतलेली आठवण
मला बुडू देत नाही ठेवते तरंगत
नव्या लाटेची प्रतीक्षा करण्यासाठी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

गुरुवार, १० जुलै, २०२५

गुरुदेव

गुरुदेव
*****
एक वारी दक्षिणेला एक जाय उत्तरेला 
तोच शोध अंतरात फक्त दिशा बदलला ॥

एक वारी गुरुपदी एक वारी देवपदी 
तोच ओघ सनातन धावत असे मूळपदी ॥

गुरु देव दाखवतो देव गुरु भेटवतो 
तेच शब्द बदलून मायाधीश खेळवतो ॥

तोच देव तोच गुरु असे देह देहातीत 
नभी चंद्र सूर्य तारे पाऊले ती प्रकाशात ॥

कुठे कृष्ण डोळीयात कुठे दत्त अंतरात 
स्वामी साई गजानन एकरूप विठ्ठलात ॥

बहुरूपी बहुवेशी खेळ खेळतो अनंत
साऱ्या दिशा मनाच्याच आकलना असे अंत ॥

धरुनिया दिशा एक मनाच्या या गावा जावे 
भेटेन ते श्रेय मग जयासाठी जग धावे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 
 

बुधवार, ९ जुलै, २०२५

दर्शन हेळा मात्रे

दर्शन हेळा मात्रे
************
पायावरी माथा होता
माथेकरी कुठे होता 
क्षण काळ हरवला 
क्षण सर्वव्यापी होता ॥
युगे युगे म्हणतात 
हरवले ते क्षणात 
ओळख की अनोळख 
विचारता कुठे होता ॥
मनपण हरवले 
देहाचेही भान गेले 
जणू शून्य साठवले 
जरी पाठी धक्का होता ॥
सावळीच मूर्ती परी 
कोंदाटली आभा होती 
कुणा ठाव काय इथे 
स्पर्श परिसाचा होता ॥
काही देही कोसळले 
काही चित्ती उमटले 
एक मिती उघडून 
कुणी तो हसत होता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

मंगळवार, १ जुलै, २०२५

सूत्र

सूत्र
*****
देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात 
आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात

जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे
यशापयश दोघांचा सहज स्वीकार आहे

सुख पांघरून झाले दुःख टाळून भोगले 
मार्ग मज जीवनाचे सारे कळून चुकले 

सिंधूसंगम येताच प्रवाह ही संथ होतो 
धावण्या वाहवण्याचा आवेग ही ओसरतो

आहे त्याच्या सोबत एक  होणे सागरात 
शरणागती सहज ही येते कणाकणात 

तुझी लाट भरतीची धाडेन मला उलट  
ओढ ओहोटीची किंवा नेईल खोल खेचत

मला कुठे पर्वा त्याची मी तुझ्यामध्ये नांदत
क्षण क्षण कण कण आहे केवळ जगत 

मीपण कुठले आता तुच तुझ्यात खेळत
सुखाची जगावरती सतत वर्षा करत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...