शुक्रवार, १६ मे, २०२५

बुद्ध


बुद्ध
****

या मातीचा बुद्ध 
पेरला या मातीत पुन्हा 
रुजवित्या मातीस 
पण कळेल बुद्ध केंव्हा .

सर्व धर्म जात पंथाचा 
बुद्ध असे विलय .
प्रज्ञेच्या पलीकडील 
शून्याचा तो प्रत्यय 

बुद्ध धर्म ना संप्रदाय 
बुद्ध गट ना समुदाय 
शब्द बदलून कुणा कधी
बुद्ध असा कळेल काय 

जाणण्यास बुद्ध व्हावा
शील करुणा उदय 
जाणण्यास बुद्ध व्हावा 
प्रज्ञेचा अनुयय 

बुद्ध युद्ध नव्हे रे 
तुझ्या माझ्या मताचे
बुद्ध वाद नव्हे रे 
तुझ्या माझ्या गटाचे

बुद्ध जीवन तत्त्वज्ञान 
असे प्रत्यक्ष जगण्याचे 
बुद्ध आत्म संशोधन 
विश्वाच्या कल्याणाचे .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


मंगळवार, ६ मे, २०२५

निवडूंग

निवडूंग
******
स्वार्थाच्या पायरीवर जेव्हा 
उभी राहतात माणसं
आणि मिळालेल्या क्षणाचं 
रूपांतर करू पाहतात
फक्त फायद्यात स्वार्थात 
लोटून देत सारे आधार 
त्याला टिकवणारे 
पडता पडता वाचवणारे 
धीर देणारे मैत्रीचे प्रेमाचे
तेव्हा त्यांनाही पडावेच लागते 
जावेच लागते प्रवाहपतीत होत 
त्याच उतारावरून 
आज नाहीतर उद्या घरंगळत 

खरंतरं काही क्षण काही काळ 
हा नसतो योग्य वैरास तरीही 
काही साथ काही हात 
नसतात उरणार सोबत तरीही 
त्यांना ते कळत नसतं
मग मैत्रीच्या वेलांचे निवडूंग होतात
जोवर त्या निवडुंगाचे फडे 
कुंपणावरअसतात तोवर ठीक असते
पण जेव्हा ते बांधावरील रोपांना 
आक्रसु लागतात बिनदिक्कतपणे 
पिसरून आपले काटे
तेव्हा त्यांचे निवडुंगपण स्मरून
त्यांना दूर ठेवणे भाग असते 
त्यांना ते कळो न कळो 
तुमच्यासाठी ते महत्त्वाचे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ५ मे, २०२५

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी 
*****
आनंदाची वाट आनंदे भरली 
कृपा ओघळली अंतरात ॥१

ज्ञानदेवी माझ्या जीवाचा विसावा 
पातलो मी गावा आनंदाच्या ॥२

अर्थातला अर्थ उघडे मनात 
चांदणे स्पर्शात कळो आले ॥३

मिरवावे सदा तया त्या शब्दात 
जगावे चित्रात रेखाटल्या ॥४

इतुकीच इच्छा उमटे चित्तात 
निजावे पानात शब्द होत ॥५

विक्रांत हरखे  सुखात तरंगे 
भान झाले उगे  भावर्थात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ४ मे, २०२५

माऊली

माऊली
*******
तुझ्यापायी काही घडो हे जगणे 
ज्ञानाई मागणे हेच आहे ॥१

सरो धावाधाव मागण्याचा भाव 
अतृप्तीचा गाव तोही नको ॥२

अर्भकाचे ओठी माऊलीची स्तन्य 
कुशीचे अभय सर्वकाळ ॥३

तैसे माझे पण उरो तुझे पायी 
नुरो चित्ता ठायी अन्य काही ॥४

विक्रांता प्रेमाची करी गे सावली
ज्ञानाई माऊली कृपनिधी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ३ मे, २०२५

रेघोट्या

रेघोट्या
******
मारुनी रेघोट्या 
साऱ्या घरभर 
उरली न जागा 
कुठे कणभर 

म्हणूनिया मग 
केला अवतार 
ओढून रेघोट्या 
हात गालावर 

काय ते कौतुक 
तुज पराक्रमी 
दाविले प्रेमाने 
मजला येऊनी 

रागवावे खोटे 
कौतुक करावे 
पराक्रमी तया 
किंवा मी हसावे 

कळल्या वाचून 
घेतला काढून 
फोटो तो हसून 
ठेवला जपून 

आज त्या क्षणाचे 
जाहले सुवर्ण 
पाहता डोळ्यात 
सुख ये दाटून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २ मे, २०२५

ज्ञानाई

ज्ञानाई 
******
तुझिया मनीचे घाल माझे मनी 
ज्ञानाई जीवनी कृपा करी ॥१

कळू देत भक्ती अहंभावातीत 
भाव शब्दातीत उरो मनी ॥२

जडू देत मूर्ति माय माझे चित्ती 
सदा तुझी कीर्ती मुखी यावी ॥३

घेऊन कुशीत सांग गुज गोष्टी 
सत्य स्वप्न दृष्टी कळो यावे ॥४

ज्ञानाचा भरून चोखट प्रकाश 
जगण्याचा भास मिटो जावा ॥५

विक्रांत लेकरू घेई कडेवरी 
जन्म येर झारी घालू नको ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .




बुधवार, ३० एप्रिल, २०२५

संगीता देशपांडे

संगीता देशपांडे ( निवृती दिन )
 ************
मोगरा पाहिला की मला 
दोन व्यक्तींची प्रकर्षाने आठवण येते 
एक म्हणजे ज्ञानेश्वर माऊली 
आणि दुसरी म्हणजे संगीता माऊली .
त्यापैकी पहिल्या आठवणीला 
सद्गुरूचा परमार्थिक स्पर्श आहे 
तर दुसऱ्या आठवणीला 
निखळ मैत्रीचा आनंदाचा स्पर्श आहे

संगीता दारातून ऑफिसमध्ये येताच
उधळला जायचा मोगऱ्याचा दरवळ 
आणि वातावरणात खळाळायची 
एक चैतन्याची प्रसन्न लहर 
 
तीच ऋजुता अन  तेच मार्दव मोगऱ्याचे 
तीच प्रफुल्लता अन शुभ्रता सद्गुणाची
ओसंडायची तिच्या शब्दात
तसेच स्नेहाचे मैत्रीचे मदतीचे आपुलकीचे
चांदणं पसरायचे तिच्या वागण्यात 

रती मॅडम म्हणायच्या 
संगीता तू इतनी अच्छी क्यू है ?
तेव्हा ती संकोचायची थोडी सुखावून 
काहीतरीच काय म्हणून 
द्यायची प्रतिक्रिया अवघडून
ते आठवतय मला अजून 

खरंतर मी नाही म्हणू शकलो 
हे वाक्य तिला कधीच !
पण मनात मात्र उमटायचा 
तोच भावार्थ कितीतरी वेळा .

खरंतर रती मॅडम हे वाक्य मला 
कुठल्या पारितोषिकापेक्षाही श्रेष्ठ वाटत
या वाक्यातच तिच्या व्यक्तिमत्त्वाच
संपूर्ण प्रतिबिंब पडत

संगीताच्या कामात असायची 
तत्परता अचूकतेचा ध्यास  कामाप्रती आवड 
कर्तव्यावी जाणीव अन संपूर्ण योगदान 
खरंच याहून अधिक काय लागते 
कामांमध्ये आनंद घ्यायला 

मी जेव्हा पाहतो माझ्या मनातील 
आदर्श आणि हवेसे 
मित्र कर्मचारी सहकारी 
कि ज्यांच्याकडे जाऊन  
सहजच भेटावे बोलावे वाटते 
एका निरपेक्ष आत्मियतेने 
या सर्व मित्रांच्या यादीत 
संगीताचा नंबर खूपच वरचा लागेल .

कधी कधी वाटते संगीताच्या 
स्वभावाचे आणि वृत्तीचे 
खूप क्लोन करून ठेवले पाहिजे 
या महानगरपालिकेत
तर मग ही मनपा होईल
स्वर्ग भूमीच सर्वांसाठी 

तेव्हा देतील धन्यवाद 
इथे येणारे सर्व रुग्ण 
तसेच रुग्णातलातील
कामगार आणि अधिकारीही 
त्या वृत्ती  विशिष्ट क्लोनला
म्हणजेच तुला आणि तुझ्या कामाला
पुन: पुन्हा  आणि पुनः पुन्हा

जे आम्ही देत आहोत तुला
पुन: पुन्हा . पुनः पुन्हा आणि पुनः पुन्हा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...