रविवार, २८ जानेवारी, २०२४

घरकुल

घरकुल
******
एक एक काडी आणूनी मांडला 
संसार रचला त्याने तिने ॥
होता तो करत रात्रंदिन कष्ट 
घरासाठी फक्त प्रिय त्याच्या ॥
आणि ती ठेवत हिशोब खर्चाचा 
एक एक पैशाचा नीटपणे ॥
हट्टा वाचून उडणारी पिले 
पोट जे भरले पुरे तया ॥
भरडे नेसली ठिगळ लावले 
अंग जे झाकले चिंता नाही ॥
चालले जीवन मायेच्या उबेत
सुखाच्या छायेत छान पैकी ॥
छोटेसे असते महा सुख किती 
कळे त्याची मिती आज मना ॥
अहा ते भाग्याचे रानच्या वाटेचे 
बोरी बाभळीचे धन्य झाले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

पालघर

पालघर 
******
तीच पाच बत्ती अन्
तीच मनीषा डेअरी 
परी किती वेगळी रे
दिसे दुनिया ही सारी 

ती घरे चिमुकली 
कुठे कशी हरवली
अन् घनगर्द झाडी ही 
कुणी गिळून टाकली  

तेच वसतिगृह जुने
तेच रुग्णालय पुराणे 
त्याच भिंती तेच जीने
स्नेहाचे परी मधु तराणे 

 रम्य त्या स्मृतीच्या 
खळाळत्या प्रवाहात 
अजूनही मन वाहते
नादवल्या यौवनात 

हळू हळू जग बदलते 
जुने जाते नवे येते 
नव्याखाली जुन्याचे पण
एक जिवंत गाणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️




शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

तुझा स्वर


तुझा स्वर
*******
पुन्हा पुन्हा कानात मी 
साठवते तुझा स्वर 
भाळते त्या वेळूवर 
वेळू वेड्या ओठावर ॥
पुन्हा पुन्हा ऐकूनही 
अतृप्तीच मनावर 
अविरत झरो गमे 
अमृताची ती धार ॥
काय तुला ठाव असे 
किती बोल ते मधुर 
अनभिज्ञ चंद्र जणू 
चांदणे किती टिपूर ॥
उंचावून मान वर 
जसा नाचतो चकोर 
तशी काही गत माझी 
होते श्रुती अनावर ॥
अन तुझे मौन जेव्हा 
घनावते दुरावून 
शोधते मी पडसाद
त्या स्मृतीच्या दरीतून ॥
तेव्हाही तेच गुंजन 
होते कणाकणातून
 तू तुझ्या वेळूसकट 
जात आहे मी होऊन ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

कारण

कारण
******
पुन्हा जगण्याला 
मिळाले कारण 
उदयाचली त्या
दिसला किरण ॥१
होती घनदाट 
दाटलेली निशा
पुन्हा प्रकाशल्या
आता दाही दिशा ॥२
पुन्हा उमटला 
खग रव कानी 
डोळा तरळले 
हलकेच पाणी ॥३
गंध प्राजक्ताचा 
भिजल्या पानाचा 
जहाला तनुला 
स्पर्श जीवनाचा ॥४
भेटे जिवलग .
सोयरा जीवाचा 
होतो मी एकटा 
जाहलो जगाचा ।५
विक्रांत आता रे.
भय सरू गेले 
आनंदाचे मूळ 
कुळ सापडले ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

घडो स्मित

घडो स्मित
********
तुझा राम तुझ्यासाठी राहू दे समर्थ ओठी
जाणतो स्मरण अन्य तुझ्यासाठी आडकाठी ॥१

अगा कोडे जीवनाचे कोणा कसे उलगडे 
परी खरे वाटते हे कुण्या जन्मी होते नाते ॥२

तत्व किती पुरातन वाहते हे जन्मातून 
भेटूनिया पुन्हा पुन्हा जाते पुन्हा हरवून ॥३

एक पुन्हा ताटातूट जरी दिसे डोळियांना 
साद घाली कोणीतरी अनादी या प्रेरणांना ॥४

ओंजळीत कधी वाटे तुझे तप्त दुःख घ्यावे 
परी तुझे निग्रहाचे हात कैसे उघडावे ॥५

अन् भिती मनी एक नको पुन्हा दुरावणे
उभा तुझ्या अंगणात घडो स्मित देणे घेणे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

देणे

देणे
****
देणे असतो कुणाचे आपण काहीतरी 
म्हणूनच तर जमतात सभोवती कोणीतरी 
तुम्हाला त्रास देणारे अथवा प्रेम करणारे 
कारण नसतांना कारण असताना
तुमच्या मनात बसणारे स्मृतीत ठसणारे 
जीवनात लुडबुडणारे तुम्हाला ओढून घेणारे 
जिथेजिथे मन चिकटते जेव्हाजेव्हा मन अडकते 
तेव्हा ते बंध ते भेटणे हे एक देणेच असते 
देणे सदैव पैशाचेच असते असे नाही तर 
ते देणे शब्दांचे भावनांचे मैत्रीचे वैराचे 
नजरेचे स्पर्शाचे रुचणारे टोचणारे 
भावणारे अथवा उबग आणणारे 
विविध रूपात समोर ठाकते 
प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात 
ते देणे भाग असते 
आणि देण्यातून सुटका होणे हे
देताना होणाऱ्या स्थितीवर अवलंबून असते 
अन्यथा देणेकरी वाढत जातात 
लाटा मागून लाटा येतच राहतात 
अर्थात कधीकधी ते देणेही हातातून निसटते 
आणि चिखलात खेळून येणाऱ्या मुलागत समोर उभे ठाकते 
पण मग त्याला साफ करणे आंघोळ घालणे क्रमपात्र असते आणि साधन त्यासाठीच असते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

सर्वत्र राम आहे



.आज राम सर्वत्र आहे २२/१/२४ 
*******
आज प्रत्येकाच्या प्राणात राम आहे 
आज प्रत्येकाच्या मनात राम आहे 
आज इथल्या कणाकणात राम आहे 
आज  साऱ्या त्रिभुवनात राम आहे
आज राम सर्वत्र आहे 

प्रेम करणाऱ्या भक्ताच्या डोळ्यात राम आहे 
नाम घेणाऱ्या साधकाच्या ओठात राम आहे
संसार मग्न माणसाच्या स्मरणात राम आहे 
आणि द्वेष करणाऱ्या चित्तातही राम आहे 
आज राम सर्वत्र आहे 

आज राम रांगोळी सजल्या अंगणात आहे 
आज राम दारा दारातील तोरणात आहे 
आज राम घराघरातील देवघरात आहे 
आज राम गगनाला भिडणाऱ्या नादात आहे 
आज राम सर्व व्यापी आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...