गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

सकाळ


सकाळ(उपक्रमा साठी)
*******

ती तशी सोनसकाळ  
फक्त येतसे एकदा 
दर शनिवारी शाळा 
गावी सकाळी भरता 

शाळेजवळील छोट्या
गल्लीतून तू येता 
दव अंथरून वाट 
तुझी पाहतसे वाटा 

त्या तिथे उगवतीला
सखी तुला पाहतांना 
सोनियाची आभा दाटे 
सवे तुझ्या चालतांना 

अन मी होतसे जणू
खुळा मंदावला वारा 
थबकून श्वास तेव्हा 
प्राण होई डोळी गोळा 

जणू नुकते नुकते
फुल एक उमलले 
मन होई भारावले 
जणू बहरुन आले

कानामागील तुझिया
रिबीनी फडफडता
खरंच सांगतो स्पर्श 
त्याचा मला होत होता 

अन विस्फारून डोळे 
ते तुझे मज पाहणे  
तुझ्या मनी कळे मज
माझे उतरत जाणे

बघता बघता वर्ष 
किती उलटून गेली
ती सकाळ अजूनही 
मनी आहे भारावली 

अन दुपार अजून 
कधीच ती होत नाही 
तुला पाहणे त्या क्षणी 
मनातून जात नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

मनापार


मनापार
:*****
अवघे जंगल 
आहे रे मनाचे 
सुंदर स्वप्नांचे 
गाव जरी ॥

काय मन कधी 
होय मना पार 
मनाचा शृंगार 
सोडुनिया ॥

मना हवी मुक्ती 
मना हवी भुक्ती 
मना हवी शक्ती 
मनासाठी ॥

मनाचा तुरुंग 
देईल का मुक्ती 
वाढवून शक्ती 
आपलीच ॥

मनाचा तुरुंग 
तुटल्या वाचून 
येईल घडून
कधी मुक्ती ॥

संताचे वचन 
मनात रूजून 
विक्रांत बसून
राही उगा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.२६३  

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

जनाजा

जनाजा
******
मनाला घालून 
देहाचे कफन 
चालले जीवन 
कब्रस्तानी ॥

असल्या वाचून 
अस्तित्व कुणाला
जनाजा चालला
शोकाकुल ॥

व्याकूळ रुदन 
येतसे आतून 
येईना दिसून 
घर तेही ॥

होणार दफन 
खणल्यावाचून 
अवघे असून 
रितेपण ॥

कुठली मंजिल 
कुठला माजरा 
अवघा पसारा 
स्वप्नातील ॥

विक्रांत चालला 
प्रवास थांबला 
असून नसला 
कारभार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.


मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

बीज


बीज रुजते 
झाड होते 
वर्षा मागून 
वर्ष जाते 

ऋतू येती 
आणि जाती 
बहर शिशिर 
उलगडती

जीवन पुढे 
जातच राहते 
कोण कुणा -
साठी थांबते

जया आरंभ 
तयास अंत 
वृक्ष कसा 
मग अपवाद 

कधी तुटतो 
तोडला जातो 
आकाश रिते 
सोडून जातो

होते इथे 
एक जीवन 
घर पक्षांचे
आणि गुंजन 

कुणा आठवते 
कोण विसरते
तेही काळा -
आड जाते 

नवे बीज 
दुसरे येते
त्या जागेवर 
हक्क सांगते 

नवा पसारा 
पुन्हा वाढतो 
फुलतो फळतो 
आणि सरतो 

ते आकाश 
तसेच साक्षी 
पुन: मातीच्या
बीज कुक्षी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

शंकर महाराजास


शंकर महाराजा
***********

शंकरा शंकरा 
स्वामीच्या लेकरा 
देवा प्रभुवरा 
कृपा करी ॥

सांभाळा सांभाळा
माझिया बाळाला
तुझिया पदाला 
आज आली ॥

ठेवी आनंदात
सदा सुखरूप 
सौख्य देई खूप
लाडकीला ॥

मोकळ्या मनाची 
विजयी बाण्याची
लाडाची कोडाची
स्वाभिमानी ॥

अहो महाराजा
पात्र तिज करा
मायाच्या संसारा
पार लावी॥

विक्रांत चाकर 
विनवि मालका 
कृपा या बालका 
करी बापा ॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.२७२

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

दोष


दोष
*****

असे नाही कि दोष हे
दिसत नाही मजला
असे नाही की ओहोळ 
मिळत नाही नदीला 

जरी जाणतो इथे की
मी नच गुणसागर 
वागवतो जन्मजात 
किती विचार विकार 

घालूनिया साकडे ते 
सदैव दत्तप्रभूला 
दोष सारे पाहतो हे 
जरी सदा धुवायला 

काम क्रोध लोभ मोह 
मीच आहे वाहणारा 
थांबती तरंग परी हे 
थांबताच क्षुब्ध  वारा 

थांबणारा वारा परी
कृपा असे खरोखर 
पडे जळी प्रतिबिंब 
शांत होता सरोवर 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘..



शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

भक्ती देई


भक्ती देई
*******

दत्ता देई भक्ती
तुझे गुण गाया
रूप वर्णावया
प्रेमभावे ॥

जरी वानवाच
तिचा माझ्या ठाई 
धनिक तो पाही 
दत्त बाप॥

जरी राजयाचा 
लेक हा ढोबळ 
सामर्थ्ये सबळ 
लोकमाजी ॥

दत्त शब्द येता 
माझ्या कवनात
दत्तकृपा त्यात 
उतरते ॥

अवघे दत्ताचे
करणे घडणे 
विक्रांत लिहणे 
नाममात्र ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.८/२४३ 

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...