सकाळ(उपक्रमा साठी)
*******
फक्त येतसे एकदा
दर शनिवारी शाळा
गावी सकाळी भरता
शाळेजवळील छोट्या
गल्लीतून तू येता
दव अंथरून वाट
तुझी पाहतसे वाटा
त्या तिथे उगवतीला
सखी तुला पाहतांना
सोनियाची आभा दाटे
सवे तुझ्या चालतांना
अन मी होतसे जणू
खुळा मंदावला वारा
थबकून श्वास तेव्हा
प्राण होई डोळी गोळा
जणू नुकते नुकते
फुल एक उमलले
मन होई भारावले
जणू बहरुन आले
कानामागील तुझिया
रिबीनी फडफडता
खरंच सांगतो स्पर्श
त्याचा मला होत होता
अन विस्फारून डोळे
ते तुझे मज पाहणे
तुझ्या मनी कळे मज
माझे उतरत जाणे
बघता बघता वर्ष
किती उलटून गेली
ती सकाळ अजूनही
मनी आहे भारावली
अन दुपार अजून
कधीच ती होत नाही
तुला पाहणे त्या क्षणी
मनातून जात नाही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा