शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

शोध

शोध
*****
या शब्दात शोधतो मी 
हे माझे नसले पण 
ओढून भाव-भावना 
देतो मलाच मी पण 

हे शब्द नसते तर 
येती कुठून विचार 
पाण्याविना उमटती 
का पाण्यातील आकार 

थांबती विचार जेव्हा 
नसतोच विचारक 
सरतो प्रकाश तेव्हा 
नसतोच प्रकाशक 

किती गूढ किती सोपे 
या पथाचे हे दर्शक 
निर्धार हवा पण रे 
नसते काही रंजक 

ना प्रकाश गंध रंग 
ना ज्योत नाद तरंग 
शून्यात कराया वस्ती 
का हवे कुणास अंग 

जे आहे ते रे कळणे 
सांडून स्वप्न जागणे 
तिथे काय मिळवणे ?
असल्याचे हे असणे 

हे शब्द पांघरलेली
विक्रांत सोडता वस्ती
जाणीव फक्त स्फु्रती
बंधने गळून पडती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...