गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

रायदास एक बेट (मला न कळलेले)


रायदास एक बेट (मला न कळलेले)
********
नदीमध्ये अगदी प्रवाहात 
एखादे बेट असते 
म्हटले तर ते नदीचेच असते 
म्हटले तर ते नदीचे नसते 

अगदी ठामपणे उभे असलेले 
प्रवाहाची तमा न बाळगता 
आपल्या असले पणात 
मग्न असलेले 

कधीकधी येते वादळ 
घनघोर महापूर 
बेटावरून पाणी वाहते 
बेट पाण्यात बुडून जाते 
आहे की नाही असे वाटते 
पण टळताच ती वेळ 
ते पुन्हा दिसू लागते 
पाण्याला विभागून 
खळखळाटात उभे असलेले 

कधीकधी त्यावर उगवते 
काही गवत काही  झुडपे 
काही वेलीही
त्यावर येतात फुलेही 
रानगंध ल्यायलेली 
बेट सांभाळते त्यांनाही 
पण तोवरच 
जोवर आभाळाची ओल असते 
येताच ग्रीष्म सरता वसंत 
होते वाताहत 
त्या सुकणाऱ्या झुडपांना 
ते बेट असून सभोवती
पाणी कधीच पुरवत नाही  
निसर्ग नियमात कधीच
ढवळाढवळ करत नाही

ते बेट कातळाचे 
वरून निर्लेप निर्विकार असते 
पण आतून खोलवर जडलेले असते
नदीच्या तळाशी भूकवचाशी 
आपल्यातील आपलेपणात दृढ !
खरे तर ते त्याचे बलस्थान असते
अन दुर्बळस्थान ही !!

कोणी कधी त्यावर उभारतो 
छोटसं मंदिर 
दगडाला शेंदूर लावून 
ठेवतो देवही त्यात 
रोवतो त्रिशूळ वगैरेही
कुठल्यातरी खड्ड्यात 
देतो दैवी रूप 
त्या बेटाला 
तेही ते स्वीकारते
हसत हसत स्वतःची 
कारण त्याला माहित असते 
ते असणार आहे 
पुढच्या पावसाळ्यापर्यंतच

नंतर तीच अतळ निर्विकार 
स्वमग्नता पांघरून 
पहुडणार असते 
ते प्रवाहात 
प्रवाहात न मिसळता.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव  साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा  पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात...