बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

पाणी नीती


पाणी नीती
*********

पाणी आले पाणी गेले 
पाण्याविन डोळे ओले 

बिल भरा टैक्स भरा 
आणि करा हात ओले 

काय पाणी हक्क आहे ?
अहो तुम्ही पक्के भोळे 

फेकताच पैसे थोडे
धावतील लोभी सारे 

हाच डाव सदोदित
खेळतात दुष्ट बळे

हतबल होत तुम्ही 
शरण ते हवे गेले  

तोच व्युह तोच तह 
पराभुत अडलेले  

कमावून राजा माल
सेनापती झोपलेले

चरफ़ड उगा मनी
जन अन गांजलेले 

साम दाम भेद दंड 
मार्ग आहे ठरलेले .

धुरिणांना काय सांगू 
तुम्ही जग जाणलेले  

शब्द तरी लिहतो मी 
तुम्ही मनी आणलेले 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .







मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

देव आहे पाठी

देव आहे पाठी
***********

सावली सारखा 
देव आहे पाठी  
उगा आटाआटी 
करू नको ॥

तयास काळजी 
उद्धरावा भक्त 
करूनिया मुक्त 
सवे न्यावा ॥

चाल दो पाऊले 
कष्टाने प्रेमाने 
तयासही येणे 
भाग मग ॥

पाहते रे माय 
लागू दे रे भूक 
देण्यास उत्सुक 
उभीच ती ॥

विक्रांत नको रे 
शोधणे बाजारी 
अमृत अंतरी 
वाट पाहे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

रेशीम गाठ

रेशीम गाठ 
********
गाठ रेशमी मृदुल 
कधी बसती जन्मास 
कोण मारते न कळे
भाग्य येवून भरास 

गाठ सुखावते मना 
द्वैत सुखावे भावना 
गाठी मागून ये गाठ 
गोड वाटते बंधना 

गाठ आवडे जयास 
नच काहीच सायास
वाटे नशिब फळले
पुण्य आले उदयास 

कुण्या करंट्या जीवास
गाठी लागतात टोचू
बंध लागले मनास 
उगा लागतात जाचू

गाठी सुटण्या सोडण्या 
जन्म  उताविळ होतो
फेरा चौर्‍यांशीचा डोळा 
त्याचा सतत पाहतो 

गाठ सोडता तोडता
जन्म होतो एक गुंता 
सुखा उबगतो जीव 
उरी बांधुनिया खंता  

वाही मनात विक्रांत 
काही काचणार्‍या गाठी 
काही सुटल्या तुटल्या
काही गाणी झाल्या ओठी 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .






सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

वादळ पाऊस

 

वादळ पाऊस
**********
रात्र आषाढी व्याकुळ 
वारा घोंगावे भेसूर 
पाणी वेढुन शहर 
जीवी उठले काहूर 

वाटा बुडाल्या जलात 
काय वाहते तयात 
रपरपतो पाऊस 
नाद गाजतो कानात 

थंड गारवा हवेत 
पक्षी घुसती छतात 
कुठे करूण आरोळ्या 
श्वान मारे आडोशात 

पाणी चढते पायरी 
चिंता सार्‍यांच्या नयनी 
दिवा लावून देव्हारी 
माय राहते बसुनी 

मोठी सरारते वीज 
लख्ख उजेड पाण्यात 
मग मेघांचा आकांत 
दणदणाणे जगात 

वृक्ष आकार भासती 
दैत्य बसले दडून 
देह वाहती विंधले 
फांद्या पडल्या तुटून 

असे पाहता पाहता 
निज घेई गवसून 
स्वप्न पाण्याचीच सारी 
लोंढा विक्राळ होऊन 

पाणी नसून श्वासात 
श्वास गुदमरणे आत 
धडपडून उठता 
जन्म दुसऱ्या जगात

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

देवपण माझे

देवपण माझे
*********

देव पण माझे 
माझ्यात साठले 
आज गवसले 
क्षणभर  ॥

जाणिवेची कळा 
चंद्र उघडला 
अमृत चाखला 
अंश मिया ॥

देहाचा देव्हारा 
जाणिवेचा देव 
स्वानंदाची पेव 
पूजा-अर्चा ॥

दिसला पडदा 
मीच उभारला 
जाणला मोकळा 
शुद्ध मार्ग ॥

नाथांचे विधान 
सहज प्रमाण 
विक्रांत जाणून 
हरखला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .



शनिवार, ३१ जुलै, २०२१

झोका

झोका 
******
धुंदावल्या मनाचा या
झोका उंचावर जाई 
बांधलेली दोर फांदी
तया मुळी भान नाही .॥

झोक्यावर झोका चाले
गतिला त्या अंत नाही 
तना मना कैफ चढे
काळवेळ बंध नाही  ॥

माझ्यासवे झोका माझा 
माझेपण तया येई 
वर खाली जग होई 
हर्ष शोक येई जाई ॥

पाहतांना खेळ वेडा
झोका दिसेनासा होई 
दोर फांदी झाड झोका
जणू एकरूप होई.॥

आकाशाचे अंग होता
सुख अन दु:ख नाही
निथळतो चंद्र नवा 
उतरणे होत नाही ॥

म्हटले तो झोका होतो 
म्हटले तो रिता होतो 
मन पवनाचा गाठी 
अवधूत  खुणा  देतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  .

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

दत्त आत्मतत्व

 दत्त आत्मतत्त्व 
दत्त जन्म सत्व 
दत्त सदोदित 
साक्षी रूप ॥

जरी जाणतो मी
गुह्य  हे प्रकट
होऊ दे प्रचित 
मायबापा ॥

सरो धावा धाव 
जळो उठाठेव 
मायेचे लाघव 
मनीचे या ॥

विक्रांत अलक्षी 
मन हे लागेना 
संसार सुटेना 
जमविला ॥

म्हणोनी धरीतो
हात तुझा दत्ता 
अर्पूनिया चित्ता 
तवपदी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...