गुरुवार, ६ मे, २०२१

शब्द



शब्द 
*********
धारदार शब्द जाती 
काळजाच्या आरपार 
रुततात तया कळे 
अवमानी काय मार 

मृदू मंद सांत्वनाचे 
शब्द देती मनाधार 
प्रिय ऋजु भावनांचे 
तरंगची जयावर 

गोड बोबड शब्दांनी
आनंदते घरदार
सौख्य असे स्वर्गीचे हे 
ओघळते अलवार 

लाडेलाडे शब्द काही 
नेती उंच झुल्यावर 
मोरपीस ह्रदयात 
जणू काही हळुवार 

शब्द कधी जाळणारे 
मनी सुड पेरणारे
जन्म सारा स्वाहाकार 
येवुनिया करणरे

तेच शब्द बाराखडी
तिच जीभ त्याच ओठी
बदलता मनोभुमी
जग सारे बदलती

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गाढव

-----------
गाढव
******

गाढवा घरी 
गाढव जमले
गाढव कोण 
ते शोधू लागले .॥
एक म्हणाले 
कायदा गाढव 
नाही रे मिडीया 
दुसरे  वदले ॥
टोपीला बोट 
त्रयाने दाविले 
कुणी कामाला 
फुकट जुंमले ॥
वाद जाहाला 
गोंधळ उडाला 
लाथा लाथांचा 
पावुस पडला ॥
एक शहाणा 
तो कुठुन आला 
आणिक तया 
सांगु हे लागला ॥
तुम्ही सगळे 
गाढव जमले 
दुगाण्या खावून 
नाकाड फुटले ॥ 
आणि गाढवा
गाढव मिळाले
डोईस त्याच्या 
लेबल लागले ॥
विक्रांत आता 
बहू पस्तावतो 
लेबल माथा 
लाजे मिरवितो॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘




बुधवार, ५ मे, २०२१

प्रार्थना

प्रार्थना
*****::

हरवले साथी 
जीवलग किती 
महामारी हाती 
अवधूता ॥

कुणाचे प्रारब्ध 
काय होते दत्ता 
मिटू गेल्या गाथा 
अर्ध्यातच ॥

स्वप्नांचे तुकडे 
किती विखुरले 
मांडव तुटले 
सुमनांचे ॥

कसला हा खेळ 
शापित ही वेळ 
उरी घालमेल 
चाललेली ॥

कुणी का उठावे 
रंगल्या डावात
आपल्या घरात 
नाही व्हावे ॥

चुकल्या माकल्या 
तुझ्या लेकरांना 
तारी दयाघना 
कृपाळूवा ॥

विक्रांत अज्ञानी 
पाप पुण्याविना 
करितो प्रार्थना 
तुझ्यापायी ॥

थोपवा आवरा 
मरणाचा वारा 
विषाला उतारा 
द्यावा देवा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, ४ मे, २०२१

गुरूमाय


गुरु माय 
*******
तुझ्या कृपेविन
सरतात दिन 
पेटलेले प्राण 
अहोरात्र ॥

जन्माच्या गर्दीत 
हरवले पथ 
खिळल्या ओझ्यात
श्वास जड ॥

तुझी प्रेम उब
डोळ्यात भरून
रहावे पडून
कोनाड्यात ॥

याहून अधिक
काही ना मागणं 
नको देणं-घेणं
संसाराचे ॥

फाटलेले पंख 
तुटलेले पाय 
पतंगा न भय
मरणाचे ॥

जाणतो विक्रांत
हाती नच काही 
गुरुकृपा होई
तेव्हा होई ॥

तोवरी माउली
साहे गे आकांत 
भुक या पोटात 
दर्शनाची ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, ३ मे, २०२१

झपाटणे


झपाटणे
*******

माना तुम्ही वा मानू नका 
पण एक खरे असते 
कधीतरी तुमच्याही मागे 
एक पिशाच्च लागते 

बाभळीच्या झुडुपामधून 
चिंचेच्या वा झाडावरून 
तुमच्या जीवनात 
उगाचच डोकावते 

तुमच्याकडे नसतो मंत्र 
पळविण्याचे अथवा तंत्र 
मग तुम्हीच पळत सुटता 
भुताला त्या टाळू पाहता 

पण भूत हे तर भुतच असते 
पछाडणे हे त्याच्या 
स्वभावातच असते 
पण दोष तुमचाच असतो 
तुम्हीच ते  कधीकाळी 
कुठल्यातरी संध्याकाळी 
गेला होतात ओढ्या जवळी 
 
अथवा कुण्या वेळी अवेळी 
चिंचेच्या त्या झाडाखाली 
बसला म्हणत व्याकूळ गाणी 
त्या क्षणी कळल्यावाचूनी
तुम्हा पाहिले असते कोणी 
मागे वळूनी  पाहील्यावाचुनि
तुम्ही बसता स्मित देऊनी 

वाऱ्याच्या लहरीवरी 
मोगऱ्याचा गंध येतो 
हवेमध्ये हलकेच
हिरवा चुडा खणखणतो

ते हसणे मग होते दुखणे 
ते गाणे मग होते मरणे 
कदाचित त्या भुतालाही 
त्याचे भूतपण ठाऊक नसते 
वार्‍याच्या लहरी वरती 
उगाच तरंगणे कळत नसते 

तुम्हाला भुताने झपाटणे 
तुमचे भुतापुढे हतबल होणे 
काहीतरी विचित्र घडते 
एक कविता भणभणती 
जन्मभर त्रास देते


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘



ओळख

ओळख
******
🌺🌺🌺

नयनी सजली
ओळख पुसली 
मान वळवली 
कुणी कुठे  ॥१

ते यार कालचे 
यार न उरले 
सुर हरवले 
मनातले ॥२

मैत्री हरवली
प्रिती विसरली
नाती उखडली
खोटी खोटी ॥३

असाच असतो
जग व्यवहार 
नका मनावर 
घेऊ उगा ॥४

गरज सरता 
जग विसरते 
ओळख राहते 
मनामध्ये ॥५

म्हणून गड्यांनो
तुम्हा विनवितो 
जे अनुभवतो 
ते सांगतो ॥६

एक अवधूत
ह्रदयी धरा रे
विसरून सारे
स्वस्थ बसा ॥७

घडता ओळख 
जडता जीव तो 
कधी न सोडतो 
जीवलगा ॥८

मित्र तोच तो
सदैव असतो
आणिक रक्षतो
पदोपदी ॥९

सुखात संगत
दुःखात सोबत 
नाहीच मागत 
मोबदला ॥१०

ओळख घडता
प्रियकर होतो 
व्यापून उरतो 
जगण्याला॥११

संत संगतीत
ओळख घडते
मग ना नुरते
हवे काही॥१२

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, २ मे, २०२१

येई रे साक्षात

येई रे साक्षात
**********

कुठले वंदावे 
पाय मी ते आता 
कुणा त्राता दाता 
म्हणावे रे ॥
सारे संमोहनी 
सारे सुरक्षित 
बंद कळपात 
चाललेले ॥
जन्माचा फुटका 
गळतो मटका 
संसार लटका 
कळतोय ॥
येई रे साक्षात 
हात घे हातात 
हट्ट या मनात 
दाटलेला ॥
असो लिहलेले 
कोणी कुठे काही 
नको ती रे वही 
दुसऱ्याची ॥
प्रभू दत्तात्रेया 
दावा थोडी दया 
जन्म हा रे वाया 
नच जावा.॥
विक्रांत मनात
खोल रितेपण
दत्ता तुजविन 
कोण भरे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...