रविवार, १ डिसेंबर, २०१९

भेट होत नाही (ऋतू)




ऋतू
***
लाख ऋतू गेले तरी
ऋतू  का तो येत नाही
फुटून कणकण हा
का रे फुले होत नाही

पांघरले देहावरी
तेज लाख तारकांचे
पेटून जाणिवा जन्म
का हा दीप होत नाही

मावळतो दिन माझा
रोज रात्रीत नाहतो
थांबून क्षण काळ हा
तव भेट होत नाही

येवो आभाळ खालती
जग थांबणार नाही
निरर्थ जाणून सारे
शोधणे थांबत नाही

जगी त्रांगडे असे हे
हवे ते मिळत नाही
पाणी जातसे वाहून
पाहणे थांबत नाही

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

आदि शक्ति



आदि शक्ति
*******

गहन शून्याच्या
अगम्य गूढ अंधारातून
प्रकटलीस तू
चैतन्यमय ज्योत होऊन
अनंत असीम अकालाला
लाभले मोजमाप
अन् क्षण जन्माला आला

काळाच्या प्रत्येक पदावर
उमटवित आपली मुद्रा
तू झालीस सृष्टी
अणुरेणूंपासून अवकाशा पर्यंत
व्यापून सारे चराचर
तुझ्या जडव्याळ खेळातील
मी माझे अस्तित्व
म्हणजे तूच आहेस
हे जाणून लीन झालो
तव चरणाशी

पण मला वेगळे ठेवून
तू चालू ठेवतेस तुझे नाट्य
आणि त्या नाट्यातील माझे नर्तन

हे भगवती ! हे जगदंब !!
त्या तुझ्या इच्छेचा स्वीकार करून
माझ्या  इच्छा आणि अनिच्छेसकट
मी राहतो पाहात
तुझे अनाकलनीय मनोहर
रौद्र सुंदर रूप
अन् माझ्या जगण्या मरणातील
हा क्षण काळ
जातो झळाळून चैतन्य होऊन
तुझ्या कृपेने
तो ही तूच असून
मी घेतो माझा म्हणून


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

डॉ .माडी शेट्टी ( श्रद्धांजली )






डॉ .माडी शेट्टी ( श्रद्धांजली )
*************

चिमटीत धरून विल्स
ओढायचा कधी तो  
अन् दु:ख अनामिक
फुंकायचा कधी तो .

कधी असे वागणे की
वाटायचा बेछूट तो
कधी बोल ऐसे की
जीवी जाई खोल तो

चालणे तंद्रित असे    
की तरंगे हवेत तो
कामात घुसे  खोल
पण कामात नसे तो

हेल काही दक्षिणेचे
कोरुन ओठात  तो
सहजी आव सर्वज्ञेचा  
असे क्षणी आणत तो  

तीस वर्ष पाहून ही
नव्हताच माहित तो  
अपना होस्टेल मधील  
शेजारी जरी माझा तो

वेगळेच जगणे त्याचे
वेगळेच दु:ख होते
वेगळेच वागणे अन
मरण हि वेगळे होते

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गिरनार




गिरनार 
******

अहा दाटला हा 
भक्तांचा सागर 
एकेक अपार 
पुण्यराशी 

करतात घोष 
प्रेमी चालतात 
तुझिया दारात 
रात्रंदिन 

जय गिरनारी 
मुखी म्हणतात 
धुरीण होतात 
पुण्यपद 

दाटे घनदाट 
कृपेची स्पंदन
होय हरवणं 
नाद लयी 

जन्मो जन्मांतरी 
येई बोलावण 
घडते चालण
यया स्थानी

 किती एक साधू 
दाटले विरागी 
चालले बैरागी 
तुजसाठी 

जटाजूट कुणी 
भस्म  पांघरले 
लंगोटी ल्यायले 
फक्त कुणी 

किती वेशभूषा 
किती एक माळा
भक्त गोतावळा 
लक्षणीय 

जाहलो मी कण
तयाच्या इथला 
देह हा खिळला 
जणू काही 

घडली ही यात्रा 
ऐसी अद्भुत 
सवे अवधूत 
नेई मज  

पाहतो विक्रांत 
मनात बसून 
डोळे हे मिटून 
पुन्हा सारे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*****

मागणे



मागणे

मागावे ते काय
तुज दयाघना
मागणा-या मना
करी तुझा

मागण्याचा सोस
मिटणार कधी
मागणे ही व्याधी
पुरे झाली

मागीतले धन
आयु आरोग्य ही
अंत तया नाही
काही केल्या

मागावे मी तुज
हरवून सारे
ऐसी बुध्दी दे रे
दयाघना

मागणे  शब्दही
जावो हरवून
अर्थ  मावळून
पुर्णपणे

बघ घडतेची
पुन्हा हे मागणे
उगा  उगे पणे
राहे मग

विक्रांत दत्ताचा
मौनी हरवून
गेला विसरून
मागणे ते

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

दत्त बडवीत होते



 दत्त बडवीत होते 
***************

सुटलाच गंध शेवटी 
ते झाकले प्रेत होते 
उडणे कफन हे तर 
केवळ निमित्त होते 

का मारतोस चकरा
तिथे कुणीच नव्हते 
होणार शेवटी काय 
तुजला माहित होते

नेहमीच आड वाटे 
फसवे भूत असते 
करण्यास वाटमारी 
 सारे सभ्य जात होते

जग गोजरे दुरून  
आत जळत असते 
देण्यास मिठी तू जाता 
मूर्ख फसगत होते

रे रडसी तू कशाला 
झाले ते होणार होते 
तू मान मनी सुख की 
दत्त बडवीत होते 

विक्रांत जग असे का 
सांग कधीच नव्हते 
ओपून उरात खंजर 
मित्रही हसत होते

अजून प्याला रिता हा
मागतो विश्वास खोटे 
त्या सजल्या बाटलीत
विष काळकूट होते

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

कुरुक्षेत्र


कुरुक्षेत्र
******
उभारली ध्वजा
अगतिक प्रजा
पहातसे मजा
सूत्रधार ॥
झाले डावपेच
सावध चतुर
होताच फितूर
आप्त मित्र ॥
कोण फसवितो
कुणाला  कळेना
होवून वंचना
असे कुणी ॥
कुणा मिळे काय
आम्हा त्यांचे काय
जगण्या उपाय
तोची जुना ॥
हा तो युगोयुगी
चालतसे खेळ
जमविणे बळ
कुरुक्षेत्री ॥
दत्ता हे कुणाचे
असे रे प्रारब्ध
विक्रांत निशब्द
त्याच्या पुढे ॥
****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...