गुरुवार, ४ जुलै, २०१९

सुटो अहंकार




सुटो अहंकार
********

माझिया मनाचा
सुटो अहंकार
जेणे तुझे दार
अडविले ॥

होऊन धुकट
येते तुझ्या आड
डोळ्यास झापड
लावतसे ॥

तूच माझा सखा
स्वप्न सजविता
मरणाची गर्ता
चुकविता ॥

इवल्या फुंकरी
सरू दे आभाळ
कृपेची सकाळ
करी बापा ॥

नाव अवधूत
गाजो तुझे मही
त्राही त्राही पाही
विक्रांता या ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


बुधवार, ३ जुलै, २०१९

नेई मज दत्ता




नेई मज दत्ता
पुन्हा चांदण्यात
पुन्हा पावलात
स्वर्ग नांदो ॥

पुन्हा माथ्यावरी
झळाळो तो चंद्र
ओघळावा सांद्रतुही मनी ॥

तीच लवलव
हिरव्या पानात
चंदरी रसात
दिसू दे रे ॥

कभिन्न कातळी
हरूनियां भान
माझे हे मी पण
जाऊ दे रे ॥

दरीतला वारा
येऊ दे भरारा
मनाचा पिसारा
फुलू दे रे ॥

साद कानांवर
जय गिरणार
पुन्हा एकवार
पडू दे रे ॥

लोभस ती मूर्ती
दिसू दे चरण
डोळ्यात भरून
पाहू दे रे ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

मंगळवार, २ जुलै, २०१९

आई






लायकी वाचून
नाही ना धावत
तुजला मागत
प्रेम प्रभू ॥
बाळ हे मळले
घाणीत पडले
आईने त्यजिले
काय कधी ॥
तैसा जरी मज
दोषांनी वेढले
वाया घालविले
जन्मात या ॥
घेई गे जवळ
करी गे सांभाळ
करून सकळ
दोष दूर ॥
कुपुत्रा सुपुत्र
करण्याचे बळ
तुजला केवळ
मायबाप ॥
विक्रांत वाचाळ
बोलतो बरळ
करिसी सरळ
दत्तात्रेया.॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
****०००००

सोमवार, १ जुलै, २०१९

तुझी आठवण


तुझी आठवण
**********
तुझी आठवण
आयुष्य भरून
चांदणे होऊन
ओघळते ॥

माझ्या अंधारात
क्षणभर पेटून
देई वरदान
प्रकाशाचे॥

जावे हरवून
तुझाच होवून
मी माझेपण
वाटे सदा॥

दुनिया जरी ही
बाजार होऊन
जातेय घेऊन
रोज मला॥

खुळी जरी मम
स्वप्न हरवून
सरले जीवन
नटलेले॥

खेद खंत नच
कधी ये दाटून
तुझाच होवून
जगतो मी॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

प्रेम उधानले ओले




 प्रेम उधानले
********

प्रेम उधानले ओले
गर्द आभाळ हे झाले
मन मृदुल मवाळ
नवे अंकुर फुटले  ॥ 

आस डोळ्यात दाटली
कुण्या रूपात खिळली
किती सांगावे जीवाला
होडी  वादळी धावली  ॥

युगे उलटली तरी
तोच हव्यास साजरा 
घन ओथंबले तन 
मिठी मारते अंधारा ॥

जादू स्पर्शात दाटते
कुण्या पुसट क्षणाला
जन्म हरवतो पुन्हा
त्याच स्तिमित पळाला ॥

ओझे मनाचे सुटते 
उगा प्रतिष्ठा गोठले
पंख भरारती मुक्त
स्वप्न पाहत सावळे ॥

ओढ अनाम अतृप्त
जन्मा वेढून राहते
काया थकली कोवळी 
कुण्या शोधात शिणते ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

रविवार, ३० जून, २०१९

डॉक्टर शेखर वामन फुलपगार .



डॉक्टर शेखर वामन फुलपगार .

आपले एक मित्रांचे कोंडाळे असते
 त्यातील बहुतेक मित्र हे
आपले आपल्या सारखे
आपल्या मार्गाने चालणारे
आपल्यासारखा विचार करणारे
असे असतात पण
त्यात एक वेगळा मित्र असतो
तो बंडखोर खोडकर आणि
बेधडक स्वभावाचा असतो

आमच्या मित्रांच्या कोंडाळ्यात
डॉक्टर शेखर फुलपगार असा एक
आगळावेगळा मित्र आहे .
खरंतर हे एक अगम्य अद्भुत असे
वेगळे रसायन आहे,
जे भल्याभल्यांनाही कळत नाही.
कुणाला तो उद्धट वाटतो
कोणाला रागीट
कुणी त्याला विक्षिप्त हि म्हणते
तर कुणाला अतिशय जीवलग
आणि जीवाला जीव देणारा असा वाटतो .
कोणाला तो अतिशय धूर्त
आणि आतल्या गाठीचा वाटतो
तर कोणाला एकदम मोकळा ढाकअसा
वा कुणी त्याच्यावर
विलासी असल्याचा आक्षेप घेतो
तर कुणाला तो अत्यंत
कुटुंबवत्सल असा वाटतो .

तो कसाही असो पण
आपल्या पद्धतीने
आपले जीवन जगणारा असा आहे
आणि असे जगताना तो
कुणाचीही मुलाहिजा बाळगत नाही
एवढे मात्र खरे .
एका अर्थाने तो एक विलक्षण मित्र आहे .
तो हरहुन्नरी स्वभाव असलेला
जगाची जाण असलेला
जगाचे छक्केपंजे कळणारा
जगाशी छक्केपंजे खेळणारा
असा अवलिया माणूस आहे
मित्रांच्या भाषेत बोलायचे तर
एकदम अवली माणूस आहे .
या माणसाने जीवनात
खूप स्वप्न  पाहिली 
अन त्या स्वप्ना मागे तो झपाटून धावला.
यातील काही स्वप्ने यांनी पूर्ण केलीही,
काही अजूनही अपूर्ण आहेत
अन तो त्यांच्या मागे जाणे
कधीही सोडणार नाही
हे मला पक्के माहीत आहे.

या माणसाने जीवनात
अनेक दुःख सहन केले आहेत
अनेक पराभवही सहन केले आहेत.
पण या माणसाने कधीच
 हार मानली नाही
राखेतून उठणाऱ्या त्या
सुवर्ण पक्षासारखा
हा पुन्हा पुन्हा उठून उभा राहत आहे
फिनिक्स अाहे हा.

या माणसाचे आणखी एक वैशिष्ट आहे,
 ते म्हणजे त्यांच्यावर जर
अन्याय झाला असे त्याला वाटले
तर त्याविरुद्ध तो चवताळून उभा राहतो .
आणि मी मी म्हणणाऱ्यांशी सरळ पंगा घेतो
त्याची  मते म्हणजे जणू काही
दगडात कोरून काढलेले शिलालेख आहेत !
 एकदम पक्की!
 भले ती तुम्हाला पटोत वा ना पटोत
आवडोत अथवा न आवडोत
याच्याशी त्याला देणेघेणे नसते.
कारण ती तो कधीच बदलणार नसतो
 त्यामुळे तुम्हाला शेखरला
स्वीकारायचे असेल तर
त्याच्या माता सकट
स्वीकारले स्वीकारावे लागते.

 भले तर तुम्ही त्या मतांकडे
कानाडोळा करा
पण त्याला विरोध करू नका
कारण जर त्याला विरोध झाला
तर तो बंडखोर जागा होतो
आणि तुमच्याशी वाग युद्ध हे होणारच
वाद प्रतिवाद विवाद हे होणारच
त्या साठी कितीही वेळ लागो ,
अर्थात तो वाद संपल्यानंतर
त्याच्याशी असलेल्या मैत्रीला
कधीही तडा जाणार नाही
 याची मात्र सगळ्यांना खात्री असते .

तर असा हा अनेक खाचाखोचा असलेला
हरहुन्नरी मित्र आहे.
 त्याचा मनुष्य संग्रह प्रचंड आहे
त्यामुळे कधी कधी असे वाटते
हा मनुष्य म्हणजे स्वतःच एक संस्था आहे.
अशी संस्था जी कधीही निवृत्त होत नाही .
या माणसाला तुम्ही लाखवेळा सांगा
आता रिटायर होत आहेस
आराम कर
तो तसे कधीही आणि कदापि घडणार नाही
कारण जीवनामध्ये सतत
कार्यरत राहणे
या माणसाला त्याच्या जगण्याला
उर्जा देत राहणार आहेत.
ते त्याच्या जगण्याचे साधन आहे
असे मला वाटते म्हणून मी असे म्हणेल
की मित्रा तुझा हा अनिवृत्त प्रवास
असाच अव्याहत चालू राहू दे.
तू नवनवीन आव्हान घेत रहा.
त्यांना झेलत ,सतत लढत राहा
आणि विजयी होत राहा
 तुझ्यासाठी हि सदिच्छा .

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

शनिवार, २९ जून, २०१९

नेमिनाथ देरासरी



नेमिनाथ देरासरी
***************
नेमीनाथ देरासरी
होता ऊर्जेचा सागर
खाली नमिता श्रद्धेने
माझी भरली घागर ॥
मूर्त उदार गंभीर
लखलखीत सावळी
मंद प्रकाशात पित
दिसे सुवर्ण झळाळी ॥
शांत भगिनी समोर
जणू प्रत्यक्ष विरक्ती
लाख आशिष भेटले
तया पदी जाता दृष्टी ॥
चित्र कोरीव मंदिरी
भान हरपे पाहाता
मज सांगती जाहाली
किती शब्देविना कथा ॥
देवा प्राचीन सुंदरा
कृपा मजवरी करा
भक्ती विरक्ती अहिंसा
माझ्या जीवनात भरा ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...