रविवार, २६ मे, २०१९

का रे उशीर श्रीपादा




का रे उशीर 

पायाखालती वाळू तापली  
नसे माथ्याला कुठे सावली ॥

कंठ सुकला टाहो आटला
चाल चालूनी उर फुटला ॥

त्राण सुटले गात्र थकले 
आणि अवघे यत्न सरले॥

आता केवळ तुझ्या भरोसा 
दिगंबरा रे सरो निराशा ॥

दत्त म्हणता उभा ठाकसी
तुझी ना रे कीर्ती ही ऐसी

मजसाठी मग का उशीर 
धाव श्रीपाद करुणाकर ॥

विक्रांतचे या हसे होवू दे
बोल नावा तव न येवू दे ॥

श्री अवधूता धाव कृपाळा
शरणागता प्रभू सांभाळा‍ ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २५ मे, २०१९

दत्ता मित्र दे रे



मित्र दे रे
*****

संवाद साधून 
घेई समजून 
व्यर्थ व्यवधान 
सुटे मग ॥

सुटे अभिमान 
शंकेचे कारण 
मैत्रीचे मरण
होई जेणे॥

देई रे हसून
घेई रे हसून 
उघडी बोलून 
कथा व्यथा ॥

होताच अवघे 
मित्र जिवलग
आनंदाची बाग 
जग होय ॥

दिल्याविना काही 
मिळत ते नाही 
कर्माची ही पाही
रित असे ॥

विक्रांत मैत्रीला 
सदैव भुकेला 
सांगतो दत्ताला 
मित्र दे रे ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

  



शुक्रवार, २४ मे, २०१९

दत्ता नको असे



देव नोटांची  
*************

दत्ताला नोटांची 
नको असे थप्पी 
मोजतो तो जपी 
तद्रूपता ॥ 

दत्ता नच दावू 
नाणी खुळखुळ
विश्वाला समूळ 
कारक जो 

दत्ता न  पापात  
कधी दे आधार 
शिक्षेला सादर 
होय तिथे 

दत्त नच देत 
दुर्जनास बळ
धावतो  केवळ 
भक्तासाठी ॥

दत्त  ना लोभी 
सोन्याचा कधीही 
विरक्त विदेही
सर्वकाळ ॥

दत्ता नच हवी 
दानाची ती पेटी
आपुल्या आवडी 
भक्त ठेवी 

दत्त नच काळ्या 
पैशात तो भागी 
भक्ति प्रेम मागी  
सदोदित ॥

दत्त कधी वाटा 
कर्माच्या न मोडी
करी खाडाखोडी 
प्रारब्धात॥

दत्त नच साथी 
कुठल्या  सत्तेला 
धार्जीन नफ्याला
वाणीयाच्या ॥

कदा नच  पाही 
परीक्षा दीनांची
पोट ती जयांची 
खपाटीला ॥

दत्तसे फळीला 
दत्तसे भिंतीला 
खिशात ठेवला
प्रेमभरे ॥

दत्त देई अर्थ  
उगा जगण्याला  
विक्रांत मनाला
आसावल्या ॥

******
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

नावडो कुटाळ





नावडो कुटाळ
*********  

भोगाची आवड
न लागो मजला
पुजो न धनाला
मन माझे

इंद्रिया सवडी
जावू नये भान
आनंद निधान
प्रिय वाटो

नावडो कुटाळ
हीनाचा तो संग
करून निसंग
ठेवी मज


दत्ता मज देई
रुचि स्वसुखाची  
तुझिया प्रेमाची
सर्वकाळ

विक्रांत करुणा
भाकतो प्रभूची
माव स्वहिताची
जाणूनिया

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २२ मे, २०१९

हेच तप


हेच तप
************
टोचतात काटे
पायास म्हणून 
पायच तोडून
घेतो कुणी ?

उंबर्‍यास ठेच
लागली म्हणून   
घर पेटवून
देतो कुणी ?

ऐसे काही घडे
बुद्धिचिये डोळे
होवूनी आंधळे
जाय जरी

काय म्हणु तया
दुर्दैवी जीवाला
विवेक सोडला
ज्याने ऐसा

घडते जगती
सारे प्रारब्धाने
म्हणूनि साहणे
हेच तप

भोगतो मी दत्ता
सारे तुझे देणे
वेदनेचे गाणे
मान्य मला

विक्रांत शरण
जाय दिगंबरा
मेघुटास वारा
नेई तैसा

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २१ मे, २०१९

दत्ता दत्ता मीत हो रे




दत्ता दत्ता मीत हो रे
तुझी फक्त प्रीत दे रे
तव गुण गाण्यासाठी
तूच तुझे गीत दे रे 

दत्ता दत्ता थेट ये रे
कडकडून भेट दे रे
तन मन हरो माझे 
असे काही वेड दे रे 

दत्ता दत्ता माझा हो रे
देह तुझ्या काजा घे रे 
मी पणे जडावला हा 
असह्यसा बोजा ने रे

भजतांना तुज दत्ता 
भजणेही सरू दे रे 
सारे जीवन तूझिया 
पदी लीन होवू दे रे


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, २० मे, २०१९

आलो गिरनारी





आलो गिरनारी देवा
हाक ऐकून आतली
धाव धावून प्रेमाने
जिवलग म्यां पाहिली 

आधी भेटलो शिवाला
भवनाथांच्या रूपाला
धूळ संतांच्या वाटेची
मग लावली भाळाला 

असे पायथ्याला बळी
बाहू उभारून प्रेमे  
भ्या उभ्याने हसत
भेटे मारुती सुखाने 

गात अलख अलख
गेलो गुहेमध्ये खोल
गोपीचंद भृतहरी
देती जीवास या ओल

आई नमिली अंबाजी
शक्ति पीठ ते थोरले
तिचे शक्ती कृपेमुळे
पावुलात आले 

जैन सिद्धनाथ थो
भेटे अरिष्टनेमी ही
तया संनिधी लागली
ज्योत शांतीची ह्रदयी

उंच शिखरी गोरक्ष
प्रिय सखा तो दिसला
त्याच्या मिठीत नयनी
पूर आनंदाचा आला 

मग दिसले शिखर
भाव झाले अनावर
देव दत्तात्रेय माझा
माझ्या जीवाचे जिव्हार

झाले चरण दर्शन
गेलो सुखे वेटाळून
गुरू सानिध्य क्षणाचे
यात्रा विक्रांत संपूर्ण 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...