बुधवार, २२ मे, २०१९

हेच तप


हेच तप
************
टोचतात काटे
पायास म्हणून 
पायच तोडून
घेतो कुणी ?

उंबर्‍यास ठेच
लागली म्हणून   
घर पेटवून
देतो कुणी ?

ऐसे काही घडे
बुद्धिचिये डोळे
होवूनी आंधळे
जाय जरी

काय म्हणु तया
दुर्दैवी जीवाला
विवेक सोडला
ज्याने ऐसा

घडते जगती
सारे प्रारब्धाने
म्हणूनि साहणे
हेच तप

भोगतो मी दत्ता
सारे तुझे देणे
वेदनेचे गाणे
मान्य मला

विक्रांत शरण
जाय दिगंबरा
मेघुटास वारा
नेई तैसा

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...