सोमवार, १५ एप्रिल, २०१९

दत्ताचे पाईक






दत्ताचे पाईक
*********

तुम्ही भाग्यवान
दत्ताचे पाईक
बंधू सकळिक
पुण्यवंत 

पादुका दर्शन
घडले तुम्हाला 
चैतन्ये न्हाईला  
ज्योतिर्मय 

केली गिरनारी 
प्रभू तुम्ही वारी
आनंद वोवरी
वावरला ॥

परम पावन
दत्ताचे अंगण
पाहिले जाऊन
काय वाणू ॥

आले बोलावणे
घडे तया जाणे
व्यर्थ ते चालणे
इतरांचे ॥

विक्रांत वंदीतो
तुमच्या पदाला
स्पर्शा ज्या घडला
गिरनार ॥

***
श्री गुरुदेव दत्त 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

****


रविवार, १४ एप्रिल, २०१९

स्वप्न

I
****

चांद झुल्यात रुपेरी
स्वप्न सजून बसली
सुख आनंदी नाचरी
स्निग्ध प्रेमाने भारली

स्वप्न सानुली इवली
तारा टिकल्या एवढी
चार भिंतीत स्नेहाच्या
राही भरुनी तेवढी

स्वप्न ओंजळ भरली
हाती प्रसाद ठेवली
लाख आशिष तयात
कृपा जीवन ल्यायली

स्वप्न क्षणांची मनाची
झाडावरच्या खगांची
सदा चिवचीव मनी
जाग नवीन दिसाची

जग स्वप्नांचे आकाश
दाट वर्षने भरले
ताप जीवनाचे सारे
जणू सुखविण्या आले

स्वप्न आशा आकांक्षांचे
रूप कोंदण जीवनी
स्वप्न कातळात सुप्त
जणू ठेवलेली लेणी

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, १३ एप्रिल, २०१९

दत्त राम




दत्त राम
*****

राम माझिया  मनात 
दत्त होऊन बसला
राम वदता भजता 
दत्त स्वरूपी दिसला 

दत्त तोच रामराय
प्रभू  सर्वत्र भरला
देव विरागी तापसी
माझ्या हृदयी बसला

झोळी खडावा नि छाटी
धुनी आकाश धरती
रामा दयाघना दत्ता
याच रूपावर प्रीती

दत्त विठ्ठल सावळा
दत्त रामात ठसला
दत्त कैवारी काशीत
शिवरूपात ओतला

भेद अभेदा सहित
देई रामराया मिठी
रूप अवधूत तुझे
मज दिसू दे रे दिठी

म्हणो एकांगी विक्रांत
द्वैत खेळात पडला
दत्तचित्ताच्या स्थितित
आत्म खेळात रंगला



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

दत्ताच्या कृपेने




दत्ताच्या कृपेने 
चालला हा जन्म 
अन्यथा मरून 
गेलो होतो 

घडते जगणे
दत्ताला स्मरत 
प्रारब्धा जाळत 
साठलेल्या 

काय केले पुण्य 
सखे बाई मी ग 
आनंदाचे जग 
सारे झाले 

आता फक्त एक 
मनात या हेत
पाहू डोळियात 
छबी त्यांची 

मग हा विक्रांत 
दत्त कीर्ती गंध 
होऊन विश्वात 
पसरेल ॥

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

****


शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

जरी या मनात




जरी या मनात 
आहे दृढभाव 
राजा दत्तराव 
स्वामी माझा ॥ 

घडेना तयाची  
काही केल्या सेवा 
लाडका मी व्हावा 
हेतू पूर्ण ॥ 

भजन पूजन 
तयाचे स्मरण 
नाम संकीर्तन 
किती न्यून ॥

करतो बोभाट 
सांगतो जगात 
राहतो दत्तात
आम्ही सुखी ॥

हाय पण जाते
दाही दिशा मन 
संसारी रुतून 
बसे सदा ॥

जेणे हे जीवन 
दत्ता रात्र दिन
राही चिटकून 
तुज लागी ॥

विक्रांत प्रार्थतो
करावा उपाव 
तुम्ही स्वामीराव 
मज साठी 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

महात्मा ज्योतिबा फुले



महात्मा ज्योतिबा  फुले
******
ज्योतीबा,
तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत
जगत आहोत आम्ही
समतेची स्वातंत्र्याची फळे
चाखत आहोत आम्ही
तू पेटवलेल्या ज्योतीने
आज उजळले आहे
सारे आकाश
या भारतभूमीचे
खरंच इतके सार्थ नाव
या भूमीवर
क्वचितच असेल कुणाचे

मान्य आहे
काही विषमता आहे अजूनही
बरेच शोषणही आहे अजूनही
पण त्याविरुद्ध लढणारा अंगारही
तेवढाच तेजस्वी आहे अजूनही
अन दलदलीतून बाहेर आलेले
हे समाजमन उभे आहे आता
आपल्या पावलावर
देहावर साचलेली
सारी घाण झटकून
या साऱ्याचा उद्गाता आहेस तू
आशेचा निर्माता आहेस तू

कर्मठांच्या किल्ल्यात राहून
लखलखलास  तू
अंधारातील दीप होऊन
अग्नीत पडलेल्या गंजलेल्या
लोहकणांचा परिस आहेस तू
काताळातही शिल्प पाहणारा
शिल्पकार आहेस तू

आज जरी बहुजन वापरणारी
ढाल झाला आहेस तू
धूर्त राजकारणी
स्वार्थी मतलबी लोकांसाठी
एक प्रतिमा झाला आहेस तू
तरीही मी जाणतो की
शोषितांच्या जगातील 
पहिला सूर्य आहेस तू
कोटी कोटी नमनाचा
धनी आहेस तू 
खराखुरा आणि एकमेव
महात्मा आहेस तू

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मागणे ते नाही फार




मागणे ते नाही फार 
तुजवर दत्ता  भार ॥

र्त आहे  माझी थोडी  
 फक्त  देई तुझी गोडी  

दुनियेची सरो गोठी
स्वरूपात राहू दिठी॥

मोकलून साऱ्या आशा 
करी तुझा प्रेमा पिसा

रूप रस गंध नाद 
हरवो रे तुझियात ॥

विक्रांतचा अस्तित्वास 
देई जाणिवेचा ध्यास 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...