बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

या क्षणी



या क्षणी
******

इथे तिथे गळतात सारखी पिकली पाने
तरी किती आनंदाने जीवन गातेय गाणे

चक्र जीवन मरणाचे हे असेआदिम फिरे
उठतो तरंग आणि पुन्हा पाण्यात विरे

आले किती गेले किती ते कुणाला न गिनती
येणार की थांबणार नच कुणास माहिती

कालचे ते झाले काल ओघळले रे खालती
स्मरूणी तया सारखे काय येणार ते हाती

उद्या असे मनातले स्वप्न जागे पणातले
फुल जसे नभातले वा जल मृगजळातले

या क्षणीच आहेस तू क्षण हा जगून घे रे
स्थिरावता वर्तमानी जन्म गूढ  कळेन रे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

जडल्या जीवाचे *

जडल्या जीवाचे
**********

जडल्या जीवाचे
करू तरी काय
सरले उपाय
सारे आता

कासावीस मन
ओढाळ होऊन
येतसे धावून
तुझ्याकडे

आनंदे पाहिन
हृदय ठेवींन
जीव हा वाहीन
तुझ्या पदी

डोळिया दाटली
माझिया कृष्णाई
देवा नरहरी
भेटी देई

विक्रांत याचक
भक्तीचा भिकारी
तुझिया पायरी
आसावला ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

वृंदा



वृंदा
***** 
वृंदा तुला करायचं होतं का
लग्न विष्णूशी कधी
जालिंदरचा मृतनंतर ?
तू सती गेली 
त्याच्या प्रेमासाठी 
देहा चे बलिदान करून 
प्रेमाचा तात्कालीन 
अंतिम उद्गार 
वास्तवात आणून
पण तुझ्या मृत्यूनंतर 
बलिदानानंतर ही 
त्यांनीतोडून टाकला
तुझा अन् जालिंदरचा संबंध 
कायमचाच
त्यावर घालून 
प्रभू प्रेमाचा आवरण 
आणि आम्ही मिरवतो आहोत 
देवाचे दुष्कृत्य पुन्हा पुन्हा
आणि करतो आहोत 
विटंबना तुझी पुन्हा पुन्हा 
हे पतिव्रते प्रेम सरिते 
तुळसे माये 
त्याबद्दल आम्हाला क्षमा कर
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मौन 2



मौन
*****

वक्त्या विन बोले
श्रुती विन डोले
मौनाला फुटले
धुमारेच

वृक्ष सळसळ
काही काकरव
तृणांचे पालव
दिसे आत

वाटे घडू आले
वाटे कळू आले
दोनच पावले
फक्त आता

येता गंध कळे
दडले सुमन
स्थिरावता मन
मौन गळे

मी आणि मन
दृष्य नी दर्शन
प्रवाह दाटून
एक झाले

दत्ताचा प्रसाद
झरे अंतरात
विक्रांत नभात
शून्य झाला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

माझेपण



माझेपण

माझेपण मीच
पाही एकटक
उठले बालक
जैसे काही

नवल जगाचे
नवल स्वतःचे
नसल्या पणाचे
उमटले

स्वप्न जागे झाले
स्वप्नी हरवले
स्वप्नात चालले
सारे  काही

जाहलो तटस्थ
चालल्या दृश्यात
थेंब पाण्यात
तैल एक

क्षणी स्थिरावून
उगे जागेपण
क्षणाचे चलन
क्षणी पाहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

षडदर्शन





षडदर्शन

शब्दांचे हे ज्ञान
घनदाट रान 
संताचे वचन
असे साच

एकेक दर्शन
करती भांडण
कळल्यावाचून
मुढ मीच

सांख्यांची प्रकृती
पुरुषाचा भेद
खुळावती वेद
जाणूनया

योगाची ती वाट
बहु अनवट
जातो घसरत
पदोपदी

वेदांताचा रस
गमतो अद्भुत
हाता न लागत
काही केल्या

न्याय दर्शनात
तर्काची तलवार
चाले तयावर
कोण बाबा

वैशेषिक मांडे
नीती भेद थोर
लोक इहपर
उठा ठेव

सांगे मिमांसा ती 
धर्म करणीय
यज्ञ गहणीय
आचराया

वाचून कृपेच्या
व्यर्थ खटपट
धरे गुरुपद
म्हणोनिया

ठेव रे दातारा
शब्द मूढ मन
भक्तीचे भोजन
करावया

शब्दांनी वाकला
विक्रांत थांबला
सांगतो जगाला
दत्त भजा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

पैलतीरी



पैलतीरी
*****

पैलतीरी  काठावरी कोण बाई उभा ग ॥
पाहीले मी स्वप्नी तेच रूप दिसे ग ॥
सावळाच रंग त्याचा केस कुरळे ग ॥
वनमाला शोभे गळा जणू देव भासे ग ॥
डोळीयात ओळखीच्या दाट खुणा ग ॥
हरपले भान माझे झाले तदाकार ग ॥
मनामध्ये वाहे  जसा ओघ आनंदाचा ग ॥
पुलकित काया आज जणू रूप सुख ग॥
सरे जणू तृषा माझ्या जन्मोजन्माची ग॥
माझ्यातली मीच दिसे मज दृश्य रूप ग ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...