गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

उन्मनी







जाहला कोनाडा
कालचा देव्हारा
लावला उंबरा  
उचकला ||१
साजूक तुपाची
वात ही कालची
होय वायसाची
प्रिय चोरी ||२
म्हटले म्हणून
देखिले करून
गेले ते होवून
एकदाचे ||३
आता जगताची
सरो खटाटोप
भरे आपोआप
पुण्य पात्र ||४
मांडले निर्वाण
कारणा वाचून
शून्यात सजून
भान गेले ||५
मनातला टेंभा
फुंकला मनाने
पहिला जगाने
अंधकार ||६
ते ही बरे झाले
लोढणे सुटले
ज्याचे त्याला गेले
देणे घेणे ||७
बरा मी मोकाट
फिरतो पिसाट
लावूनिया वाट
कर्तीयाची ||8
रातीस जागले
काजवे निजले
कुणा न कळले
काय झाले ||९
सरली आसवे
विकत आणली
कोरडी जाहली
रेती माती ||१०
बघतो विक्रांत
रडतो जगात
खिदळे मनात
उन्मादक ||११
हेंगाड गाणे ते
गातच सुटला
बेधुंद नाचला
उगेपणी ||१२
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २० जानेवारी, २०१६

तो किनारा







तो किनारा मनातला
पुन्हा खुणावू लागला
दाह पेटून उरात
नयनी झरू लागला

तू बोलावशील केव्हा
मज ते ही ठाव नाही
मी प्रतिक्षा मी गवाक्ष
मज अन्य भाव नाही

तू कोंडुनिया मजला
का हकारी त्या पथासी
मखमली कुरूपता  
का पुनःपुन्हा दावसी

मी जाणले ते कधीच
तव हाकेस थांबलो
म्हणताच मज ये तू 
बघ आता मी निघालो

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





शनिवार, १६ जानेवारी, २०१६

दत्त करणी





पाताळाची गंगा
आकाशी उसळे
उध्दरली कुळे
वणव्याची ||

दाटीवाटी होते
नाते जखडले
ठिणगीत झाले
एकरूप ||

उजेडी उजेड
गर्भ प्रकाशाचा
भ्रम तो तमाचा
मावळला ||

दाटला हुंकार
स्पंद पेशीतला
उठला मिटला
जगदाकार ||

पाहियेला डोळा
तरी मी आंधळा
विश्वाकार झाला
सानबिंदू  ||

दत्ता ऐसी केली
घडी आकाशाची  
विक्रांत नावाची
नाव नुरे ||


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/






झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...