गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

आजोबाचे मरण..







त्या एका वर्षी खूप पाऊस पडला
दुष्काळ संपला अन माझा आजोबा  
आषाढातील एका ओल्या संध्याकाळी
अवसेच्या आधी जग सोडून गेला
चार वर्ष पावसाविना सरली होती
केलेली सारी मेहनत वाया गेली होती
तरीही मनावर दगड ठेवत अन
हातावर आपल पोट सांभाळत
त्यांनी जगून काढली होती.  
खूपच काटक म्हातारा
पंच्याहत्तरी पार केलेला
उन्हात रापलेला शेतात खपलेला
काहीसा खंगलेला काहीसा वाकलेला
तरीही जिवट आणि चिवट
बाभळीसारखा टिकून राहिलेला .
मरायच्या आधी त्याला पहायची होती
हिरवीगार शेती भरलेली नदी
शेताच्या बाजूचा उधानला ओढा .
त्या वर्षी खूप पाऊस पडला
अन तो आजारी पडला
झरणाऱ्या प्रत्येक नक्षत्रा बरोबर
त्याचा जीव उतावीळ होत होता
शेतात जायला शेत पाहायला
पण म्हातारी आजी त्याला
जबरदस्तीने अडवून ठेवत होती
ताकद येऊ द्या,बरे वाटू द्या,
मग जा ..असे म्हणत होती
आता तो मनानेच
पिकाची उंची मोजत होता
विहारीचे पाणी जोखत होता
आजी कडून पुन:पुन्हा
खात्री करून घेत होता
त्याच्या डोळ्यात ख़ुशी होती
चेहऱ्यावर तृप्ती होती
दरवर्षी पोळ्या आधी उत्साहाने
भरलेला हौशी आजोबा
त्या आदल्या दिवशी
अंथरुणावरून हलूही शकत नव्हता
त्या संध्याकाळी बाबांच्या हातून
त्याचा आवडता चहा तो प्यायला
अन बाबा शेताच्या वाटेला लागे पर्यंत
देह सोडून शेतावर पोहचला देखील
दुष्काळानंतर बहरलेले शेत बघायला ..


विक्रांत प्रभाकर


बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

तिची प्रेमकहाणी





देह मन आणि जाणीवेवर
झालेले कृतघ्न निर्दयी वार
सोसुनही उभी आहेस तू यार
सलाम तुला !
अन तुझ्या प्रेमाच्या लढाईला !
सुटणार जीवन पुन्हा घट्ट पकडून
वादळाला तोंड देत आहेस तू  
सोप नव्हते  ते
वेदनात असह्य असे तडफडणे
वेड्यागत रात्र रात्र जळत जागे राहणे
कधी प्रेमाची शपथ देत
त्याला पुन्हा साद घातली असशील तू
कधी विरहाने व्याकूळ होत
त्याची अजीजीही केली असशील तू
कधी बेभान रागाने खदखदत
त्याच्याशी खूप खूप भांडली असशील तू
तर कधी नाही त्या धमक्या देत
टोकाच्या शत्रुत्वा उतरली असशील तू  
आणि हातातील सारे उपाय सरल्यावर
हाताशेने अंधारात एकटी रडली असशील तू
मनाने कदाचित मृत्युच्या दारात
जावून आली असशील तू
ते युद्ध प्रेमाचे जरी हरलीस तू
जीवनाचे दाहक रूप पाहून आलीस तू
कदाचित प्रेम कसे नसते
हे कळल्यावर
प्रेम कसे असते हे नीट जाणशील तू

विक्रांत प्रभाकर


मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

प्रेम केले पाप नव्हे




तू प्रेम केले पाप नव्हे   
हे ठावूक असे मजला   
या जगाची रित वेगळी  
दे झुगारूनी त्या साऱ्याला

ये अशीच ये तू धावत  
मी उभा असे कधीचा
हे हात उभारून माझे
ग साधक तव प्रीतीचा

हे मृगनयना हे चंचला
दे प्रीती तुझी दे मजला
मी तोडून साऱ्या कारा  
हा उभा उंच उडण्याला

का अजूनही थबकली
तू कोण विचारी पडली
ग सोड चिंता सगळी  
ही सुटून वर्ष चालली

विक्रांत प्रभाकर

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

मनाची कात

विरूप माझ्या मनाची   
जुनाट कात झडावी
दाट आसक्तीची व्यर्थ
गाठ चिवट तुटावी

सुखाचा घास का हा  
मुखी उगाचच फिरे
भरलेल्या पोटात नि
आग विटलेली उरे

उद्याची ती चिंता कुणा
खेळ चाले तोच जुना  
लाख शोधुनीया मज
अर्थ तो ही सापडेना

जन्म दु:ख बीज अरे
फळ दुवाड भरले
वेचू कुठवर आता
तेच ते मी सांडलेले

विक्रांत प्रभाकर


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...