सोमवार, ३० जून, २०२५

नाती

नाती
****
जळणाऱ्या सुंभा सारखी 
असतात काही नाती 
फक्त जळत राहतात हळूहळू.
वर वर पीळ स्थिर शाबूत दिसत असला 
तरी त्यात जीव नसतो तशी 
हवेचा झोत किंवा हलकासा धक्का 
लागताच डोलारा खाली कोसळतो 
तरीही तो सुंभ मात्र जळत राहतो 
त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत

तर काही नाती असतात कापरासारखी 
क्षणात धडाडून पेटणारी आणि विझणारी 
त्या नात्यांची नामोनिशानही 
राहत नाही कुठे जगाच्या पाठीवर 
क्वचित काही काजळी उरली तर उरली
पण ती कर्पुरी रवाळ सुगंधी खुबी 
तिची आठवणही येत नाही कुणाला

काही नाती असतात
चुलीतील जाळासारखी 
ती वापरली जातात 
त्याची गरज असेपर्यंत 
फुंकर मारून पेटवण घालून 
सांभाळून ठेवून कोपऱ्यात
आणि गरज संपताच 
विझवली जातात पाणी शिंपडून 
निर्विकारपणे त्यातून येणाऱ्या 
चर्रर आवाजाकडे सहज दुर्लक्ष करून 

काही नाती दिसतात 
समई वरील ज्योती सारखी 
शांत शितल समतल स्निग्ध 
प्रकाशाची पखरण करणारी 
आडोशाला ठेवलेली नीट जपलेली 
पण तो उजेड ती पखरण 
असते बंदिस्त देवघरापूरती
तिच्या पलीकडे तिला 
नसते स्वातंत्र्य नसते मुभा बाहेर पडायची 
तिच्याभोवती असते भीती सदैव घेरलेली 
कुठल्यातरी पतंगाने झडप घालायची

कुठेही असोत कशीही असोत 
जळणे हेच नात्याचे प्राक्तन असते
अन् त्याहुनी कष्टदायक असते 
उरलेल्या अवशेषांना जतन करणे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

रविवार, २९ जून, २०२५

बोभाटा

 Why it is healthy to feed kids in silver utensils

 
बोभाटा 
******************
ते चांदीच्या ताटातील जेवण 
तुमच्यासाठी नवलाच मुळीच नाही .
तुमच्या सात पिढ्या 
चांदीच्या ताटात जेवू शकतील
ठावूक आहे आम्हाला .

पण कसं आहे माहीत आहे ना 
उपाशी माणसाच्या समोर खाणे 
अन् पाठीमागे नकळत खाणे 
यात काय फरक असतो हे
तुम्हाला सांगायला पाहिजे का ?

बरे ते ही, उपाशी माणसाचाच
खिसा बिनधास्त वापरून !
नाही म्हणजे तुम्हाला कोण अडवणार 
पण मनाच्या मनाला तरी हे पटत काय ?

आणि तसेही तुम्ही किती खाणार ?
जेवढे  पोट तेवढेच भरणार 
पत्रावळी असो  वा चांदी 
ती शेवटी तिथेच राहणार
23
अन् डोळे व जीभ सोडली तर 
शरीराला काय खाल्ले ते कुठे कळते
पुढे त्या अन्नाचे काय होते वगैरे
हा आजचा विषय नाहीच जावू देत ते .

सुखाची व्याख्या तशी अवघडच 
जे कधीच सापडत नाही ते सुख !
हे तर साधू संतांचं मत 
बाकी सुखाच्या सावल्या तर 
अनंत  विखुरलेल्या असतात

तर आता आताच ही सुखाची सावली 
जराशी निसटून गेली हातातून 
गेली तर गेली पण 
किती बोभाटा करून .
 
दुःख  गेलेल्या सावली सुखाचे नाही 
तर बोभाट्याचे आधिक आहे.
तेवढा  बोभाटा होणार नाही 
याची काळजी घ्या बाकी काही नाही 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 



शनिवार, २८ जून, २०२५

डॉक्टर संजय घोंगडे (निवृत्ती दिना निमित्त)

डॉक्टर संजय घोंगडे (निवृत्ती दिना निमित्त)
**********
फार पूर्वीच्या हिंदी सिनेमात 
नायक असायचा
अगदी आदर्श धीरो दत्त 
शांत हुशार समजूतदार 
स्वाभिमानी व्यवहार चतुर 
तसाच प्रामाणिक हिशोबी अन् उदार 
मित्राला जीव देणारा 
प्रियेला प्रेम देणारा 
मन मिळावू  
नाकासमोर बघून चालणारा
 सर्वांना हवाहवासा वाटणारा 
असा माणूस प्रत्यक्ष जीवनात सापडणे
 फार अवघड पण 
मला तो दिसला सापडला 
आणि माझा मित्र झाला 
तो माणूस म्हणजेच 
डॉक्टर संजय घोंगडे

तसे आम्ही एमबीबीएस चे बॅचमेट 
होस्टेलला एकाच मजल्यावर 
बराच काळ राहिलेलो
पण मित्र व्हायला , 
इंटर्नशिप उजाडावी लागली
कदाचित आमच्या दोघांचे इंट्रोव्हर्टेड स्वभाव आणि काळाचा प्रभाव 
त्याला कारणीभूत असावा 
खरंतर आपण मैत्री करत नसतो 
मित्र धरत नसतो 
मैत्रीचं झाड आपोआप रुजत असते
तिथे अगदी आवडीनिवडी 
सामान नसल्या तरी चालतात 
ते एक हृदयस्थ अंतस्थ नाते असते

मी बीएमसी मध्ये आलो 
तो संजय मुळे च 
त्याने माझा फॉर्म आणला 
माझ्याकडून भरून घेतला 
आणि स्वतः सबमिट ही केला
अन्यथा मला बीएमसी चे
आरोग्य विभाग काय आहे 
हेही माहीत नव्हते 
माझ्या नोकरीचे सारे श्रेय 
मी संजयला देतो.

पण हे तर मैत्रीचे एक 
लहानसे आऊट कम होते 
मला माहित होते अन् माहीतआहे 
हे मैत्रीचे  झाड माझ्यासाठी 
सदैव उभे असणार आहे 
कारणं मैत्रीचा आधार 
जीवनात इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा 
अधिक महत्त्वाचा असतो.
म्हणून ज्याच्या जीवनात अशा 
धीरोदत्त नायकाची इंट्री होते 
त्याच्या जीवनाच्या चित्रपटाला 
एक झळाळी येते 
आणि माझ्या जीवनाला आली आहे 
धन्यवाद संजय फॉर बिईग माय फ्रेंड 

तुझ्या  सेवानिवृत्ती दिनानिमित्त 
तुला आभाळभर शुभेच्छा 
सदैव सुखी समाधानी आनंदी राहा 
तुला दीर्घआयु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

शुक्रवार, २७ जून, २०२५

जीवन अपघात

जीवन
******
स्वप्न नभीचे होते कालचे 
आज तयाचे भान नाही 

विश्व उद्याचे होते सुखाचे 
पण तयाचे चिन्ह नाही 

जग धावते चक्र चालते 
नभी पांगते अभ्र काही 

परी कुणाला काय कळला 
व्यर्थ  शिणला शोध तो ही 

ये रे धावून घे रे पाहून 
गेल्या निघून दिशा दाही 

भोग विझले योग हरले 
हाती उरले शून्य पाही 

नसे हातात काही विक्रांत 
असे अपघात जीवनही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

गुरुवार, २६ जून, २०२५

चाक फिरते

चाक फिरते
*********
चाक फिरते जग चालते  
अव्याहत जे स्थिर असते 

ज्यांनी पाहिले त्यांनी जाणले 
बाकी वाटेवर अंध चालले 

वाट क्षणांची दोन पदांची 
चालल्यावाचून संपायची 

कुणी भुंकतो कुणी चावतो 
कुणी दुःखावर दवा लावतो 

जन्म जितुके भाग्य तितुके 
फिरताच वारा जग परके 

सत्य कळते भय हरवते 
तळहातावरी रेष उमटते 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

मंगळवार, २४ जून, २०२५

दत्त दिगंबर

दत्त दिगंबर
*********
संसारी बांधलेला
पोटास विकलेला
तरी दिगंबरास
हृदयी मी धरिला ॥

शब्दात सजविला 
भावात मांडला
दत्त करुणाकर 
माझा मी मानला ॥

नामात बांधला 
ध्यानात साठवला 
दत्त  स्मरणगामी 
मनी मी प्रतिष्ठीला ॥

दिशा पांघरला 
पिसा उधळला
दत्त अवधूत 
चित्ती मी ठेवला ॥

कुणी सांभाळला
धरूनी ठेवला
दत्त सर्वव्यापी 
कुणाला कळला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 



सोमवार, २३ जून, २०२५

आळंदीत

आळंदीत
*******
माझ्या आळंदीचा थाट किती वर्णावा शब्दात 
उभे आडवे चैतन्य लोटे सोनेरी लाटात ॥

उभे पदोपदी नम्र दूत वैकुंठ धामीचे 
घेती एकेक वेचून सल भक्तांच्या मनीचे ॥

दृष्य अदृष्य कृपाळ संत मांदियाळी थोर 
तया दृष्टीत वाहतो प्रेम कृपेचा सागर ॥

नाम मोत्यांचे भांडार नच सरते अपार 
शत पिढ्या जोडोनिया घ्यावे इतुके भांगार ॥

माय धन्य धन्य झालो तुझ्या नगरीत आलो 
वारी तुझिया दारीची सुख सुखाचे पातलो ॥

शब्द ज्ञानेश्वर फक्त माझ्या मनात उरावा 
जन्म प्रकाशाचा खांब देहासहित या व्हावा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

रविवार, २२ जून, २०२५

युद्ध अटळ आहेत

युद्ध अटळ आहेत  
*****
युद्ध अटळ आहेत 
विध्वंस ही अटळ आहे 
सृजन पालन मरण हे चक्र 
सदैव चालणार आहे 
शहर नष्ट होतात 
संस्कृती लयास जातात 
काळरुपी महाप्रलयात 
राष्ट्र बेचिराख होतात 

निसर्गाच्या दृष्टीने माणसांची शहर 
आणि मुंग्यांची वारूळ 
दोन्ही सारखीच असतात 
मुंग्या ही लढतात एकमेकांशी 
आणि काबीज करतात वारूळ 
मुंग्याही बळी जातात, कैदी होतात 
गुलाम केल्या जातात किंवा 
मारून टाकल्या जातात वापरून
दुसऱ्या वारुळातील प्रजातींकडून 

हे वैर हा द्वेष ही असूया माणसाची 
ही जगत्जेता होण्याची 
आकांक्षा माणसाची
हीच तर शस्त्रे आहेत 
काळात्म्याची विनाशाची 
अन्यथा समतोल कसा साधणार 
या अफाट जनसंख्या वाढीचा 
या नाश पावणाऱ्या जंगलाचा 
या असंख्य जीवांना 
नष्ट करणाऱ्या प्रदूषणाचा 
या स्वार्थलोलूप हव्यासाचा 

कदाचित माणसांना मारणारे 
हे माणूस यंत्र 
निसर्गानेच नियोजित केले असावे
हि यादवी माणसा माणसातील, 
धर्माची राष्ट्राची भाषेची 
शस्त्रे घेऊन उभी आहे

विनाश तर होणारच 
हे अलिखित प्रारब्ध असते
कारण मरणातूनच पुन्हा 
सृजन होत असते 
हे  चक्र सदैव असेच चालू राहते
पण का आणि कुणासाठी 
हे प्रश्न ज्याला पडतात 
त्यालाच ते सोडवावे लागतात 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

शनिवार, २१ जून, २०२५

शांतीची आस

शांतीची आस
************
जोवर साप ते भूमीवरती 
तोवर येथे कुठली शांती 
विश्वकुटुंब जे न मानती 
फक्त बावटा धरून ठेवती 

उरात सदैव अंधभक्ती 
काय कुणाचे रे ते असती 
जे न मानती तया मारती 
तोडून फोडून वर हसती 

किती शिकले थोर जाहले 
बीज अंतरी तेच राहिले 
आत बाहेर विष लावले 
सैतानाचे ते रूप सजले 

जोवर डोक्यात बाड कोंबले 
माथे ते रे असे बिघडले 
शांती नकोच वा उत्कर्ष 
झेंड्यापायी केवळ संघर्ष

गंगा सोडूनी कुण्या गटारात 
अगा जे की गेले वाहत
रे तया कधी का कळते 
अत्तरात काय सुख असते

ती शांतीची आस व्यर्थची 
शस्त्रे तत्पर जेथे वधाची 
मरे माणूस कितीक मेले 
परी ते कुठली पर्वा नसले

श्रद्धेने त्या तांडव केले 
विश्व ढवळून नरक जाहले
कोण थोपवी यास आता 
विश्व शोधते नव्या प्रेषिता
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 




शुक्रवार, २० जून, २०२५

स्वीकार

स्वीकार 
*******
दुःखांच्या आठवणी नि सुखाच्या हुलकावणी 
यात कधी जिंदगानी नच जावी हरवूनी ॥१

जेव्हा जेव्हा उदास त्या स्मृती येतात दाटूनी 
झपाटूनी तन मन जाती उध्वस्त करूनी ॥२

समोर उभा वसंत मग जातो कोमेजूनी 
रक्त गोठवतो हिम राहतो विश्व व्यापूनी ॥३

मग त्या जीवा सुरेल आठवत नाही गाणी 
आक्रोशाचे सूर उरी जन्म भरे आसवांनी ॥४

आहे त्याच्या स्वीकारात कृपा येतसे घडूनी
सारे जीवन आनंदे जाते क्षणात भरुनी ॥५

क्षणोक्षणी नटणारे ऋतू येती बहरूनी 
प्रत्येक पुनव जाते अमावस्या सुखावूनी ॥६

प्रत्येक नाते सुखाने येते मग बहरूनी 
अढी मना मनातील जाते क्षणात पूसूनी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

गुरुवार, १९ जून, २०२५

मारुती चितमपल्ली सर


मारुती चितमपल्ली सर 
*******************
ते जंगलातील 
समृद्ध आणि विलक्षण जग 
दाखवले तुम्ही आम्हाला 
या शहरातील 
खुराड्यातील मनाला 
जणू दिलेत 
एक स्वप्न जगायला 

रानातून उपटून आणलेले रोप
जगतेच कुंडीत 
ते रानातील सुख 
सदैव मनी आठवीत 
त्या कुंडीतील रोपास 
सांगितल्या तुम्ही  गोष्टी 
रानाच्या सौंदर्याच्या 
ऋतूच्या मैफिलीच्या 
आकाशाच्या चांदण्याच्या 
पावसाच्या पक्षांच्या 
आणि त्या गूढ रम्य कथाही 
मितीच्या बाहेरच्या 

जंगलात न जाणारे किंवा 
क्वचित जंगल पाहणारे आम्ही 
ते जंगल पाहतो जगतो मनी 
या मनोमय कोषात 
तुमच्या लिखाणातून 
तुमच्या गोष्टीतून 

आमच्या आदिम पेशीत दडलेले ते रान 
तुम्ही जागे ठेवले जगवले 
कृतज्ञ आहोत आम्ही तुमचे 
ती कृतज्ञता शब्दाच्या पलीकडची आहे 
शब्दात मांडता येत नाही 
तरीही या कुंडीतील रान रोपाची 
कृतज्ञ शब्द फुले 
तुम्हाला समर्पित करतो.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

सोमवार, १६ जून, २०२५

देई भक्ती मन

देई भक्त मन
******
जयघोष तुझा दत्ता
गुणगान मी करीन
जीवाचे हे लिंबलोण 
तुजवरी ओवाळीन ॥१

देहाची या कुरवंडी
तुजलागी रे करीन 
निर्मळ करून मन
देवा नैवेद्य अर्पिन ॥२

अहं मम सरो माझे 
फक्त तुझेपण राहो 
सर्वस्वाची राख माझ्या
तुझी रे विभूती होवो ॥३

मांडीयेला कल्लोळ मी  
देवा तुझ्या दारावरी 
धाव धाव दयाघना 
पाव मज आता तरी ॥४
 
नको मज मोठेपण
देई खुळे भक्त मन
तुझ्या पदी विसावून 
जग जावे हरवून ॥५

 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

रविवार, १५ जून, २०२५

अनुभव

अनुभव
*****
आला अनुभव 
जगताचा काही 
कळले मज हे 
घर माझे नाही ॥
सोडव मजला 
येतो मी धावत
तुझिया मार्गाने 
दयाळा परत  ॥
ताप भवताप 
इथे तिथे रोगी 
महाभय दिसे 
वेदनांच्या अंगी ॥
त्याचे निवारण 
घडो भगवन 
जगात या गाजो 
तुझे देवपण ॥
नुरावे जगत 
नुरावा विक्रांत 
व्यापूनिया सारे
उरो फक्त दत्त ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

शनिवार, १४ जून, २०२५

अमूल्य

अमूल्य 
*****
हजारो लाखोंच्या या शहरात 
रोज भेटणाऱ्या अफाट समूहात 
सगळेच आपले नसतात 
फार कमी जिवलग होतात 
अन् जवळ येतात 
नात्या वाचून एक नाते 
तयाशी हळुवार जुळून येते 
कधी सहकारी कधी सहध्यायी 
कधी वरिष्ठ तर कधी कनिष्ठ 
कधी वैचारिक मतभेदांचे पहाड फोडून 
तर कधी सामाजिक उतरंडीच्या
सीमा रेषा तोडून ते प्रिय होतात
 ते जे जोडणारे सूत्र असते 
त्याला सामाजिक आर्थिक भावनिक 
कंगोरे असतातही आणि नसतातही
पण ते केवळ मैत्रीचे नाते असते 
कधीकधी वाढते फोफावते दृढ होते
तर कधी सुकते, कोमजते हरवून जाते 
अमरत्वाचे वरदान तर इथे 
कुठल्याच वृक्षाला नसते
पण जीवनाच्या अंगणात 
पडणारे प्राजक्ताचे हे सडे   
जीवनात अपार आनंदाचा 
सुगंध पसरवतात.
त्याला मूल्य नसते कुठलेच .
अन करताही येत नाही कुणाला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

शुक्रवार, १३ जून, २०२५

धनकवडी

धनकवडी
********
द्रोणात घास होता 
घासात प्रेम भरले 
भरविता दाता माझा 
गात्री चैतन्य दाटले ॥१
खोल प्रेमळ डोळ्यात 
होती दाटलेली ओल 
मज भेटला भेटला 
योगीराज श्री शंकर ॥२
कुठे जावे मी रे आता 
काय मागावे कोणाला 
प्रश्न मिटला सुटला 
येता तयाच्या दाराला ॥३
रंग अवधूत माझा 
आत मलाच दिसला 
शब्द आदेश अलक्ष 
जन्म निरंजन झाला ॥४
प्रेम कणभर माझे 
घेत मणभर दिले 
येता शरण हा दास 
किती कौतुक रे केले ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १२ जून, २०२५

लेखन कॉपी पेस्ट करणाऱ्यांना


लेखन कॉपी पेस्ट करणाऱ्यांना 
***********************"
कवी लेखकाच नाव वगळून ,
copy  paste करणारे.
जणू घेवू पाहतात श्रेय
कवी लेखकाचे, त्याच्या प्रज्ञेचे ,स्फुर्तीचे .
कदाचित ती एक असूया असू शकते 
किंवा न दिसणारा जळफळाट ही 

तसेही त्या कवी लेखकाला 
कुणी ओळखत नसते .
आणि ओळखणार ही नसते 
कधी कुठे भेटले तरी.

तर मग ते नाव काही लोकांना
का खटकते  कळत नाही .
सुंदर स्त्रीच्या कपाळावरील कुंकू 
किंवा गळ्यातील मंगळसूत्र खटकावे तसे.

त्या तिच्या सौंदर्याच्या गौरवात 
दडलेला असतो सौंदर्याचाच उपमर्द .
अन् मग सौंदर्याचा रसिक होवून जातो 
लफंगा रोम साईड रोमियो 

म्हणूनच सर्व लेखन 
समाज मध्यमावरील
नेहमी नावासकट शेअर करावे
आपले अभिजात रसिकत्व 
असे सिद्ध करावे🙏.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ११ जून, २०२५

सांभाळ

सांभाळ
*******
सांभाळ मजला दत्त अवधूता 
पथावरुनिया घसरू मी जाता 

थकलो वाकलो तुझ्या दारी येता 
सापडलो व्याधा धाव तुचि आता 

पाहता पाहता दाटला अंधार 
कडा चढतांना संपले आधार 

हुल्लूप भुल्लुक घेरती येऊन 
प्रकाश मिटतो दिशा हरवून 

तुझिया वाचून सांग सोडवून
कोण रे मजला नेईल यातून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

 

मंगळवार, १० जून, २०२५

अस्पर्श

  

अस्पर्श
*****"
तुझ्या  व्यथेने आणि कथेने 
गेले झाकळून माझे मन 
तू स्वीकारलेल्या त्या कटू प्रारब्धाने 
पुनःपुन्हा येऊन उद्दामपणे, सूड घ्यावा तुझा
अधिक क्रूरतेने, तुझी सहनशिलता पाहून
तसे  तुझ्या जीवनाचा कॅनव्हासवर 
उमटत होते रंग ,अधिक गडद होऊन .

पण असे का व्हावे, खरेच  कळत नव्हते मला
तुझी शालिनता तुझी ऋजुता 
तुझी जीवनावरील निष्ठा 
तसेच तुझी प्रार्थना अन प्राक्तन 
याची सांगड घालता येत नव्हती मला 
अगदी ठाऊक असूनही 
पूर्वजन्माचा सिद्धांत, कर्माची जकात 
ती ऋणानुबंधाची गाठ 
माझे मन नव्हते मान्य करत  
कि ते तुझ्या बाबतीत घडत आहे म्हणून

तरीही तुला पाहतो मी 
काळौघात पचवलेल्या दुःखासकट 
कुठलेही प्रदर्शन न करता
सहानुभूतीची अपेक्षा न ठेवता 
जीवनाच्या प्रवाहावर 
स्वार झालेल्या लाटेसारखी 
मी रेखाटू पाहतो, तुला माझ्या कवितेतून  
पण तू होत जातेस गूढ खूप गूढ 
कुठल्यातरी अस्पर्श अनाम अगाध 
जंगलातील पहाटेसारखी
जिथे पोहोचत नाहीत माझे शब्द
माझ्या भावना माझ्या सांत्वना 
आणि सहवेदना सुद्धा .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ९ जून, २०२५

पुन्हा

पुन्हा
****
पुन्हा तुझिया केसात 
अडकले प्राण माझे 
पुन्हा तुझिया श्वासात 
हरवले भान माझे ॥

पुन्हा ती नजर गेली 
सोडूनिया चित्त माझे 
झालो पुन्हा फकीर मी 
लुटवून सर्व माझे ॥

माझे माझे म्हणता मी 
झाले हे सारेच तुझे 
हरवून आज गेले 
द्वैतातले ओझे माझे ॥

असे वेड जीवास या
नकळे लागले कसे 
सदैव स्मृतीत तुझ्या
फिरते हे मन माझे ॥

पुन्हा या गात्रात वीज 
लख्ख अशी झंकारते 
उमलूनी कणकण 
गीत  मोहरते माझे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ७ जून, २०२५

जादू

जादू
*****
तुझ्या लोभस चेहऱ्यात
काय जादू आहे ते कळेना 
माझी नजर होते पाखरू 
खिळते तिथे भिरभिरतांना 

तुझ्या निर्मळ डोळ्यात 
काय भूल आहे कळेना 
मी हरवून जातो त्या डोहात 
युगायुगांची होऊन तृष्णा 

मज कळते ती तूच आहेस 
माझा विसावा दिन मावळतांना 
सुखावतो मी हास्याची तुझ्या 
लक्ष लक्ष नक्षत्रे वेचतांना 

अन दृष्टी वरती पडदा माझ्या 
जग रहाटीचा पडतांना 
मी ठेवतो खोचून हृदयात
हलकेच त्या अमूल्य क्षणांना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ६ जून, २०२५

प्रेम थांबते

प्रेम थांबते
********
युगो युगी प्रेम थांबते 
वाट पाहता वाटच होते 
विना अपेक्षा कधी कुठल्या 
जळणारी ती ज्योतच होते 

गीतामधले शब्द हरवती 
सूर सूने होऊन जाती
तरी कंपन कणाकणातील 
अनुभूतीचे स्पंदन होती 

शोध सुखाचा खुळा नसतो 
अंतरातील हुंकार असतो 
आनंदाच्या सरिते आवतन 
आनंदाचा सागर करतो 

क्षण अपूर्ण जगणारा हा 
पूर्णत्वाचे क्षेम मागतो 
पडतो तुटतो वृक्ष जळतो 
पुन्हा मातीतून रूजून येतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

एक हॅण्ड ओव्हर .

एक हॅण्ड ओव्हर . 
******
होय साहेब
तुम्ही फारच ग्रेट आहात 
ते तुम्हाला म्हणतील 
कधी प्रसाद आणून देतील
कधी शुभेच्छा पाठवतील
तुमच्या असल्या नसल्या 
गुणांचे कौतुक करतील
येता-जाता सलाम ठोकतील
पण ते सारेच सलाम 
त्या खुर्चीचे असतात 
खुर्चीवरून उतरताच 
शुभेच्छा बायपास होतात 
प्रसाद आणि गावच्या वस्तू 
आपला रस्ता बदलतात 
देवाचा ते  बुक्का भस्मही
दुसरे कपाळ शोधतात 
थोडक्यात सारे व्यवहर
आपुलकीचे कौतुकाचे 
तुमच्यासाठी क्वचित असतात 
सारे नमस्कार आदबीचे 
त्या खुर्चीलाच असतात
तुम्हालाही माहित आहे 
मलाही माहित आहे .
त्यामुळेच खुर्चीवर असतानाच 
खुर्ची पासून वेगळे होणे 
खूप आवश्यक आहे 
ते मी शिकलो होतो 
आशा आहे तुम्हीही शिकाल !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ४ जून, २०२५

तीर्थक्षेत्री

A bustling street market in India crowded with people and vendors selling  their wares | Premium AI-generated image

 तीर्थक्षेत्री

*****

गंध फुले हार 
प्रसादाच्या राशी 
फुलांच्या बाजारी 
मन माझे साक्षी 

अवघा गोंधळ 
धनाचा कल्लोळ 
पूजेचा भाव ही 
मिटला समूळ

वदे माझे मन 
मजला आतून 
पुरे झाले आता 
जावू या निघून

तसेही आपण 
आलोय घेवून 
नेऊ या सोबत 
देव हे परतून

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘ 🕉️





मंगळवार, ३ जून, २०२५

प्रश्न

प्रश्न
*****
अवघा व्यापून जगतास दत्त 
असे जळागत सर्वकाळ ॥१
आत नि बाहेर काही तयाविन
नाही रे ते आन कळे मज ॥२
जळात या जन्म जळात जीवन
 जळीच संपून जाणे अंती ॥३
 पण कशासाठी कळेना अजून 
ठेवी भांडावून यक्षप्रश्न ॥४
कोणी म्हणे लीला काढी समजूत 
ऐसे हे सिद्धांत किती एक ॥५
परी त्या रे कथा अवघ्या गोष्टींच्या 
गमती न साच्या मजलागी ॥६
पण तयाहून काही संयुक्तित 
नाही सापडत उत्तरही ॥७
पण कुठेतरी असेल ती वाट 
प्रवाहात घाट उतरला ॥८
तया त्या वाटेला लावूनिया डोळा 
विक्रांत हा खुळा प्रवाहात ॥९
माता-पिता त्राता तोच एक दाता 
तयाविन अन्यथा गती नाही ॥१०
तोच तो रे प्रश्न तोच तो उत्तर
परी कै देणार ठाव नाही ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २ जून, २०२५

नको बिडी सिगरेट






नको बिडी सिगारेट
**************

चालती धरून मुखात 
कुणी सिगरेट रुबाबात 
लावती स्वतःची वाट 
ते मूर्खच डोळे झाकत ॥१

कुणी पेटवी विड्याची थोकट 
झुरक्यावर झुरके मारत 
चालतो तया नच माहित 
तो असे मरण कवटाळीत ॥२

या तंबाखूत भरलेली 
विषद्रव्य हजारो ठासून 
सांगती डॉक्टर ओरडून 
जन हो घ्या तुम्ही समजून ॥३

हे कॅन्सरचेच सेवक 
एकाहून धूर्त असे एक 
लावून  लळा सुरेख 
कापती गळाच चक्क ॥४

असे पाकीटावर लिहिले 
अन चित्र ही भयान काढले 
ते नसेल  कपाळी लिहिले 
हे असे का रे तुज वाटले ॥५

ही सिगरेट अशी ओढणे 
रस्त्याच्या मधोमध चालणे 
किती वेळ सांग रे वाचणे 
नको घेऊ ओढून मरणे ॥६

दे क्षणात सोडून तिजला
सोडताच होईल सोडणे 
मग जैत जैत रे म्हणत 
आरोग्याला मिठी घालणे ॥७

*""*""*""*'"*""*
C@डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https\\:kavitesathikavita.blogspot.com

थुंकू नका




थुंकू नका .
*****"
अरे रस्त्यावर थुंकणे 
हे किती लाजिरवाणे 
पशुगत असे करणे 
शोभते न मानवास II

थुंकीत जंतू हजार
करती रोग प्रसार 
टिबी कोविड हे तर 
माहीत तुम्हा यार II

ती तंबाखू तो गुटखा 
करू नका रे खा खा 
त्या पिचकारीच्या रेखा  
की मरण रांगोळ्या.II

या घाणेरड्या सवयी 
जाणतोस तू रे भाई 
बघ ठरवून सोडून देई 
जमेल तुज नक्की II

होईल परिसर सुंदर
राहील निरोगी  शरीर 
देवालयासम घरदार
भारत भूमीचे या .II


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांaत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १ जून, २०२५

ज्ञानदेव म्हणता

ज्ञानदेव म्हणता
************

मुखे ज्ञानदेव म्हणता म्हणता
 मन झाली वार्ता नसण्याची ॥१

हरवला ध्वनी कैवल्य स्पंदन 
आनंद कंपण उरलेले ॥२

काळवेळ कुणी मारले गाठीला 
अस्तित्व चोरीला गेले काय ॥३

पण भय चिंता नव्हती किंचित 
स्वयंप्रकाशात आत्मतत्व ॥४

विक्रांत सरला स्वर शब्द भाव 
दशा ज्ञानदेव येणे नाव ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गाठ

गाठ ***** दत्त राम कृष्ण एकच चैतन्य  नाव आन आन जरी त्यांची ॥ शारदा कालिका लक्ष्मी रूप छान  पदी होता लीन शांती लाभ ॥ परि देव देवी...