शुक्रवार, २० जून, २०२५

स्वीकार

स्वीकार 
*******
दुःखांच्या आठवणी नि सुखाच्या हुलकावणी 
यात कधी जिंदगानी नच जावी हरवूनी ॥१

जेव्हा जेव्हा उदास त्या स्मृती येतात दाटूनी 
झपाटूनी तन मन जाती उध्वस्त करूनी ॥२

समोर उभा वसंत मग जातो कोमेजूनी 
रक्त गोठवतो हिम राहतो विश्व व्यापूनी ॥३

मग त्या जीवा सुरेल आठवत नाही गाणी 
आक्रोशाचे सूर उरी जन्म भरे आसवांनी ॥४

आहे त्याच्या स्वीकारात कृपा येतसे घडूनी
सारे जीवन आनंदे जाते क्षणात भरुनी ॥५

क्षणोक्षणी नटणारे ऋतू येती बहरूनी 
प्रत्येक पुनव जाते अमावस्या सुखावूनी ॥६

प्रत्येक नाते सुखाने येते मग बहरूनी 
अढी मना मनातील जाते क्षणात पूसूनी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी दत्त गीत गातो

दत्तगीत गातो ************* दत्तप्रिय होण्या मी दत्तगीत गातो प्रेम वाढवतो मनातील ॥१ शब्दाच्या गाभारी शब्द उधळतो  प्रेमे ओवाळीतो अ...