शुक्रवार, २५ जून, २०२१

दत्तेच्छा।



दत्तेच्छा
*******

देवे भेटविले 
कित्येक साधूंना 
लाविले चरण 
धरावया ॥

कधी इच्छेविना 
इच्छे वा धरून 
जाऊन नमन 
करविले ॥

खरे तर सारे 
तयाच्या आधीन 
एक कृपा क्षण 
त्यांचा पुरे ।

आधी होता हट्ट 
कशाला ते जावे 
दत्ता तूच द्यावे 
देणे जे ते ॥

जर का नसेल 
द्यावयाचे तुला 
पडून पायाला 
राहू दे ना ॥

दत्त माझा सारा 
जाळी अभिमान 
त्यांचे थोरपण 
दावुनिया ॥

तयांचे हातून 
स्वतःच येऊन 
ऊर्जेचे स्फुरण 
प्रेमे देत ॥

सारे गुरुतत्व 
असे दत्त रूप 
अरूपाचे रूप 
घेऊनिया ॥

विक्रांत दत्ताचा 
अवघ्या संतांचा 
दास हा जन्माचा 
लीन झाला ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...