बुधवार, ९ जून, २०२१

देव चोरला


देव चोरला
*********

देव हा थोरला 
तयांनी चोरला 
हृदयी ठेवला 
गुपचूप ॥

रूप न तयाला 
नाव न तयाला 
तरी सापडला
पूर्णत्वाने ॥

अन घेऊ जाता 
सताड ते उघडे 
दार ते ही होते
आत घेते ॥

कुणी अडवला 
नच थांबवला 
अरे त्या चोराला 
कुणी कुठे ॥

भेटता समर्था 
शिकवती कला
हवी का तुम्हाला
तरी देती ॥

नसल्या देवुळी 
जाणीव पाऊले
अस्तित्वा आपुले 
हरविता ॥

योग ध्यान भक्ती
घेवून औजार 
विना त्या वापर 
काम व्हावे ॥

सोप्याहून सोपे 
वाटे अवघड 
मना लुडबुड 
करू देता ॥

करणे थांबता
केवळ  उरता 
दाविला विक्रांता 
देव पथ  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...