गुरुवार, १७ जून, २०२१

गाणे तुझ्यासाठी


तुझे गाणे
*******

तुझे गाणे तुझ्या साठी 
वाटते जरी मी गातो 
तुझे गाणी माझ्या साठी 
खरे तर मी लिहितो ॥

सुटु नये हात तुझा 
म्हणुनी हा अट्टाहास 
बळेबळे आणे आव 
जना वाटे फक्त खास ॥

बाकी तर तसा आहे 
संसारात बुडालेलो
मोह पाणी लोभ फुले 
अवघ्यात खुळावलो ॥

हरखते मन जगी 
रूप गुण पाहतांना 
हळवे हव्यास तरी 
गोड वाटे गुंततांना ॥

साऱ्यामध्ये भय परी 
नको तू तो दुरावाया
म्हणुनिया लाडेकोडे 
येतो तुज सुखावया ॥

लायकी ती जरी नाही
येण्या तुझी अनुभूती 
आल्यागत वावरतो 
मिरवितो तुझे प्रीती ॥

अपराध कितीतरी
हातून असे घडती
बुडतांना कर्दमात 
असू दे रे दोर हाती ॥

झाली तर घडो भेट 
जन्म नाही हा शेवट 
तोवरी साहून घे रे 
विक्रांतची कटकट॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...