केला उपकार
विश्वाचा अंकुर
दावियला
फुटला अंकुर
विश्वचि तो झाला
भरुनी राहिला
चराचर
नव्हता अंकुर
नव्हते फुटणे
केवळ कळणे
करण्याला
परी पाहू जाता
दृष्टीचिये दृष्टी
कळण्याच्या गोष्टी
मावळल्या
म्हणतो कळला
परी न कळला
म्हणे जो कळला
तोचि नाही
देह मनाचा या
सुटला आधार
जाणीवेच्या पार
पार गेला
दृश्याचिया सवे
हरवला दृष्टा
दर्शनाच्या वाटा
मावळल्या
झाला अनुग्रह
खुंटल्या शब्दांचा
क्षणिक भासाचा
भास गेला
तुडुंब शून्यात
शून्य बुडबुडे
असण्याचे कोडे
नसण्याला
विक्रांत पाहतो
शब्द खळबळ
तरण्याचे बळ
नवजाता
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा