शनिवार, १९ जून, २०२१

भिजलेला घाट

भिजलेला घाट
***********

भिजलेला घाट 
भिजलेली वाट 
भिजलेला तृप्त 
इंद्रायणी काठ॥

भिजले देऊळ 
भिजले राऊळ 
भिजला सोन्याच्या 
देवाचा पिंपळ ॥

भिजलेले मन 
भिजलेले तन 
भिजल्या डोळ्यात 
भिजलेलं गाणं ॥

भिजले आकाश 
भिजला प्रकाश 
भिजले हळवे 
उषेचे निश्वास ॥

थांबले निनाद 
टाळ घोष नाद 
निरव प्रशांत 
उगवला आत ॥

अन मिटताच 
पाहती लोचन 
जाणावे स्पंदन 
स्फुरे कणकण ॥

धडाडे मृदुंग 
तीव्र काळजात 
टाळ झांज नाद 
खणाणे कानात ॥

रामकृष्ण हरी 
शब्द पांडुरंग 
आनंदात दंग 
झाले अंतरंग॥

सुखावलो माये
ज्ञानाई कान्हाई
ठायी ठायी दिसे
किती नवलाई ॥

विक्रांत डोळ्यात 
माईना पसारा 
कृष्ण घननिळा
वेटाळे जिव्हारा  ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘








भिजलेला घाट
***********

भिजलेला घाट 
भिजलेली वाट 
इंद्रायणी काठ
भिजलेला ॥

भिजले देऊळ 
भिजले राऊळ 
भिजला पिंपळ 
सोनियाचा॥

भिजलेले मन 
भिजलेले तन 
भिजलेलं गाणं 
डोळीयात ॥

भिजले आकाश 
भिजला प्रकाश 
उषेचे निश्वास
हळुवार ॥

थांबले निनाद 
टाळ घोष नाद 
निरव प्रशांत 
उदो झाला ॥

अन मिटताच 
पाहती लोचन 
जाणावे स्पंदन 
कणोकणी ॥

धडाडे मृदुंग 
काळजाच्या आत 
खणाणे कानात 
टाळ झांज ॥

रामकृष्ण हरी 
शब्द पांडुरंग 
आनंदाचा रंग 
अंतरात ॥

सुखावलो माये
ज्ञानाई कान्हाई
दिसे नवलाई 
ठायी ठायी ॥

विक्रांत डोळ्यात 
माईना पसारा 
कृष्ण घननिळा
वेटाळून ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...