मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

फळ दत्ता देई

 फळ दत्ता देई
 ************

माझी या प्रेमाचे
फळ दत्ता देई
होऊनिया येई
जिवलग

आणि काही नको
सोने हिरे मोती
चरणांची माती
लाभू दे रे

दूर करी देवा
मानपान सारा
संसाराचा वारा
लागू नाही

तुझिया प्रेमात
जगावे सतत
तुझा आठवत
 रात्रंदिन

नामाचा झंकारी
सुख आवर्तन
केवळ उरून
जावे बाकी

मग मज जग
म्हणू देत वेडा
विक्रांत बापुडा
नादावला 



©
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

ज्ञानाभिलाषा












ज्ञानाभिलाषा
**********



वाहतो हे शब्द
अक्षरांची पोथी
नाही तया गाठी
अनुभव ॥
कुणी कुणी येते
ऐकविते ज्ञान
कंटाळून कान
गेले तया ॥
जाणत्या जवळी
सदा उभे मौन
वायफळ प्रश्न
निरर्थक ॥
शास्त्राचा धांडोळा
बुद्धीचा पाचोळा
अवघा घोटाळा
गमतसे ॥
जाणत्या जवळी
जाणण्यास जाता
जाणण्याची वार्ता
बुडो जाते ॥
जयाचे वरण
करीतसे आत्मा
तया अपघाता
नाव ज्ञान ॥
बाकी कसरत
श्वासांची शब्दांची
चाले जगताची
मुक्तीसाठी ॥
विक्रांत निमूट
पाहुनिया गती
काही नाही हाती
म्हणतसे ॥

 ©
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

कृतार्थ जीवन




अरे निरर्थक जातेय जीवन
अर्था वाचून उगाच वाहून

पिता सिगारेट जाते संपून
नशा सरते बॉटल फुटून

रोज उगवतो सूर्य फिरतो
मूर्ख आम्हास उगा बनवतो

तेच रस अन जिभेवरले
त्याच यांत्रिक चवीत फसले

अनेक चेहरे उरात फसले
मायेनेच जणू रूप पालटले

का मरून येथ जाता संपून 
क्षणात वाळून वाफ होऊन

कश्यास जगता फसफसून
नाल्या मधले पाणी होवून

दत्तपदी असे यारे धावुन 
ज्ञानेश वाणी घ्या रे ऐकून

कृतार्थ होईल अवघे जीवन
काही जरी मिळल्या वाचून

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

माया




  माया
******

तुझे जग आहे माया
तुझे असणेही माया
माझे रडणे कुढणे
गमे सारी सारी माया .

माया देवपूजा माझी
माया दुनियाही सारी
माया देह नि मनाची
चाले मायामग्न वारी

माया भक्तीचे उधान
माया भोगाचे तुफान
माया भास नि आभास
माया डोळ्यांचे पाहणं

माया बायको नी पोर
माया धन व्यवहार
माया तीर्थाचा बाजार
माया दान दीक्षा पत्र

राग द्वेष तीही माया
झाला संसार मायेचा
त्याग वैराग्यही माया
माया बाजार मठाचा

माया माझी हि कविता
मायामय लिहणारा
माया पेनातील शाई
माया कागद पसारा

नाव विक्रांत हे माया
नामाभिधानही माया
माझी अक्षरे ही माया
सारे वाचणारे माया
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
 *

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

शोधाच्या प्रवासी



शोधाच्या प्रवासी
**
तुप दिव्यातले 
काय वाया गेले 
देव्हारी जाळले 
फुलवाती 
 .
आयुष्य सरले 
तुझा आळविता 
म्हणूनिया खंता 
नाही पोटी 
.
नच संमोहन 
स्वतःचे करून 
आलो मी धावून 
तवपदी
.
अवघ्या हा शोध 
केवळ सुखाचा 
डोळस दृष्टीचा 
आहे माझा 
 .
शोधाच्या प्रवासी 
महासुख राशी 
भेटल्या मजसी 
आगंतुक 
 ..
सोडूनिया मिठी 
तयाचि नाजूक 
केली जवळीक 
दत्ता तुझी
.

** © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


 

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

सोन्याचा महाल




 सोन्याचा महाल
***
सोन्याचा महाल 
महाल हा मोठा 
स्वप्नातला खोटा 
मनोरम 

सोन्याच्या महाली 
सुख मखमली 
जीव तळमळी 
अभिलाषी 

महाल न तुटतो 
कधीही कशाने 
रोज नवेपणे
उभारतो 

जागता डोळ्यात 
निजता झोपेत 
मी पणे त्यात 
अंतर्बाह्य 

दत्ताने दाविला 
एका झटक्यात 
देऊन हातात 
सत्य चुड 



©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

देह मन






 देह मन

**

खादल्या अन्नाची
उभी असे रास
म्हणतो तयास
देह तरी

येते जातेअन्न 
घडते पचन
पाहते कोण 
असे तया

झाले अवतीर्ण
कुठून हे मन
अहंची घेऊन
खोळ एक

तेच ते नर्तन
घडेआवर्तन
चालवतो कोण
तया इथे

सदा असे दत्त
तया विचारात
आतील पाहात
वाट नवी

विक्रांत अडला
परत फिरला
रित्या घटातला
अवकाश
**

++
  © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

मनाच्या भ्रमरा


मनाच्या भ्रमरा 
**********
मनाच्या भुंग्याला
फार भुणभुण
थांबते सुमन
पाहूनिया
.
मनाचा हा भुंगा
करे वणवण
मधाचे सेवन
करण्याला
.
मनाचा भुंगा रे
बहु मिरवतो
सुखाला कष्टतो
रात्रंदिन
.
मनाचा भुंगा न
जुमाने कुंजर
मद गंडस्थळ
चाखायला
.
मनाचा भुंगा
मरे कमळात
थोर आसक्तीत
दबूनिया
.
मनाच्या भ्रमरा
जाय दत्त पदी
काय तू ते अंती
कळण्यास
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

श्री गहिनीनाथ


खेळता गोरक्ष 
घडली करणी 
उद्भवे गहिनी
मातीमध्ये 

भिवून बालके 
भूत त्या म्हणून 
बसले लपून 
घरामध्ये  

तो करभाजन
मच्छिंद्रे जाणून
 
हृदयी धरुन
प्रेम दिले 

घडवून याग
देव संगतीत 
गहिनी पंथांत 
नाथ केले 

गहनीने थोर 
निवृत्ती तो केला 
ज्ञानेश दिधला 
महाराष्ट्रा 

 नाथपंथाच्या या 
गहिनी फांदीला 
बहर हा आला 
वारकरी 

मराठी देश हा 
ऋणी गृहिनीचा 
जिव्हाळा जीवाचा 
पुरविला 

विक्रांत गहिनी
पदास नमतो 
पायधुळ  घेतो 
माथ्यावरी

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

ढोर




ढोर
*****

भरल्या पिकात 
घुसलेली ढोर 
जाळी तोंडावर 
बांधलेली 
.
हवाव डोळ्यात 
खाण्याचा आकांत 
उदंड यत्नात 
व्यर्थ गेली
.
तैसे या जगात 
सुखाच्या शोधात 
जन धावतात 
भाग्यहीन 

पाहून यातना 
जनाच्या मनाच्या
विक्रांत दत्ताच्या 
पायी आला 

हरवली जाळी
सरले वावर 
मनाला आवर 
घालणे ही  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***

जग .अपघात की परमेश्वर संकल्प?

जग .अपघात की परमेश्वर संकल्प?
******::****

या विश्वाची निर्मिती ही कुणी परमेश्वराने केलेली नसून तो केवळ एक अपघात आहे असे मानणारा एक वर्ग या पृथ्वीतलावरती आहे .या मताचा स्वीकार केला असता, एक भयानक पोकळीचा जन्म आपल्या जीवनात होतो .निरर्थका मध्ये जगणारे एक निरर्थक बंडल आपण होवून जातो आणि मग जगणे म्हणजे केवळ भौतिक सुख अनुभवने, आहे ते उपभोगणे आणि मजा करणे .एवढेच त्याचे स्वरूप उरते .
असे असेल तर मग आपल्या मनामध्ये उमटणारी, सर्व जग सुखी व्हावे हि जी कल्पना आहे, इच्छा आहे त्याचे मूळ काय असेल ? सर्वेपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामया असे जे आपल्याला वाटते ते कुणामुळे आणि कशामुळे? ही सुखाची, प्रेमाची ,आनंदाची, सहकार्याची जी प्रेरणा आपल्यामध्ये आहे ती काय अपघाताची परिणीती आहे काय ?
परमेश्वराचे अस्तित्व कळणे  यांचे सानिध्य जाणवणे व त्याप्रमाणे जीवन जगणे  ही अत्यंत व्यक्तीगत बाब असल्यामुळे ती कोणाला दाखवता येत नाही किंवा तिचा पडताळा हि कुणाला करून घेता येत नाही .तर मग सिद्ध करणे तर अशक्यच.
त्यामुळे या अपघाताचा दावा करणाऱ्या कोर्टामध्ये, साक्षी पुरावे उपलब्ध न होऊ शकल्याने, परमेश्वर नाकारणाऱ्यांच्या नेहमीच जय होतो असे दिसते .
दुसरे असे की आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण देव संकल्पनेपर्यंत जाऊन पोहोचलो कि मग पुढे तो देव शोधणे एवढे एकच काम उरते .अर्थात हे काम मग प्रत्येकालाच झेपतेच असे नाही अगदी पटले तरीही !
त्यामुळे अपघात संकल्पांना मांडणाऱ्यापुढे तू तुझे धरून ठेव नि मी माझ्या मार्गाने जातो अशीच भूमिका घ्यावी लागते  .

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

दत्ता माझ्या भाळावर





दत्ता माझ्या भाळावर 
कृपेची अक्षर 
रेखाटली अपार 
दया तुझी ॥

दत्ता माझ्या जगण्यात 
दाटलेल्या काळोखात 
पेटवली फुलवात 
प्रेमे तूची

अगदीच हट्ट नव्हता 
परी तूच हवा होता 
हळूवार या चित्ता 
आलास तू ॥

सदा पायी असू दे रे 
तुझ्यासाठी जगू दे रे 
गांजल्यांना दाऊ दे रे 
तव पायवाट ॥

सुखावला विक्रांत 
दत्त आला जगण्यात 
राहे आता गाणे गात
तयाचिच मी॥

  © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...