तुझे वेध
******
पुन्हा तुझे वेध
लागले मनाला
पुन्हा प्राण झाला
वेडापिसा ॥
तुझ्या पुनवेच्या
ओघी दाटलेला
एक मी इवला
कण व्हावा ॥
जरी रित्या हाती
विझलेल्या गात्री
परतोन यात्री
येवो घरा ॥
पुन्हा एक घाव
हातोड्याचा तव
सोसुनियां जीव
सुखी व्हावा ॥
पाहू नको वाट
फिरव वा पाठ
अट्टाहास दाट
परी माझा ॥
पडो देह माझा
पहिल्या पायरी
प्रभू गिरनारी
हवा तर ॥
परी तुझे प्रेम
राहू दे उदंड
व्हावी बडबड
सार्थ काही ॥
विक्रांत उपाशी
तुझिया दाराशी
वेढून सुखासी
मरू पाहे ॥
**************
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा