सुख
****
हजारो भक्तांच्या लांबवर रांगा भावभक्ती दंगा अनावर ॥१
ज्याला त्याला होते जायचे रे पुढे
दामटती घोडे आपुले ते ॥२
आस दर्शनाची जरी की डोळ्यात
लक्ष घड्याळात जाते तरी ॥३
परतीची गाडी हवी धरायला
जाणे मुक्कामाला ठरलेल्या ॥४
थोडी घुसाघुस थोडी रेटारेटी
आणि दमदाटी मान्य मनी ॥५
देवाचिये द्वारी ओळ ओठावरी
भाव तो जिव्हारी धरूनिया ॥६
क्षण दर्शनाने विसावतो जीव
धन्यतेचा भाव मुखावर ॥७
विक्रांता तयाचे वाटते कौतुक
देवा देई सुख मज तैसे ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
