मंगळवार, २९ जून, २०२१

देवा यतिवरा.. (काही बदलून)


देवा यतिवरा..

आलो इथवर 
जैसा तैसा देवा 
पुन्हा नच जावा 
दूर आता ||१ ||

नको पुनरपी 
घालूस विरही 
प्रभू मागतो ही 
भीक तुला ||२ ||

ठावूक मजला 
आहे सर्वांतरी 
आस डोळा परी
पाहण्याची ||३||

काय मी असेल
दिसलो तुजला
प्राप्त वा कृपेला
झालो काही ॥४

काय मिळविले 
तुझिया भक्तिला
काय ते मजला 
शक्य असे ||५|

तुझीच करुणा 
उदारा दातारा 
भव या सागरा 
उतराया ॥६

मागतो मागणे
देवा यतिवरा 
विक्रांत पामरा
पदी ठेवी  ||७ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २८ जून, २०२१

प्रारब्ध साठा

प्रारब्ध साठा
🌸🌸🌸🌸

रोग भोगातून 
चालविले दत्ता 
सरण्यास साठा 
प्रारब्धाचा ॥

सुटल्या विवेकी 
भोगाचिया गाठी 
रोगाची ती घाटी 
चालण्याने ॥

भोगतो मी भोगा
परी ना लालसा 
सहजी सहसा 
स्वीकारतो ॥

विक्रांत कृपेचा 
जाहला दिवटा 
फळे भोगवटा 
पाहतसे॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


रविवार, २७ जून, २०२१

हाक ओली

हाक ओली
🌹🌹🌹

दत्ता कर माझी 
हाक आता ओली 
प्राणाने भरली 
आर्त अशी ॥

तुझ्याविन काही 
दिसावे न डोळा 
करी रे आंधळा 
जगतास ॥

तूच गुरुमाय 
आराध्य दैवत 
तुझ्यात अद्वैत 
घडो मज ॥

जरी नालायक 
तुझ्या मी सुखाला 
ठेवी  रे पायाला 
दूर जरी ॥

हरवून भ्रम
सगुण-निर्गुण 
मिटू दे रे मन 
मागणारे ॥

तुझ्याविना दत्ता 
कुणा मागू काय 
तुच असे माय 
विक्रांतची॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


प्रित

प्रित
****

ओघळून मेघ 
चुंबतो अवनी 
कळल्यावाचुनी 
तिजला ही 

अन मग देही 
विज थिरकते 
नि धडधडते 
हृदयात 

कळता धरती 
जरा लाजते 
अन मोहरते 
रोमरोमी 

मेघ बरसतो 
स्वतः हरवतो 
अंगची होतो 
जणू तिचे 

सुंदर सजले 
द्वैतची सरते 
ऐक्य नांदते 
नवलाचे 

युगायुगांची 
प्रीत तयांची 
जरी ऋतुची 
नित्य नवी 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, २६ जून, २०२१

वृक्ष

वृक्ष
🌳🌳

उभा व्रतस्थ एकटा 
वृक्ष नभात घुसला 
होते वैभव अपार 
पाचू सर्वांगी ल्यायला 

मुळे खोल खोलवर 
होती चिरत अंधार 
फांद्या तन उसवत 
घेत कवेत आभाळ 

होते जीवन वाहत
पान फुले बहरत
चक्र निसर्गाचे शांत 
होता देही वागवत 

परी असून देहात 
देही नव्हता गावत 
तन ध्यानमग्न त्याचे 
ऊन वाऱ्यात तापत

गूढ मौनाच्या आभेत 
छाया होती झिरपत 
जन्म खिळली जाणीव 
पारंब्यांत विस्तारत 

तया पाहता पाहता 
मीच दिसलो माझ्यात 
फांद्या फुटल्या सहस्त्र 
खोल रुजलो शून्यात


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, २५ जून, २०२१

दत्तेच्छा।



दत्तेच्छा
*******

देवे भेटविले 
कित्येक साधूंना 
लाविले चरण 
धरावया ॥

कधी इच्छेविना 
इच्छे वा धरून 
जाऊन नमन 
करविले ॥

खरे तर सारे 
तयाच्या आधीन 
एक कृपा क्षण 
त्यांचा पुरे ।

आधी होता हट्ट 
कशाला ते जावे 
दत्ता तूच द्यावे 
देणे जे ते ॥

जर का नसेल 
द्यावयाचे तुला 
पडून पायाला 
राहू दे ना ॥

दत्त माझा सारा 
जाळी अभिमान 
त्यांचे थोरपण 
दावुनिया ॥

तयांचे हातून 
स्वतःच येऊन 
ऊर्जेचे स्फुरण 
प्रेमे देत ॥

सारे गुरुतत्व 
असे दत्त रूप 
अरूपाचे रूप 
घेऊनिया ॥

विक्रांत दत्ताचा 
अवघ्या संतांचा 
दास हा जन्माचा 
लीन झाला ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

जल वनवासी


जल वनवासी
**********

डेझी चाळीचे निवासी 
आम्ही जल वनवासी 
डोळे लावून नळाला 
आसुसलो दिन निशी 

धन गेले जरी कोटी 
परी पाणी नाही ओठी 
दारी धोधोधो पाऊस 
मनी असूया दाटती 

आशा मनात धरून 
आलो इया वर्धमानी
हाय परी इथे असे 
तिच कोरडी कहाणी 

कशी तुटती पाईप 
जल जोर कमी होतो 
खाज कोणाच्या हाताला 
कोण बळे दाता होतो 

शेठ म्हणतो मी केले 
जेव्हा आला पाणी दिले 
आता घाला हेलपाटे 
शोधा मुन्सिपाल्टीवाले 

होतो तिथे बरे होतो 
वेळ म्हणायची आली 
बाबा वर्धमानी ऐसी 
सारी हौस पुरविली 

तसा विक्रांत दुष्काळी 
जिल्हा नगर मधला 
अर्ध्या बादलीत स्नान
होता करता झालेला 

दिन तेच आठवले 
चक्र पूर्ण एक झाले 
होते प्रारब्ध राहिले 
वर्धमानी फेडियले 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

😄😄

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...