सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

कृतज्ञता

आकाश
*******
त्या तुमच्या आकाशात 
असते सदैव स्वागत 
गरुडाचे पारव्याचे अन्
इवल्याश्या चिमणीचे ही 
तुम्ही नाकारत नाही 
लहान सहान चिलट आणि 
रस्त्यावरून उडालेली धूळही 
तुमचे आकाश उभे असते 
शांत निराकार स्तब्ध 
गिळून हजार वादळ 
उलगडून लाखो 
उदय आणि अस्त 
जरी ते हसते खेळते रंग बदलते 
पण कुणाच्या येण्याने खुलत नाही
कुणाच्या जाण्याने खंत करत नाही 

त्या तुमच्या आकाशाची आकांक्षा 
धरून असते येणारे प्रत्येक मन 
प्रत्येकाला मारायची असते 
एक गगन भरारी
आणि जरी तुमची कृपा असते 
आकाशातील लहरीगत 
देत प्रत्येकाला साथ आणि
होत सांभाळणारा हात 
पण प्रत्येकाचे पंख वेगळे असतात 
सामर्थ्य वेगळे असते.
तिथे असतो तुमचाही निरुपाय 
त्यामुळे दोन झेपात खाली पडणारे 
अन् त्या आकाशावर रुसणारे आम्ही 
त्यांचावरही तुमची करुणा कृपा अन क्षमा
बरसायची कधीच थांबत नाही

हे कागदाचे छोटे विमान 
आज आले तुमच्या प्रांगणात 
होत  वाऱ्यावर विराजमान
गेले भोगून इवलेसे उड्डाण  
आले पाहून इवलेसे स्वप्न 
या इवल्याशा स्पर्शाबद्दल  
ही कृतज्ञता .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

इंद्रायणी तीर

इंद्रायणी तीर
************
कृपेस कारण इंद्रायणी तीर 
वाहते अपार माय माझी ॥

सुंदर साजरा दोन्ही तीरी घाट 
मिरवितो वाट कैवल्याची ॥

जरा उंचावर सवे सिद्धेश्वर 
बैसले ज्ञानेश्वर महाराज ॥

सातशे वर्षाच्या प्रवाह पावन
भाव भक्ती लोण जगी वाटे ॥

अगा उद्धरले कोटी कोटी जीव 
सजीव निर्जीव इये तीरी ॥

जन्मोजन्मी केले असे पुण्य काही 
म्हणून वाट ही सापडली ॥

माय ज्ञानदेव बाप ज्ञानदेव 
कृपेचे लाघव  डोईवरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

कृपा

कृपा 
****
कृपा तुझी कोवळीसी हलकेच बरसली 
चांदण्याची वेल जणू आकाशात पसरली 
कृपा तुझी गवसली हृदयात विसावली 
डोळीच्या कडेवर रेख झाली ओली ओली
कृपा तुझी साजरीच ओठावर नादावली 
यमुनेच्या जळागत देही प्रीत उधानली 
कृपा तुझी घनघोर नभातून ओघळली 
आषाढाचे अनावर गाणे गात गात आली 
कृपा तुझी सागराची मज कळेचिना खोली 
पुरे पुरे म्हणूनिया लाट येते लाटेवरी 
कृपा तुझी सोनियाची शिशीरातील उन्हाची 
तनमन उजळत्या भव्य दिव्य प्रकाशाची 
कृपा तुझी कणोंकणी व्यापूनिया मला राही 
कृपा तुझी क्षणोक्षणी प्रेमाचे रे गीत गाई
कृपेविन तुझ्या मुळी जगता आधार नाही
कळे तेव्हा डोळ्यातून प्रेम माझे उगा वाही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

सुखाचा डोह

सुख डोह
********
पाय मी पहावे माझ्या माऊलीचे 
सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥

मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे 
गुणगान गावे वारंवार ॥

अरूपाचे रूप शब्दात वेचावे 
हृदयी धरावे सर्वकाळ ॥

माऊली गजर डोळ्यात पाझर 
हृदी अनिवार वेडे व्हावे ॥

कोणी म्हणून खुळा कोणी वाया गेला 
आळंदी धुळीला माथी घ्यावे ॥

इथल्या सुखाचे सुख वर्णवेना
शब्द उमटेना मुखातून ॥

सुखाच्या डोहात सुख थेंब झालो 
सांगण्या उरलो मात बळे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव 
*********
रूप ज्ञानदेव घेऊनिया आले 
आळंदी बैसले पांडुरंग ॥

देवभक्त रूपे करतो सोहळा 
द्वैताचा आगळा प्रेममय 

देव स्वतःलाच भजतो प्रेमाने 
लीलेत रमणे आवडे त्या 

प्रेमभक्तीविना निर्गुण एकटे 
रिकामटेकडे अर्थहीन 

द्वैत अद्वैती हा घडतात खेळ 
विश्व चळवळ गोड चाले 

अगा पांडुरंगी दिसे ज्ञानदेव
अन्य नाही भाव विक्रांती या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

वीणेकरी

वीणेकरी
*******
अपार भरल्या गर्दीत राउळी 
उभा वीणेकरी नाद लयी ॥

कुणी पायावरी ठेवीतसे माथा 
कुणी काढे वाटा बाजूने तो ॥

त्यास मोजमाप नव्हते कुणाचे 
नाव विठोबाचे मुखी फक्त ॥

मज गमे चित्त तेच विणेकरी 
विचारी विकारी गर्दीतले ॥

तैसा तया ठायी देता मी तो नाद
सरले संवाद  विसंवादी ॥

झंकारली वीणा लयी गेले मन 
गर्दीत संपूर्ण निरंजन ॥

विचारी राहून विचारा वाचून 
उगवून मौन शांत झालो ॥

कृपा ज्ञानदेवी भरून राहिली 
विक्रांत हरली सुधबुध ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

महफ़िल



महफ़िल 
*******

यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।

 महफ़िलों के रंग अब सूने हो रहे हैं ।

तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो? 

चार पाँच पल बचे हैं मुफ्त गँवा रहे हो।

सोने से पहले, विक्रांत! थोड़ा-सा जाग लो।

वह चाँदनी ढूँढो अंदर और उसे गले लगा लो।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...