शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ 
*******
काय माझी गती अन् काय मती 
तुज दयानिधी भेटू शके

काय माझी श्रद्धा काय ते साधन 
तुज बोलावून घेऊ शके 

अवघा देहाचा भटक्या मनाचा 
वाहिला जगाचा भार मनी 

संसारी राबलो प्रपंची गुंतलो 
जरी दारी आलो देवा तुझ्या 

जाणतो मी न्यून माझे हे अपार 
कृपेचा सागर परी तू रे

घडते घडणे अवघे तुझ्याने 
म्हणून मागणे मनी ये रे 

कृपेचा कल्लोळी भिजव मजला 
प्रवास उरला पूर्ण करी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद
*********
जळताच झाड मन विद्ध होते 
तोडताच झाड मन कळवळते 
एकेक झाडात लक्षावधी जीव 
राहतात प्रेमाने करुनिया गाव 
किती ते कीटक आणि पक्षीगण
घरटे कुणाचे रे विश्रांतीचे क्षण 
जीवन रसाचे गीत मंद मौन
खोडात वाहते एक संजीवन
कुणाशी ना वैर आप पर भाव 
खोलवर ओल दाता त्याचे नाव 
का रे बाबा वैर करशी तयाशी 
नको रे होऊस उगा पाप राशी 
खांडववन शापे पार्थ वंश गेला 
सवे यादवाचा सर्व नाश झाला 
इतका समोर आहे रे इतिहास 
जागा होई मित्रा पालट दिवस

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

दारी आलो

दारी आलो
*******
केली खटपट आणि दारी आलो 
तुजला भेटलो कृपा तुझी 

जरी अट्टाहास देवा माझा वेडा 
अदृश्याचा खोडा होता मागे 

किती अडकलो कितीदा थांबलो 
थकुनिया गेलो तनमने 

काय देवा तुझी असेही परीक्षा 
किंवा काही शिक्षा कळेचिना 

कळेना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण 
कळल्या वाचून रमलो मी 

पास नापासची चिंता नसे मला 
परी तुझी शाळा बुडू नये

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

दत्त पथ दावतो

पथ दावतो 
********
दत्त पथ दावतो 
संकटात धावतो 
आणुनि सुखरूप 
अंगणात सोडतो 

दत्त चित्त चोरतो 
भवताप हारतो
बंधमुक्त जीवनाचे 
स्वप्न मला दावतो 

दत्त मनी नांदतो 
गीती अर्थ होतो 
माझ्यातून तोच तो 
बोध मला सांगतो

दत्त पाश तोडतो 
दत्त मैत्र जोडतो 
माझे पण हरवून 
विश्व सारे होतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाडे मरतात .

 

 
झाडे मरतात 
**********
असे कसे हे 
रे असे कसे
जिकडे तिकडे 
भरतात खिसे .
 
तोडता भरती खिसे 
लावता भरती खिसे 
खिशात पैशाचे 
जणू की झाड असे .
 
काल होता तो 
गुटगुटीत कर 
आज आला तो 
नवा टी शर्ट कर .
 
नाव रूप वेगळे 
तंत्र यंत्र आगळे 
तेच परी ते रे
कर्तृत्व असे काळे .
 
कधी हातात हात 
कधी फुल हातात
असो कुणीही पण
बिचारी झाडे मरतात .
 
झाडास नाही पक्ष
झाडास  नाही रक्षक
हिरवे मांस जणू  ते
सारेच इथे भक्षक.
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

महातेजा

महातेजा
********
माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया 
येऊ दे रे दया तुज माझी ॥१
देई गा भरून फाटकी ही झोळी
प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२
करी कळवळा येई गा अंतरा 
चैतन्य दातारा पूर्ण करी ॥३
जगलो जगणे काळाच्या वाहणी
रितेपणी मनी खंतावलो ॥४
नाम ध्यान जीवी बहुत ठेविले 
परि ना भरले पात्र माझे ॥५
सरले गा यत्न देहाचे मनाचे 
कैसे कैवल्याचे दान पावू ॥६
तुझिया वाचून कुठले चरण 
धरेना हे मन  काही केल्या ॥७
गुरु तूच माझा सद्गुरु जीवाचा 
तुझिया प्रीतीचा लोभ जीवी ॥८
आता महातेजा करी उणे पुरे 
जवळी घे रे लेकरा या ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

आळंदी निवासी



आळंदी निवासी 
************
आळंदी निवासी तुम्ही भक्त थोर
संतांचे माहेर झाला असे ॥१

काय वाणू तुम्हा जन भाग्यशाली 
जणू निवडली रत्ने थोर ॥२

बहु केले असे पुण्य खरोखर
चैतन्य सागर घर तुम्हा ॥३

करावे साधन नच वा करावे 
घेत हेलकावे शुद्ध व्हावे ॥४

जन्मांतरी तुम्ही केली असे सेवा 
म्हणूनिया ठेवा ऐसा मिळे ॥५

जणू चार कोस दिव्य तेज स्तंभ 
जयाचा आरंभ अवकाशी ॥६

तयाच्या लहरी नांदता कौतुके
नच काही तुके भाग्यासी या ॥ ७

विक्रांत सुखाने घेतो तिथे धाव 
चैतन्य हवाव पुरेनाच ॥ ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...