गुरुवार, ४ डिसेंबर, २०२५

नाशिक वृक्ष तोडी निमित्त


वृक्ष तोडी निमित्त 
**************
महाजन येन गतः स पंथाः
नको जावूस तू रे कधी वृथा

असे म्हणण्याची वेळ आलीय 
देवा, आत्म परीक्षेची वेळ आलीय 

इरेला पेटलेला राजकारणी 
करतो सदैव स्व पक्षाची हानी 

झाडे तोडू जाता आरेत अरेरावीने
शाप भोगले ते आठवा आठवणीने 

पुन्हा तसाच गुन्हा करू नको मित्रा 
झाडाहून साधू मोठा नसतो मित्रा 
 
झाडा सारखा साधू नसतोच दुसरा 
हिशोब वृक्षवधात दिसतोय मला दुसरा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

दत्त कृपा

दत्त कृपा
*******
क्षणा क्षणाच्या कृपेत 
दत्त भेटतो भक्तांना 
अन कळल्या वाचून 
दत्त जपतो जीवांना 

नको करूस अपेक्षा 
मूर्त दिसण्या साजरी 
दिव्य दर्शन दुर्लभ 
योगी शिणले कपारी 

चाले संसार सुलभ 
मनी नांदे समाधान
घडे व्रत पूजा अर्चा 
ही तो कृपेचीच खूण 

येती सुखदुःख वाट्या 
घडे प्रारब्ध भोगणे 
दत्त नेई रे त्यातून 
करी सहज साहणे 

दत्त भक्तांस घडते 
दत्त छायेत जगणे 
अन् पोळल्या वाचून 
होते संसारी चालणे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

आळंदीत

आळंदीत
*******
आळंदीस भक्त येती आणि जाती 
देऊळाच्या भिंती साक्षीरूप ॥

भक्तांची मस्तक समाधी शिळेला 
भक्तीचा सोहळा कुणा कळे ॥

कुणा पर्यटन कुणा समाधान
कुणास चैतन्य लाभे तेथे ॥

विक्रांता मिळाले न कळे ते काय 
कळण्या उपाय नाही परी ॥

असो सार्थ व्यर्थ देवा येणे जाणे 
एक वेडे गाणे मनी रुजे ॥

एक मोरपिस स्वप्नांचे साजरे
जीवा स्पर्श करे हळुवार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

निजज्ञान

निजज्ञान
********
घोकून मंत्र वेदामधले काय कुणी तो होतो संत 
रेटून पंथ जाहिरातीत काय कुणी तो होतो महंत 

अगा हे तर यंत्र चालते मेंदू दुसरे काय असते 
मंद कधी जे रे कुणाचे तर कुणाचे तीक्ष्ण असते

कुणी शिकवतो गुप्तविद्या घेऊनिया ते धन 
आणि निराश परमार्थी जातो विश्वास हरवून

कुणी चालतो रानी वनी त्या घरदार सोडूनी
कुणी होतो जन्म बंदी संस्थेत कुण्या अडकूनी 
 
इतुके कसे असते अवघड घडणे रे निजज्ञान
जन्म हरवतो काठावरती नच घडते ते स्नान

दिशा हरवती वाटा मोडती सापडते ना दार 
तिमीरातल्या या सुखाला मग सरावतो संसार 

जया जे हवे तेच मिळते आणि जीवन फळते 
या उक्तीतील खोच मग हळूच मजला कळते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सुख

सुख 
****
हजारो भक्तांच्या लांबवर रांगा 
भावभक्ती दंगा अनावर ॥१

ज्याला त्याला होते जायचे रे पुढे
दामटती घोडे आपुले ते ॥२

आस दर्शनाची जरी की डोळ्यात 
लक्ष घड्याळात जाते तरी ॥३

परतीची गाडी हवी धरायला 
जाणे मुक्कामाला ठरलेल्या ॥४

थोडी घुसाघुस थोडी रेटारेटी 
आणि दमदाटी मान्य मनी ॥५

देवाचिये द्वारी ओळ ओठावरी 
भाव तो जिव्हारी धरूनिया ॥६

क्षण दर्शनाने विसावतो जीव 
धन्यतेचा भाव मुखावर ॥७

विक्रांता तयाचे वाटते कौतुक 
देवा देई सुख  मज तैसे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

यत्न

यत्न
*****
येतात तुझी पत्रे किती 
पण निरोप कळत नाही 
दिसतात शब्द कितीतरी 
पण अर्थ कळत नाही ॥

रे  तुझा खेळ अवघड
तू मला सापडत नाही 
ऐकुन तुझ्या हाका धावतो 
तू कधीच दिसत नाही ॥

मी विचारले दिशांना तर
त्यांना अस्तित्वच नाही 
मी विचारले काळाला तर 
तो सदैव हाच क्षण पाही ॥

मी गेलो विचारत त्यांना 
जे बहुदा भेटले तुला
पण ते गढून शून्यात
होते विसरले या जगाला ॥

धरल्या सोडल्याविन मग
असण्यातच राहिलो बसून
कळले की उजळतात दिशा 
कुठल्याही यत्ना वाचून ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

प्रतिक्षा



प्रतिक्षा
******
उपाधित रमलेले 
माझे येणे आणि जाणे
भाळावरी श्रीपादाने
लिहिले ते काय जाणे  

बोलावून घेई पदी
देवा हेचि रे मागणे 
डोळ्यांमध्ये उमटावे 
नभातले निळे गाणे

तूच सदोदित देतो 
स्वप्न मज जगण्याचे 
रिते जागेपण परि 
वाहू किती दिवसांचे 

तीच व्यथा तीच क्षुधा 
जन्मोजन्मी दाटलेली 
डोळीयांची नेत्रपाती 
प्रतिक्षेत आटलेली

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 




परिक्रमा

परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे  अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा  माईकडे मागत आहे  प्रचंड पाणी प्रवाहाचे  नितळ नि...